टीव्हीवरील “सत्यमेव जयते” मालिका आता लोकप्रिय होतांना दिसल्याने नतद्रष्ट्रांच्या डोळ्यात खुपायला लागले आहे. समाजातील अनिष्ट चालीरीती, परंपरा, गुन्हेगारी, फसवेगिरी तसेच भ्रष्टाचार अशा विविध बाबींवर जनजागृती करणारा स्तुत्य उपक्रम ठरत आहे.
वैद्यकीय व्यवसायातील लोक बेईमानी आणि फसवेगिरी कशी करतात हे पुराव्यासह दाखविल्यावर मात्र ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ व तत्सम वैधकीय संघटनांनी आगपाखड करायला सुरु केले. आमीर खानने पुराव्यासह जे दाखविले त्यात गैर काय आहे ? कमिशनबाजीचे प्रकार भारतातील वैधकीय व्यवसायात नाही काय ? जे डॉक्टर कमिशन घेत नाही, त्यांनी घाबरण्याचे काय कारण ? डॉक्टरांच्या कमिशन घेण्याच्या प्रकाराने, अनेकांचे जीव गेल्याचे सरकार दप्तरी नोंद नाही काय ? हे सगळे माहित असूनही ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ प्रामाणिकपणाचा आव का आणत आहे ? स्वतःच्या संरक्षणासाठी संसदेला स्वतंत्रपणे कायदे बनविण्यास भाग पडणाऱ्या डॉक्टरांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
‘आमीर खानने माफी मागावी’ अशी मागणी करणाऱ्या डॉक्टरांनी, फसवेगिरी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी कधी केली काय ? आमीर खानच्या रक्तात “मौलाना अबुल कलम आझाद” या देशभक्तांचे रक्त तरी आहे, माफीची अनाठायी मागणी करणाऱ्यांनी सांगावे, कोणा शहीद देशभक्ताचे ते वंशज आहेत ?
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ च्या डॉक्टरांनी, सर्वप्रथम देशाची माफी मागावी. आणि तशीच मागणी आमीर खानने केली, त्यामुळे त्याचे त्रिवार अभिनंदन !
“सत्यमेव जयते” मालिकेत सहभागी झालेले लोक हे, निश्चितच निरक्षर नव्हते. किवा कोणा स्वार्थाने प्रेरित होऊन आलेले लोक नव्हते. लोकांचा जनआक्रोश ओढवून घेईपर्यंत डॉक्टरांनी हे प्रकरण ताणू नये, अन्यथा त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. यापूर्वी योगगुरु स्वामी रामदेवबाबांनीही वैधकीय व्यवसायावर वारंवार कोरडे ओढले, आणि सत्य जगासमोर मांडले आहे.
“सत्यमेव जयते” मालिका ही विविध विषयांना हाताळीत आहे, पुढे भ्रष्टाचार करणाऱ्यांचा भांडाफोड केल्यास त्यांनीही अशीच मागणी करावी काय ? आणि जनतेने सर्व सहन करावे काय ? वैधकीय व्यवसायातील गैरप्रकार हा भारत देशाला लागलेला अभिशाप आहे ! जे कमिशन घेत नाही त्यांनी मनाला लावून घेण्याचा प्रश्नच नाही. उलट आमीर खानचे अभिनंदन करून, वाईट प्रवृत्तींचा निषेध करायला हवा.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply