सुमन सोसायटीतून खाली उतरली व योगेशच्या कारमध्ये मागे बसली. योगेश हा तिचा मुलगा व सून, कविता दोघेही पुढे बसले होते. गाडी सुरु झाली व सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडून, रस्त्याला लागली. योगेश सफाईदारपणे ड्रायव्हींग करीत होता.. सुमनने मागे सीटवर डोके टेकवले व ती थोडी आरामशीर बसली. मोठ्या कालावधीनंतर ती आपल्या माहेरी चालली होती..
सासरी गेलेल्या प्रत्येक माहेरवाशीणला माहेरची ओढ असतेच. तिनं कितीही सुखाचा संसार थाटलेला असला तरी तिचं मन माहेराकडं, नेहमीच धाव घेत असतं. माहेरवाशीण म्हटलं की, त्याला वयाची मर्यादा असूच शकत नाही. जी आधी त्या घरातील ‘लेक’ असते, कालांतराने तिचे रुपांतर ‘आत्या’मध्ये होते.
माहेरी तिची जागा, त्याच घरात जन्माला आलेली भावाची मुलगी घेते.. आणि आत्याचे तिच्याच माहेरी असलेले महत्त्व, हळूहळू कमी होत जातं. माहेरी भावाच्या मुलींची लग्न होतात आणि त्या गर्दीत आत्याचं नातं पुसट होत जातं…
गाडी पुढे पळत होती व सुमनचं मन, पाठीमागे भूतकाळात डोकावत होतं. पस्तीस वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर, या शहरात ती शेखरबरोबर आलेली होती. शेखर फिरतीच्या नोकरीमध्ये असल्याने तो महिन्यातील तीन आठवडे बाहेरच असायचा. शहरातील एका काॅलनीमध्ये दोघांनी आपला संसार थाटला होता.
नव्या नवलाईत, वडील व दादा महिन्यातून एखादी तरी चक्कर सुमनकडे टाकायचेच. योगेशच्या जन्मानंतर त्याचं जावळ काढण्यासाठी, सुमनचा दादा आला होता. वर्षातील भाऊबीज व रक्षाबंधन त्यानं कधीही चुकवली नाही.
काही वर्षांनंतर सुमनचे वडील हृदयविकाराने गेले. सुमनला त्या दुःखातून बाहेर पडायला वर्ष लागलं. योगेश शाळेत जाऊ लागला. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला माहेराहून दादा येतच होता.
मे महिन्याच्या सुट्टीत सुमन, माहेरी जायची. दादा, वहिनी व त्यांच्या मुलांसोबत महिनाभर रहायची. दादाला ओळीने चार मुली. वंशाच्या दिव्यासाठी तो कुटुंब वाढवत राहिला. शेवटी योगेशच्या बरोबरीने त्यालाही मुलगा झाला. दादाचा मित्र, नागेश सुट्टीत सुमनला नेहमी भेटायचा, रक्षाबंधनाला तिच्याकडून आवर्जून राखी बांधून घ्यायचा..
दरम्यान अनेक वर्षे उलटली. सुमनच्या भावाच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं. काही वर्षांनी दुसरीचं झालं. सुमनने आपल्या कुवतीनुसार लग्नाला हातभार लावला होता.
दादाची तिसरी मुलगी, दिपा हुशार होती, ती शिक्षिका झाली. दिवस भरभर जात होते. दादाला आजारानं ग्रासलं. वरचेवर सुमन त्याला जाऊन भेटत होती. शेवटी तो गेला.
वहिनी व भावाच्या मुलांसाठी सुमनचा जीव तुटत होता. कधी सुट्टीत माहेरी गेल्यावर त्यांच्यासोबत एखाद्या रम्य ठिकाणी सर्वजण फिरुन यायचे. त्यामुळे योगेशला आजोळी जाणं नेहमी आवडायचं.
आता तिची आई देखील वयाने थकलेली होती. तिला भेटल्याशिवाय, फोनवरुन बोलल्याशिवाय सुमनला चैन पडत नसे. काही वर्षांनंतर तीदेखील स्वर्गवासी झाली. सुमनचं माहेरी जाणं आता कमी होऊ लागलं.
दादाच्या मुलींची लग्न झाली. सुमनच्या योगेशचं लग्न झालं. आता योगेशमुळे दिवस पालटले होते. त्याचे वडील निवृत्त झाले होते. आज रक्षाबंधनाचा दिवस असल्याने सुमनने योगेशला गाडीने माहेरी जायची, इच्छा व्यक्त केली होती..
एव्हाना गाडीने निम्मं अंतर पार केलं होतं. तिघांनीही वाटेत चहा घेतला व तासाभरात गाडीने शहरात प्रवेश केला. दादाच्या नवीन बांधलेल्या घरासमोर योगेशने गाडी उभी केली. सुमन गाडीतून उतरताना तिच्या स्वागताला दादाच्या चारही मुली व मुलगा, विनायक धावत आले. सर्व भाचे कंपनीला भेटून सुमनला अतिशय आनंद झाला होता. सुमनची नजर भिंतीवरील दादाच्या फोटोकडे गेली आणि तिचा कंठ दाटून आला. तिच्या मनात आलं.. ‘आजचा हा दिवस पहायला, तू हवा होतास’.. चहापाणी झाल्यावर ती वहिनीशी गप्पा मारु लागली.
तेवढ्यात विनायक दादाच्या मित्राला, नागेशला घेऊन आला. सुमनला पहाताच त्याने विचारले, ‘ताई, कधी आलीस?’ तो आता रिक्षाचा व्यवसाय करीत होता. सुमनने त्याला सांगितले, ‘आत्ताच आले, तुला वेळ आहे का? आपण जरा बाहेर जाऊन आलो असतो..’ त्याने होकार दिला.
जेवण झाल्यावर सुमन, नागेशच्या रिक्षात बसली. तिने रिक्षा घोरपडे काॅलनीकडे घ्यायला सांगितली. नागेश रिक्षा चालवताना अखंड बडबड करीत होता, सुमन मात्र रिक्षातून दिसणारा रस्ता, दुकानं, वाडे, इमारती पहात.. पूर्वीचे दिवस आठवत होती. तिला वाटेत कमानी हौद दिसला.. इथेच एकदा क्लासवरुन सुटल्यावर ती मैत्रिणींसोबत घरी जाताना, दोन म्हशी अंगावर धावून आल्यावर घाबरून त्यांना, पळता भुई थोडी झाली होती..
ती घोरपडे काॅलनीपाशी आली. तिथं मोठ्या बिल्डींग्ज उभ्या राहून, पूर्वीच्या काहीच खाणाखुणा शिल्लक राहिलेल्या नव्हत्या. त्या चाळीतच तिचा बालपणापासून ते काॅलेजपर्यंतचा काळ गेला होता. एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला उतार होता. तिचे शेजारी, समोरचे राहणारे नेहमीच, सुमनचं कौतुक करायचे. भाचे कंपनी तिच्यासोबत कायम असायची. तिने नागेशला राजवाड्यावर घ्यायला सांगितले. पावसाळ्याच्या वातावरणात राजवाडा फारच सुंदर दिसत होता. तिला आठवलं, इथल्या चौपाटीवर, अनेकवेळा दादा, वहिनी व मुलांसोबत पाणीपुरीवर ताव मारलेला होता. सुपणेकरची वडा चटणी मैत्रिणींसोबत खाल्लेली होती.. सुमन विचारात दंग राहून शांत बसल्याचं पाहून नागेशने विचारलं, ‘आता काॅलेजवर घेऊ का?’ तिनं मान डोलावली.
रिक्षा नाक्यावरुन काॅलेजकडे वळली. रविवार असल्याने, एरवी गजबजलेला परिसर आज शांत होता.. नागेशने मुख्य इमारतीसमोर रिक्षा उभी केली. सुमन खाली उतरली. काॅरिडाॅरच्या कट्यावर बसली. तिला काॅलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून ते शेवटच्या पेपरपर्यंतचे सर्व दिवस आठवले.. दादाच्या भितीमुळे तिने कोणत्याही मुलाशी मैत्री केली नव्हती. सतत मैत्रीणींच्याच गराड्यात ती असायची. इच्छा असूनही गॅदरिंगमध्ये तिने कधीही सहभाग घेतला नव्हता.. आठवणींच्या सरींनी ती भिजू लागली..
रिक्षात बसून नागेशला तिने रिक्षा, नटराज मंदिराकडे घ्यायला सांगितली. ती रस्त्याने पहात होती, पूर्वीच्या इमारती जाऊन तिथं टोलेजंग माॅल उभे राहिले होते. जे मंदिर सहज दिसायचं, ते सिमेंटच्या जंगलात, आता शोधावं लागत होतं. ती मंदिरात गेली. या मंदिराच्या आवारात तिने वार्षिक परीक्षेचा अभ्यास केला होता..
दुपार टळून गेली होती. परतीच्या वाटेवर तिला मैत्रिणींची घर दिसली. एका मैत्रिणीच्या वडिलांचं टेलरचं दुकान होतं. तिथं आता मोठं कुलूप लागलेलं दिसलं. चौकात तिची मैत्रीण, वासंती रहायची.. तिथं मोठी शाॅपी उभी होती..
संध्याकाळी ती परतली. सगळी भाचे कंपनी व बच्चे मंडळी तिचीच वाट पहात होते. नागेशही विनू बरोबर गप्पा मारत बसला. सर्व भाचींनी योगेशला राखी बांधली. त्यांचं झाल्यावर नागेशने, सुमनच्या पुढे हात केला.. सुमनने भरल्या डोळ्यांनी त्याला राखी बांधली..
जेवणं झाल्यावर सुमन निघाली.. तेव्हा शिक्षिका असलेली भाची, दिपा सुमनला म्हणाली, ‘आत्या, तुझा दादा या जगात नाही, म्हणून तू माहेरी येणं सोडू नकोस. आम्ही सर्वजण तुझ्या स्वागतासाठी नेहमीच आतुर आहोत. आम्हाला खात्री आहे, तुला ‘ताई’पेक्षा ‘आत्या’ या पदाचा अभिमान वाटत आला आहे.. तुझ्यासोबत माहेरची उब नेहमीच रहावी, म्हणून ही शाल तुला देत आहे.. ती जेव्हा कधी तू अंगावर घेशील, तेव्हा आम्हीच तुला मिठीत घेतल्यासारखं वाटेल…’
सुमनने शाल लपेटून घेतली व गाडीत बसली.. योगेशने गाडी सुरु केली.. वहिनी, सर्व भाचे कंपनी, नागेश, लहान मुलं ही हात हलवताना, हळूहळू लहान होताना सुमनला दिसत होती… तरीदेखील त्यांच्या मायेची उब, तिला ते सोबतच असल्याची जाणीव करुन देत होती…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२१-८-२१.
Leave a Reply