नवीन लेखन...

आभाळ हळूहळू काळवंडत जाते आहे…

(Zhou Daxin यांच्या ‘The Sky Gets Dark, Slowly’ या कादंबरीतून साभार)

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व  दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला हा लेख)

आयुष्याच्या उतारवयात आदर काय असतो आणि त्याची महती काय असते हे लख्खपणे जाणवायला लागते. या वयात आसक्ती आणि ओढ काय असते आणि त्यातून मोकळं कसं व्हायचं ते समजतं. निसर्गाचे नियम हेच जगण्याचे नियम असतात. प्रवाहासोबत वाहत राहणे, मनाचा समतोल टिकवून ठेवणे हेच यापुढचे जगणं असणार आहे.


अनेक वृध्द व्यक्ती असं बोलत असतात, की जणू काही त्यांना सगळं माहीत आहे.
वृध्दत्वाकडे वाटचाल करणाऱ्या कित्येक जणांना आपल्याला या रस्त्यावर कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे याची मुळीच कल्पना नसते.

वयाच्या साठीपासून, ज्यावेळी वृध्दत्वाची सावली विस्तारायला सुरुवात होते, तेव्हापासून, आभाळ पूर्ण काळे होणार आहे त्या क्षणापर्यंत, आपल्याला काय काय सोसावं लागणार आहे, याची जाणीव असेल तर आपली गाळण उडणार नाही.

१. तुमच्याभोवतीचे लोक संख्येने कमी कमी होत जाणार आहेत. तुमच्या आईवडिलांच्या आणि आजीआजोबांच्या पिढीतील लोक काळाच्या पडद्याआड गेलेले असणार आहेत, तुमच्या पिढीतली माणसं हळूहळू पराधीन होत जाणार आहेत, आणि तुमच्या पुढची पिढी तिच्या जगण्यात मग्न असणार आहे. तुमच्या दोघांतील एकजण आधी निघून जाणार आहे आणि अभावाने भरलेले दिवस तुमच्या वाट्याला येणार आहेत. आपल्या एकाकीपणाला प्रेमाने कवेत घेऊन एकट्याने कसं जगायचं ते तुम्हाला शिकावं लागणार आहे.

२. समाज तुम्हाला विस्मृतीच्या खाईत लोटून देणार आहे. तुम्ही पूर्वायुष्यात कितीही मोठे का असेनात, कितीही सुप्रसिध्द का असेनात, म्हातारपण तुम्हाला एक सर्वसामान्य म्हातारा किंवा म्हातारी बनवून टाकणार आहे. आता प्रकाशझोत तुमच्यावर असणार नाही. जे तुमच्यानंतर या जगात आले त्यांच्या जगण्याचा कोलाहल तुम्हाला दूर कोपऱ्यात शांतपणे उभं राहून केवळ न्याहाळायचा आहे, त्यांचा हेवा वाटू न देता किंवा स्वत:ची चिडचिड होऊ न देता.

३. यापुढचा रस्ता दगडधोंड्यांनी भरलेला आणि अनिश्चित वळणांचा असणार आहे. हाडं मोडणं, हृदयविकार, मेंदू काम करेनासा होणं, कॅन्सर असे कोण कोण ‘बिन बुलाये मेहमान’ कधीही तुमच्या शरीराचा दरवाजा ठोठावणार आहेत, आणि त्यांना प्रवेश देण्यावाचून तुमच्याकडे गत्यंतर नसणार आहे. आजार आणि दुखणी खुपणी यांना मित्र मानून त्यांच्यासोबतच तुम्हाला जगायचे आहे. कोणत्याही शारीरिक व्याधींविना, शांत आणि सुस्थिर आयुष्य जगण्याची स्वप्नेसुध्दा आता पहायची नाही आहेत. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याची कला आता तुम्ही शिकायला हवी, योग्य आणि पुरेसा व्यायाम करायला हवा आणि या सगळ्यात तुम्ही सातत्य राखायला हवे.

४. बाळ असताना होतं तसं बिछान्यावर खिळलेलं आयुष्य जगायला लागेल याची तयारी करायला हवी. आईच्या पोटातून जन्माला आल्यावर पहिले काही महिने आपण बिछान्यावर आडवे राहून काढले, त्यानंतर आयुष्यात वेगवेगळी नागमोडी वळणे येत गेली, संघर्ष येत गेले, आणि आता वर्तुळ पूर्ण झाले, आता पुन्हा बिछान्यावर आडवे राहून जगण्याचे, इतरांनी घेतलेल्या काळजीवर अवलंबून राहण्याचे दिवस आले. एक फरक आहे, जन्माला आलो तेव्हा काळजी घेण्यासाठी आई होती, आता आपली मुले आपली काळजी घेण्यासाठी असतीलच असे नाही. मुलांनी काळजी घेतली तरी त्याला आईची सर येणार नाही. शक्यता हिच आहे की ज्यांचे तुमच्याशी शून्य नाते आहे असे परिचारक, परिचारिका तुमची काळजी घेतील. त्यांच्या चेहऱ्यावर व्यावसायिक हसू असेल, पण, त्यांच्या मनात तुमच्याविषयीचा कंटाळा भरलेला असेल. शांत पडून रहा, त्रास करुन घेउ नका, काळजी घेणाऱ्यांविषयी कृतज्ञ राहण्याची काळजी घ्या.

५. या वळणांच्या खडतर, खडकाळ रस्त्यांवर ना ना ठग, घोटाळेबाज तुम्हाला भेटतीलच. वृध्दांकडे मोठी बचत साठविलेली असते हे ते जाणून असतील आणि या ना त्या मार्गाने खोटे फोन करून, मेसेज करून, इमेल करून ते तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला ना ना आमिषे दाखवतील, झटपट श्रीमंत होण्याच्या योजना सांगतील, टिकाऊ उत्पादने विकण्याचा बहाणा करतील, सुखांची लालूच दाखवतील. लक्षात ठेवा, त्यांची नजर तुमच्या पैशांवर असेल. सावध असा, काळजी घ्या, तुमचा पैसा जपून ठेवा. मूर्ख माणूस आणि त्याचा पैसा फार वेळ एकमेकांच्या संगतीत राहू शकत नाहीत. तेव्हा तुमचे पैसे जपून आणि शहाणपणाने खर्च करा.

आभाळ पूर्ण काळवंडून जाण्याआधी, उजेड मंद मंद होत जाईल, रस्ता धूसर होत जाईल आणि चालत राहणे अधिकाधिक कठीण होत जाईल. साठीनंतरचे आयुष्य जसे आहे तसे स्वीकारायचे, जे आपल्याकडे आहे त्याचा शक्य असेल त्याप्रमाणे उपभोग घ्यायचा. समाजाच्या समस्या, मुलांच्या आणि नातवंडांच्या जगण्यातील कटकटी स्वत:च्या मानून चालण्याचे काहीच कारण नाही. नम्र रहा, वयाचा गैरफायदा घेउन इतरांवर करवादू नका. त्याचा तुम्हाला जेवढा त्रास होईल तेवढाच इतरांनाही होईल. आयुष्याच्या उतारवयात आदर काय असतो आणि त्याची महती काय असते हे लख्खपणे जाणवायला लागते. या वयात आसक्ती आणि ओढ काय असते आणि त्यातून मोकळं कसं व्हायचं ते समजतं. निसर्गाचे नियम हेच जगण्याचे नियम असतात. प्रवाहासोबत वाहत राहणे, मनाचा समतोल टिकवून ठेवणे हेच यापुढचे जगणं असणार आहे.

आत्ताच तर कुठे दिवस उजाडला होता, आणि संध्याकाळचे सहा कधी वाजले कळलंच नाही

आत्ताच तर सोमवार आला होता, आणि आज शुक्रवार आला सुध्दा… महिना संपत आला आहे… वर्ष संपत आलं आहे…

आयुष्यातली ५०, ६०, ७० वर्षं संपली देखील

आता परत फिरायचं म्हटलं तरी खूप उशीर झाला आहे….

म्हणून, उरलासुरला वेळ आहे तो कारणी लावूया ….

जे आवडतं ते करायचं थांबवायला नको…..
या करडेपणात शक्य तितके रंग भरुया ……

छोट्या छोट्या गोष्टीत हसू या, ते हासू आपल्या हृदयाला मलम लावेल …

आणि हा उरलेला वेळ शांतपणे उपभोगत

राहूया

‘नंतर’ हा शब्द वजा करून टाकू…

नंतर करेन, नंतर बोलेन, याचा विचार नंतर करेन …

प्रत्येक गोष्ट आपण नंतर करणार असतो जसा काय भविष्यकाळ आपलाच गुलाम आहे..

कारण, आपण हे उमगून घेत नाही की कॉफी थंड झाल्यावर …
प्राधान्यक्रम बदलून गेल्यावर …
जगण्यातले लावण्य मोडून पडल्यावर …
आरोग्य हरवून गेल्यावर मुले मोठी झाल्यावर …
आईवडील वृध्द झाल्यावर वचनांचा विसर पडल्यावर दिवस काळवंडून रात्र झाल्यावर आयुष्य संपून गेल्यावर खूप उशीर झालेला असतो म्हणून ‘नंतर’साठी काही शिल्लक ठेवू नका …

कारण नंतरची वाट बघता बघता आपण आयुष्यातील सर्वोत्तम क्षण गमावून बसतो,

सर्वोत्तम अनुभव, सर्वोत्तम मित्र, सर्वोत्तम कुटुंब

योग्य दिवस आज आहे, योग्य क्षण आत्ता.
आजची गोष्ट उद्यावर ढकलून द्यायचं आपलं वय सरून गेलं आहे, जे आत्ता करायला मिळतं आहे, ते आत्ताच करायला हवं …

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व  दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेला हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..