खरं तर तिला कोठल्याही विशेषणाची/ उपनामाची गरज नाही. विशेषतः भालजी पेंढारकरांसारख्या तपस्व्याने तिचे “भगवान श्रीकृष्णाची हरवलेली बासरी ‘असे केलेले समर्पक वर्णन वाचल्यावर मी तोकडा पडतो. ती स्वयंभू आहे.
पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मदतीसाठी तिने २००३ साली एक कार्यक्रम केला होता- सुरेश वाडकर , सोनू निगम अशा सहकलाकारांसमवेत ! दस्तुरखुद्द लताला गाताना पाहायचे /ऐकायचे (तेही पहिल्यांदाच ) या कल्पनेवर फिदा होत आम्ही सहकुटुंब त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिचे दर्शन तसे दुर्मिळ !
(सियाट मधील माझे सहकारी अनंतराव पंडितांच्या सौ. नी लता चे एक पेन्सिल स्केच काढले होते त्यावर लताची सही मिळविण्यासाठी त्यांनी केलेली धडपड मला माहीत होती. तरीही त्या भेटू शकल्या नाहीतच. एका मैत्रिणीने त्यांच्यासाठी हे काम केले.)
कार्यक्रम बहारदार झाला. समाधानात रात्री घरी परतलो.
नंतर त्यांचे वाद्यमेळ -नियोजक (arranger ला हा पर्यायी शब्द कसा वाटतो?) श्री. अनिल मोहिलेंची वर्तमानपत्रात एक मुलाखत वाचली – पुण्यातील या कार्यक्रमासाठी याही वयात लता मंगेशकरांनी सलग पंधरा दिवस न थकता तासंतास तालीम केली होती. खरंतर त्यांनी गाताना काही चूक केली तर ती सहजासहजी कोणाच्या लक्षातही येणार नाही. पण श्रोत्यांच्या लक्षात येवो न येवो , माझ्या नजरेतून ती सुटणार नाही आणि चूक मला मान्य नाही. तीस -चाळीस वर्षांपूर्वी गायलेली गाणी आज तितक्याच सुरेलपणे आणि गुणवत्तापूर्व असायला हवी हा परिपूर्णतेचा ध्यासच माणसाला “अभिजात “बनवत असतो. स्वतःच्या निवडलेल्या कार्यक्षेत्राशी बांधिलकी , पैसे देउन येणाऱ्या श्रोत्यांचे भान आणि वडिलांचे नाव हॉस्पिटलशी निगडित असणे व त्यासाठी हा कार्यक्रम आहे (त्याला बट्टा लागू नये ) या सर्वांचा विचार त्यांना एका अशा उंचीवर नेउन ठेवतो की तिथे आपली नजरही पोहचणे अशक्य !
लताच्या काळात आपण असणं, तिला “याचि देही “पाहणं याहून अधिक काय हवं ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply