नवीन लेखन...

जनाबाईचे अभंग

जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.

तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.

कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’

त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’

त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’
यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.

मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’

आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’
आता कबीरजी चकित झाले होते.

सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.

कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’

जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.

कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.

जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.

जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’

कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.

एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.

— WhatsApp वरुन 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..