१९१७ सालातील गोष्ट आहे. एका मूर्तिकाराने, मेणाच्या हलत्या बाहुल्यांचं प्रदर्शन मुंबईत भरवलेलं होतं. त्या मुर्तिकाराची इच्छा होती की, लोकमान्य टिळकांनी ते प्रदर्शन पहावं.. तसं त्यानं टिळकांना भेटून सांगितलं. टिळक आले, त्यांनी त्या मेणाच्या बाहुल्या पाहिल्या व मूर्तिकाराचं मनापासून कौतुक केले व म्हणाले, ‘या मूर्ती फार काळ टिकणाऱ्या नाहीत. शतकानुशतके टिकतील अशा कलाकृती तुम्ही घडवा.’ त्या मूर्तिकारांचं नाव होतं.. शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके!
रघुनाथ यांचा जन्म मुंबईत २७ जानेवारी १८८४ साली झाला. त्यांनी मूर्तिकला किंवा चित्रकला या विषयांचे शिक्षण शाळा अथवा कलाशाळेत जाऊन घेतलेले नव्हते. या दोन्ही कलाविषयींचे ज्ञान, माहिती, कौशल्य त्यांनी स्वकष्टातून व अनुभवातून मिळविले.
फडके यांनी एकदा लोकमान्य टिळकांना, त्यांचं शिल्प करण्यासाठी वेळ मागितला. टिळकांना कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढणे शक्य नव्हते, त्यांनी तसे फडके यांना सांगितले. फडके म्हणाले, ‘मला फक्त दोन तास वेळ द्या.’ टिळक तयार झाले. ते फडकेंच्या समोर खुर्चीवर पगडी विना बसले. फडके यांचे हात वेगाने, प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या माध्यमातून टिळकांना घडवत होते. फक्त दीड तासात फडके यांनी शिल्प पूर्ण केले. टिळक, त्या शिल्पाकडे पहातच राहिले… आज हे शिल्प, केसरी वाड्यात पहायला मिळू शकते…
लोकमान्य टिळकांच्या मनात, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प करण्याचे बरेच दिवसांपासून घोळत होते. फडके यांचे प्रदर्शन व त्यांनी केलेला अर्ध पुतळा पाहिल्यानंतर, त्यांनाच हे काम द्यायचे त्यांनी ठरविले. फडकेंना बोलावून घेतल्यानंतर, टिळकांनी शिल्प कसे हवे ते त्यांना सांगितले. फडके यांनी त्या संगमरवरी शिल्पासाठी, इटालियन मार्बल मागवायला सांगितला. त्यासाठी बराच कालावधी गेला.
फडके जरी उत्तम शिल्पकार असले तरी त्यांनी वेळोवेळी कामासाठी घेतलेल्या कर्जामुळे, ते कर्जबाजारी झाले. देणेकरांच्या तगाद्यांमुळे, त्यांनी काम बंद करुन राणीच्या बागेत आश्रय घेतला. एका महान कलाकारावर अशी वाईट परिस्थिती आली.
१९२० साली लोकमान्य टिळक गेले. त्यांचे पूर्णाकृती शिल्प उभे करण्याचे ठरले. त्या कामाची जबाबदारी एका गृहस्थावर सोपविण्यात आली. त्यांनी फडके यांना शिल्प कसे होईल हे कळण्यासाठी त्याची छोटी मातीची प्रतिकृती करण्यास सांगितली. फडकेंनी त्यासाठी येणारा खर्च सांगितला, तो ऐकून त्या गृहस्थांनी फडकेंना फैलावर घेतले. ‘मातीला असा किती खर्च येणार आहे? तुम्ही कितीतरी पट किंमत सांगत आहात..’ फडके यांनी शांतपणे त्यांना समजावून सांगितले, ‘त्या माती सोबत अजून एक माती वापरावी लागते, तिची किंमत जास्त आहे.’ त्या गृहस्थांना त्या दुसऱ्या मातीचा अर्थ कळला नाही. त्यांनी विचारले, ‘अशी कोणती माती आहे, जिची किंमत एवढी जास्त आहे?’ फडकेंनी उत्तर दिले, ‘माझ्या आयुष्याची माती. मी इतकी वर्ष, या कलेसाठी वाहून घेतलं, त्याची ती किंमत आहे.’ त्या गृहस्थांनी फडकेंनी सांगितलेली किंमत मान्य केली. छोटं शिल्प तयार झालं. त्यावरुन मोठं शिल्प किती उत्तम होईल याची, सर्वांना कल्पना आली..
फडकेंनी शिल्पाची तयारी केली, मात्र धातूच्या ओतकामासाठी त्यांच्याकडे आवश्यक ती सामग्री नव्हती. त्यांनी केलेला प्रयत्न, असफल झाला. ही गोष्ट, धार संस्थानच्या महाराजांच्या कानावर गेली. त्यांना माहित होते की, अशा ओतकामासाठी लागणारी सामग्री बडोद्याच्या महाराजांकडे असणाऱ्या शिल्पकार कोल्हटकरांकडे आहे. त्यांच्या सहकार्याने लोकमान्य टिळकांचं ते शिल्प तयार झालं आणि गिरगाव चौपाटीवर उभं राहिलं..
दरम्यान इटालियन मार्बल आलेला होता. त्यातून फडकेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा, भारत देशातील पहिला अर्धपुतळा तयार केला. १९२३ सालापासून तो पुतळा पुण्यातील सदाशिव पेठेतील, शिवाजी मंदिर या संस्थेत विराजमान आहे..
फडके यांना शिल्पकलेशिवाय साहित्य व संगीत कलेची आवड होती. भास्करबुवा बखले यांना त्यांनी तबल्याची साथ केली आहे. १९३७ साली फडके यांनी विनोदी लेखांचे ‘स्वल्पविराम’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याचवर्षी धार येथील मध्य भारतीय साहित्य संमेलनाच्या, कला व काव्य परिषदेचे, त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.
फडके यांनी धार मध्येच असताना अनेक शिल्पे घडविली. त्यांच्या या शिल्पकलेच्या योगदानाबद्दल भारत सरकारने १९६१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले.
१७ मे १९७२ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. एक मोठा नामवंत शिल्पकार, हे जग सोडून गेला.. चाळीस वर्षांनंतर २०१२ साली, फडके यांच्या नातीने, फडके यांना मिळालेली सन्मान चिन्हे, सुवर्ण पदके ओसवाल ऑक्शनमध्ये विकून टाकली.. ती आता कुणाकडे आहेत, हे माहीत नाही.. प्रत्येक मोठ्या कलाकाराचं हेच दुर्दैव असतं.. त्याच्यानंतर त्यानं केलेल्या ‘आयुष्याच्या मातीचं मोल’ कुणीच करत नाही…
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, ‘पुलं’नी १९६७ च्या एका दिवाळी अंकात, फडकेंवरती ‘माझे एक दत्तक आजोबा’ अशा शीर्षकाचा लेख लिहिलेला आहे.. त्यांच्याच ‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकात फडके यांच्याविषयी लिहिलेलं आहे.. एवढीच, शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांची ‘अखेरची’ शिल्लक!!
१९२३ साली गिरगाव चौपाटीवर उभ्या राहिलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्याला, पुढच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.. मुंबईत, या नव्याण्णव वर्षात आमूलाग्र बदल झाला. तरीही बदलला नाही, तो ताठ मानेनं उभा असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा.. शतकानुशतके तो सांगत राहिल… गाथा, एका ‘आयुष्याच्या मातीची’….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३-५-२२.
Leave a Reply