नवीन लेखन...

आभाळाचे खांब : १

प्रश्न ब्रह्मेश्वर सरांच्या मुलांचा नव्हता वा नातवंडांचा नव्हता. जवळच्या, दूरच्या नातेवाईकांचंही काही म्हणणं नव्हत.
तरीही गदारोळ चालला होता आणि कितीतरी तास तो चालूच होता. संस्थेची सर्वसाधारण सभा सुरू होती. सभागृहात काय चाललंय हे ध्वनिक्षेपण यंत्रणेमुळं बाहेर सर्वदूर ऐकू येत होतं .

मोठ्या मैदानात शिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी एकत्र बसले होते. त्यातले काही तर परराज्यातून, परदेशातून आले होते, शिक्षण संस्थेवरच्या प्रेमापोटी. ब्रह्मेश्वर सरांवरील आदरापोटी. उन्हातान्हाची पर्वा न करता अनेक नागरिक एकत्र जमले होते. तेसुद्धा ब्रह्मेश्वर सरांवरील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आत सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होती. सभा असं म्हणायचं, पण प्रत्यक्षात युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं. दोन तट पडले होते. महत्वाचा विषय चर्चेला आला होता.

ब्रह्मेश्वर सरांनी स्थापन केलेल्या संस्थेचं नाव बदलून एका राजकीय पुढाऱ्याच्या दिवंगत आजोबांचं नाव संस्थेला देण्यात यावं, त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असा ठराव पारित करावा म्हणून पुढाऱ्याच्या समर्थकांनी गोंधळ सुरू केला होता.त्या पुढाऱ्याचे वा त्याच्या आजोबांचे त्या शिक्षण संस्थेत काहीच योगदान नव्हते. केवळ प्रसिद्धीसाठी आणि भविष्यात संस्थेला मदत मिळवून देण्याच्या आश्वासनासाठी हा घाट घातला गेला होता. काही सदस्यांकरवी संस्था ताब्यात घेण्याचा हेतू उघड होत चालला होता. त्यासाठी सदस्यांच्या एका गटाला हाताशी धरून लोकशाही पद्धतीने बहुमताने ठराव पारित करण्याचा प्रयत्न सुरू होता.

पण सरांना मानणाऱ्यां सदस्यांनी प्रचंड विरोध करायला सुरुवात केली होती.कारण त्या पुढाऱ्याचे अंतःस्थ हेतू सर्वाना माहीत होते. त्याचा त्या जमिनीवर डोळा होता. हळूहळू संस्था हडप करण्याचा त्याचा प्लॅन होता. शिक्षक भरती, कर्मचारी भरती, विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया, अन्य अनुदाने या सर्वांत असणाऱ्या आर्थिक हितसंबंधावर त्याचा डोळा होता आणि हे उघड गुपित होते.

पण ब्रह्मेश्वर सरांवर निष्ठा असणाऱ्यांना हे मान्य नव्हते. ही शिक्षण संस्था आहे, इथे ज्ञानाशी संबंधित असेच काही व्हावे आणि त्यासाठी जे काही करायचे ते करू या या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण जमले होते, त्यांना त्या पुढाऱ्याचा हेतू , मानभावीपणा मान्य नव्हता.

ब्रह्मेश्वर सरांनी खूप मेहनत घेऊन संस्था स्थापन केली होती. अतोनात कष्ट उपसले होते. शहरातली अत्यंत मोक्याची पाच एकर जागा संस्थेसाठी दिली होती. शेवटी शेवटी तर त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली होती. त्यातच ते गेले. मग नातेवाईकांनी, विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून इमारती बांधल्या. गुणवत्तेमुळं, विद्यार्थ्यांच्या यशामुळं, शिक्षकांच्या अपार मेहनतीमुळं संस्था अल्पावधीत नामांकित झाली होती आणि अशी संस्था कुठल्यातरी संधीसाधुच्या घशात जावी हे कुणालाही पटलं नसतं.

झालंही तसंच. एखाद्या चित्रपटात शोभावा तसा शेवट झाला, त्या सभेचा. सगळे विद्यार्थी, नागरिक झुंडीनं आत शिरले आणि गैरमार्गानं संस्था बळकावू पाहणाऱ्यांना बाहेर काढलं.संस्था ब्रह्मेश्वर सरांचीच राहिली. दहा वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या सरांच्या आत्म्याला आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली गेली.

कथा इथे संपते, पण एक नवे वास्तव जन्माला घालून!

महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था आज कार्यरत आहेत. त्या ज्यांनी स्थापन केल्या, ज्या परिस्थितीत स्थापन केल्या, ज्या उदात्त उद्दिष्टांसाठी स्थापन केल्या, त्यासाठी अपार कष्ट वेचले, घरादारावर संपत्तीवर, जमिनीवर तुळशीपत्र ठेवले, स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबीयांचा विचार केला नाही, त्याग हाच जीवनाचा आचारधर्म ठेवला, समाजाला ज्ञान देणं, त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सेवासुविधा उपलब्ध करून देणं, शुद्ध, प्रामाणिक आचारविचार ठेवून समाजाला दिशा देण्यासाठी सतत कार्यरत राहणं आणि स्वतःच्या नावासाठी, प्रसिद्धीसाठी काहीही न करणं हाच ज्यांनी जीवनधर्म मानला त्या शिक्षण संस्था आज कशा आहेत, याचा विचार करणं आता क्रमप्राप्त आहे.

कर्तृत्वाचं आभाळ निर्माण करण्यासाठी अनामिक राहणारे अदृश्य स्वरूपातील असंख्य खांब आजच्या पिढीला माहीत असायला हवेत. त्यासाठी त्या त्या शिक्षणसंस्थानी प्रयत्नरत राहायला हवं. न दिसणारे आभाळाचे खांब शब्दांच्या, चित्रांच्या, विचारांच्या माध्यमातून दाखवायला हवेत.

अन्यथा जात, पात, धर्म, पंथ, राजकारण आणि स्वार्थ यात गुंतून गेल्यानं नव्या पिढीच्या डोक्यावरचं आभाळ हरवून जायला वेळ लागणार नाही आणि मग काळ कुणालाही क्षमा करणार नाही!

— डॉ . श्रीकृष्ण जोशी 

रत्नागिरी.

९४२३८७५८०६

ही कथा काल्पनिक असली तरी आशय खरा आहे .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 121 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..