माझ्या भावाने बाबा आमटेंच्या काव्यसंग्रह प्रकाशन समारंभातून त्यांचे पुस्तक (“ज्वाला आणि फुले” ) विकत आणले आणि आमटे कुटुंबाचा आमच्या घरात प्रवेश झाला. त्यांच्या ज्वालाग्राही शब्दांनी झडझडून जाग आणली. तेव्हापासून मनात त्यांना भेटण्याची इच्छा मनात होती. खूप उशीरा ती फलद्रूप झाली. एका डिसेंबर महिन्यात सहकुटूंब आनंदवनात गेलो. त्याआधी “पल्लवी आमटे “या नव्या पातीशी पत्रव्यवहार आणि कागदी ओळख झाली होती. एका संध्याकाळी व्हाया नागपूर त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश केला. घरगुती स्वागत झाले, खोली अलॉट झाली.
” बाबा संध्याकाळच्या फिरस्तीवर निघाले आहेत, लगेच गेलात तर भेट होईल.”
सांगावा आल्यावर आम्ही त्यांच्या परिक्रमेच्या मार्गावर उभे राहिलो. थोडयावेळाने त्यांच्या “पालखीतून ” बाबा आले . सोबत काही सहकारी होते.आम्ही तेथेच दर्शन घेतले. चेहेऱ्यावर गांधीजींचे /बुद्धाचे मंद स्मित ! काळाच्या छाताडावर कायम लत्ताप्रहार करून अंतसमयी शरीरभर झालेली दमणूक ! हळूवार स्वरात आमची विचारपूस, सोय वगैरेची चौकशी !
नंतरचा दिवस आनंदवनाचे आक्रीत समजून घेण्यात गेला. सगळीकडे मानवी कर्तृत्वाचे विजय नजरेस पडले. स्वतःवर विश्वास बसायला लागला. कवितांमधील शब्द तेथे जागोजागी दृश्यस्वरूपात उगवलेले दिसले. अचानक डॉ विकास आमटेंची भेट झाली. दुसऱ्या दिवशी बाबांचा वाढदिवस होता. सारे कुटुंबीय जमले होते. अगदी योगायोगाने आम्ही तेथे होतो. फक्त प्रकाश आणि मंदाताई आल्या नव्हत्या. विकासजींशी खूप गप्पा झाल्या. नव्या -जुन्या प्रकल्पांबद्दल ते भर भरून सांगत होते. वडिलांच्या स्वप्नांची कावड राजीखुशीने त्यांनी खांदयावर घेतली होती आणि “पुत्र सांगती चरित्र पित्याचे ” आम्ही त्यांच्या तोंडून ऐकत होतो.
साधनाताईंच्या खोलीत त्यांना भेटायला गेलो. चारही दिशांना साधनाताईंना व्यापून उरलेल्या बाबांचा जागता वावर जाणवत होता. मंद पण ठाम स्वर ! आपुलकीची विचारपूस ! चेहेऱ्यावर गोड स्मितहास्य ! सुनीताबाईंशी (सौ. पु .ल.) साधर्म्य असलेली चेहरेपट्टी ! “समिधा “पण बरोबर घेउन आम्ही त्यांचा निरोप घेतला.
दुपारी एक धक्का आमची वाट पाहात होता. बाबांच्या वाढदिवसानिमित्त खास पंगत होती. आम्हाला त्याचे निमंत्रण आले -आनंदवनाचे पाहुणे म्हणून ! निवडक १५-२० मंडळी ! साधनाताई देखरेख करत होत्या. मॅगसेसे पुरस्कार ज्यांच्या घरी वास्तव्यास आलाय, त्या घरातील कुटुंबीय आम्हाला वाढत होते. स्वतः भारतीताई आग्रह करीत होत्या. कोठलाही देखावा नाही, सारे पुरस्कार दाराबाहेर ! घरगुती सोहोळा -बडेजावाविना ! आपुलकी, आदरातिथ्य जाणवत होते. आपल्या आजोळी आजीच्या उपस्थितीत जेवत असल्यासारखे वाटले.
मुक्काम संपवून आनंदवनाचा निरोप घेतला.
हिमालयापेक्षाही उत्तुंग माणसे लहान वयातच आमच्या मुलाने अनुभवावीत असा असलेला आमचा अट्टाहास सफल झाला.
काही वर्षांनी बाबा आणि ताई निवर्तले. आनंद स्मृती अद्यापही मनात ताज्या आहेत.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply