फ्रांसच्या किनाऱ्यावर एक मोठं तेलवाहु जहाज बरोबर मधून दुभंगल होतं. लाखो टन क्रूड ऑइल समुद्रावर तरंगत होत. इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं जहाज बुडाले होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समुद्रात ऑइल पोलुशन झाले होते. जहाज बुडल्यामुळे पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. जहाजावरील एक चीफ इंजिनीयर सोडून इतर सगळे खलाशी आणि अधिकारी जहाज बुडूनसुद्धा वाचले होते. जो चीफ इंजिनीयर मरण पावला होता तो जहाज बुडण्यापूर्वीच हार्ट अटॅक ने मेला होता. या जहाजवर वाचलेल्या खालाशांपैकी एक खलाशी मला मोटरमन म्हणून माझ्या पहिल्याच जहाजावर भेटला होता. माझ्या पहिल्या जहाजावर मी ज्युनियर इंजिनीयर म्हणून जॉईन झालो होतो.
ज्युनियर इंजिनीयरला फिफ्थ इंजिनियर म्हणून पण बोलल जात असे. चीफ इंजिनीयर हा सगळ्यात वरिष्ठ असल्याने त्याला बडा साहब या नावाने जहाजावर बोललं जात. त्यानंतर सेकंड इंजिनीयरला सेकंड साब बोलत पण त्याला दो साब नाही बोलत. थर्ड आणि फोर्थ इंजिनियरला अनुक्रमे तीन साब आणि चार साब असे बोलले जाते. इंजिन डिपार्टमेंट मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीयर ऑफीसर असतो त्याला सगळे बत्ती साब बोलतात. फिफ्थ इंजिनियरला जहाजावर सगळे खलाशी पांच साब आणि अधिकारी पांचु म्हणून बोलतात. आमच्या कंपनीच्या जहाजावर सगळे खलाशी आणि अधिकारी भारतीय असल्याने एकमेकांशी बोलणं बहुतेक वेळा हिंदीतूनच होत असतं. फ्रान्सच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजावरील मोटरमन हा भारतातील लक्षद्वीप बेटांच्या समूहात असलेल्या मिनिकॉय आयलंड वरील होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे मिनिकॉय आयलंड हा फक्त काही चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचाच आहे, जेथे 99 टक्के लोकं ही मुस्लिम आहेत.
मिनिकॉय आयलंड वरील प्रत्येक घरात कमीतकमी एक खलाशी असतो. जो जहाजवर काम करत नाही तो स्वतःच्या मासेमारी बोटींवर काम करतो. या आयलंड वर एकूण एक वस्तू कोचीन किंवा केरळच्या अन्य बंदरातून समुद्रमार्गानेच आणली जाते. अशा या आयलंड वरील प्रत्येक घरात एक खलाशी असतोच पण हळू हळू आता प्रत्येक घरात एक एक अधिकारी मग तो एकतर डेक ऑफीसर किंवा इंजिनियर व्हायला लागला आहे. तिथे शिक्षणाची काय आणि कशी सोय आहे ते माहित नाही पण बारावी नंतर बहुतेकजण कोचीन किंवा केरळच्या अन्य शहरात जातात असं सांगतात. नारळ आणि भरपूर मच्छी एवढंच काय ते मिनिकॉय आयलंड वरील उत्पन्न त्यामुळे साहजिकच सगळे पुरुष हे खलाशी म्हणून काम असतात. मिनिकॉय आयलंड वरचे सगळेच खलाशी त्यांच्या कामात निष्णात आणि विश्वासू असतात. कधी कधी एखाद्या जहाजावर पंधरा खालाशांपैकी दहा ते बारा जण मिनिकॉय आयलंड वरचे असतात. मलय नावाच्या भाषेत ते एकमेकांशी बोलत असतात, मल्याळम भाषासुद्धा त्यांना बऱ्यापैकी येत असते. त्यांची भाषा इतर कोणाला समजत नसल्याने जहाजावर त्यांना भारतीय फिलिपिनो अस सुद्धा गमतीने बोललं जातं.
मी ज्युनियर इंजिनीयर असतांना माझ्या सोबत असलेल्या मोटरमन ने इंजिनीयर पेक्षा जास्त माहिती आणि काम करण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या. त्याला एकदा तो ज्या जहाजावर होता ते बुडत असतानाचा किस्सा विचारला होता.
तो सांगत होता, जहाज फुल लोडेड होत पण अचानक मधूनच तुटलं गेलं. तेवढं मोठं लोखंडी धूड मजबूत वेल्डिंग ताडताड करत तुटलं. पण जहाजवर बलास्ट टॅन्क असल्याने ते पूर्णपणे बुडायला बराच वेळ लागेल हे आमच्यासारख्या खालाशांना माहित होत याउलट शिकले सवरलेले आणि अनुभवी अधिकारी एकदम हवालदिल झाले होते. जहाज आता बुडणार आणि आपणसुद्धा पाण्यात बुडून मरणार नुसत्या या कल्पनेने बडा साबच्या छातीत दुखायला लागले. चीफ इंजिनीयरला अटॅक आलाय पण जहाज बुडत असताना त्याच्याकडे बघायचं सोडून जो तो स्वतःच्या जीवाचं काय होईल या भीतीने गांगरून गेला होता. फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ असल्याने मदत लवकर मिळेल याची सगळयांना आशा होती पण धीर नव्हता. जहाज बुडत असताना कोणाला धीर राहील. जहाज बुडणार आहे हे लक्षात येताच कॅप्टन ने जवळच्या पोर्ट अथॉरिटी आणि सगळ्या मदत यंत्रणांना कळवले होते. अबनडेंड शिप म्हणून कॅप्टन ने घोषणा केली होती. अर्ध्या तासाच्या आत हेलिकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशन साठी पोचलं होत. हेलिकॉप्टर आल्यानंतर मी पहिले जातो का तू पहिले जातो यावरून हमरीतुमरी सुरु झाली होती. कोणी हवालदिल होऊन रडत होत कोणी किंचाळत होत. जहाज नेमकं त्यावेळी हळू हळू पाण्याखाली जात होत. पूर्णपणे बुडायला अजून बराच वेळ जाणार होता पण कोणाला वाटत होत एकदम अचानक खाली गेलं तर कसं व्हायचं त्यामुळे सगळेच जण धास्तवलेले आणि खचलेले होते. माणूस खचल्यावर कुठल्या पातळीवर जातो त्याच दर्शन होत होतं काही अधिकारी त्यांची जवाबदारी आणि शिक्षण विसरून अत्यंत सामान्य व्यक्तिसारखे वागत होते. कोणी त्यांचे डॉक्युमेंट केबिन मध्ये विसरून आले होते, कोणाचे पैसे कोणाच्या किमती वस्तू केबिन मध्येच राहिल्या होत्या. पासपोर्ट आणि सीडीसी सारखी महत्वाची कागदपत्र हे सगळं जहाजासोबत पाण्याखाली जाणार होत जे परत कधीच मिळणार नव्हतं. बुडालेल्या जहाजावरचे अधिकारी आणि खलाशी म्हणून आयुष्यभर शिक्का लागणार होता. परंतु या अपघातात खलाशी किंवा अधिकाऱ्यांच्या काहीच दोष नव्हता. जहाज फुल लोडेड असलं तरी विदिन द लिमिट होत. स्ट्रक्चरल डॅमेज मुळे जहाज बुडाले होतं. जहाजवरील चीफ इंजिनीयर हार्ट अटॅक मुळे मेला होता पण इतर सर्वांना वाचविण्यात आले होते. लाखो टन क्रूड ऑइल मुळे समुद्राचे आणि पर्यावरणाचे प्रदूषण झाले होते. या सर्वांचा परिणाम म्हणून ऑइल पोलुशनचे नवीन नियम आणि कायदे निर्माण केले गेले.
तो वयस्कर मोटरमन मला पुढे दोन वेळा कंपनीच्या वेग वेगळ्या जहाजावर भेटला होता. पहिल्या जहाजावर पांच साब बोलायचा. दुसऱ्या जहाजावर चार साब आणि नंतर जेव्हा भेटला तोपर्यंत मी तीन साब झालो होतो.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply