नेहमीप्रमाणे संध्याकाळी बातम्या बघण्यासाठी राजूनी टीव्ही लावला. आधल्याच दिवशी कोकणपट्टीला एका वादळाने झोडपलं होतं. नयनरम्य “निसर्ग” हीच ओळख असणाऱ्या कोकणाची वाताहात करणाऱ्या त्या चक्रीवादळाचं नावसुद्धा “निसर्ग” होतं यासारखा विसंगत योगायोग नव्हता. रायगड जिल्ह्यातल्या गावांना त्याचा जास्त तडाखा बसला होता. त्याच संदर्भातल्या बातम्या सगळ्या वाहिन्यांवर सुरू होत्या. हा जपमाळेप्रमाणे एकेका चॅनलचे मणी पुढे पुढे ढकलत होता. असाच घाईघाईत पुढे गेला आणि जरा ओळखीचे चेहरे वाटले म्हणून पुन्हा मागे आला. काहीसे वयस्कर काका-काकू त्यांच्या घराची उडालेली कौलं , पडलेली झाडं भरलेल्या डोळ्यांनी त्या वार्ताहाराला दाखवत होते. भेदरलेल्या आवाजात काल रात्रीच्या वादळाचा भयंकर अनुभव सांगत होते. राजूनी त्यांना टीव्हीवर बघताच लगेच ओळखलं होतं ..
“ होss …. तेच आहेत हे ss …. दिवे आगार चे काका काकू!!”
असं स्वतःशीच पुटपुटत त्याचा रिमोट वरचा हात आणि मन तिथेच स्थिरावलं …
दिवे आगार .. सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं एक छोटसं गाव. तिथे सोन्याचा गणपती मिळाला आणि अचानक गावाकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. गावकऱ्यांना सुद्धा उत्पन्नाचं एक साधन मिळालं आणि बऱ्याच रहिवाशांनी आपली राहती घरं पर्यटकांना भाड्याने देण्यास सुरुवात केली. जसा ओघ वाढत गेला तसं काहींनी घरच्या अंगणात वगैरे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत काही नवीन खोल्या बांधत आपला व्यवसाय वाढवला. अशाच अनेक घरांमधलं एक घर म्हणजे या काका काकूंचं.. तशी राजूची आणि त्यांची फार ओळख होती अशातला भाग नाही पण त्यांच्याकडे जाणं झालं होतं दोन-तीनदा .
राजू त्यांना पहिल्यांदा भेटला ते केवळ काही तासांसाठी. कॉलेजमधल्या आपल्या एका अमराठी मित्रासोबत कोकणात पुढे जाता जाता थोड्यावेळासाठी म्हणून दिवे आगरात शिरले. जेवणासाठी या काका-काकूंचं नाव एकाने सुचवलं होतं म्हणून तिथे जेवायला गेले. अंगात बनियान , पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि खांद्यावर पंचा घेतलेल्या मध्यम शरीरयष्टीच्या काकांनी आपुलकीने स्वागत केलं. आधीचे काही जण जेवत होते. त्यांचं होईपर्यंत यांना बसण्यासाठी काकूंनी लगबगीने दोन खुर्च्या आणल्या. पाणी दिलं. काका-काकू दोघेही आलटून पालटून आधीच्या मंडळींना काय हवं नको ते बघत होते आणि मधल्या वेळेत यांच्याशी गप्पा मारायला येत होते. एकंदरीत त्या वास्तूत अगदी चैतन्यमय वातावरण होतं. काही मिनिटातच त्याला अगदी घरच्यासारखं वाटू लागलं. थोड्यावेळाने हे दोघंसुद्धा जेवायला बसले. राजू मुळात गप्पीष्ट , त्यात काका-काकू सुद्धा बोलक्या स्वभावाचे त्यामुळे जेवता जेवता एकीकडे मनसोक्त गप्पा सुरू होत्या. हा मुंबईचा आहे म्हंटल्यावर काका सांगू लागले ..
“ आमचा थोरला मुलगा मुंबईत असतोss . बरीच वर्ष झाली तिथेच आहे एका कंपनीत . धाकटा असतो माझ्याबरोबरच . तो बघतो हे सगळंss.. पण नेमका जरा दापोलीला गेलाय कामासाठी. नाहीतर भेटला असता आज !!” .
जेवणातल्या रुचकर पदार्थांचं भरभरून कौतुक करून सुरू झालेल्या गप्पांची गाडी ; नंतर आजूबाजूच्या गोष्टी ,काही नातेवाईकांच्या निघालेल्या ओळखी , कोकणाची असलेली आवड, रस्ते, निसर्ग, समुद्र,ओले काजू, तांदुळाच्या फेण्या वगैरे असं सगळं करत करत पुन्हा एकदा समोर पानात असलेल्या कोकणातल्या अस्सल चविष्ट पदार्थांवर आली.
“ काकू ss .. हे कुळथाचं पिठलं कमाल झालंय ..अगदी माझी आजी करायची तसं आणि .. काका ss आज बटाट्याची भाजी आहे पण तुम्हाला सांगतो ss .. मला फणसाची भाजी खूप म्हणजे अगदी प्रचंडच आवडते. .. जीव की प्राण !!”
एव्हाना इतकं घरगुती वातावरण तयार झालं होतं की ते ऐकून काकू पटकन म्हणाल्या ..
“ कालंच केली होती फणसाची भाजी.. आहे थोडी शिल्लक .. देऊ का चटदिशी गरम करून ??”
“ अगं काही काय विचारतेस ? .. असं शिळं अन्न द्यायचं का पाहुण्यांना ? “ ..
काकांना व्यवसायाचही भान ठेवायचं असल्याने त्यांनी काकूंना लगेच थांबवलं.
काकूंनी सुद्धा जीभ चावली आणि म्हणाल्या ..
“ सॉरी हं .. पटकन बोलून गेले मी !!”
“ अहो ss .. सॉरी काय ?? काहीच प्रॉब्लेम नाही .. आपापल्या घरी खातोच की आपण आधल्या दिवशीचं ….त्यात काय ..आणि फणस तर माझा विक पॉइंट .. आणा तुम्ही बिनधास्त …माझ्या तर तोंडाला नुसतं नाव ऐकूनच पाणी सुटलंय !!“
शेवटी काकूंनी भाजी आणली आणि साहेबानी चांगलाच ताव मारला . फणसाची भाजी खाताना राजूला झालेला आनंद बघून काका-काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र अजिबात लपत नव्हता. सगळ्या व्यावसायिक गणितांच्या पुढचं समाधान होतं ते.
त्यानंतर काही वर्षांनी राजू आपले आई-वडील आणि काही नातेवाईकांना दोन-तीन दिवसांच्या सहलीसाठी दिवे आगारला घेऊन गेला. राहायला अर्थातच या काका-काकूंच्या घरी . त्यांच्याकडे वर्षाकाठी हजारोंनी माणसं येऊन जातात त्यामुळे त्यांनी राजूला ओळखणं कठीण होतं पण याच्या मनात मात्र त्या जोडप्याचे चेहरे अगदी काल-परवा भेटल्यासारखे स्पष्ट होते. मोठ्या हौसेने आणि कौतुकाने हा आपला गोतावळा घेऊन त्यांच्या निवासस्थानी दाखल झाला. काका-काकू अगदी तसेच . तीच आपुलकी. तेच आदरातिथ्य . काकांचं बोलणं पूर्वी इतकंच शांत तर काकूंचा वरच्या पट्टीतला पण तितकाच प्रेमळ आवाज सुद्धा अगदी तसाच.
दुसऱ्या दिवशी दुपारी सगळे दणकून जेवले आणि गरजेच्या वामकुक्षीसाठी आपापल्या खोल्यात गेले. काका बाहेर पडवीतल्या लाकडी बाकावर बसले होते. पुढ्यात ठेवलेली बडीशेप चरत हा उगाच त्यांच्या बाजूला जाऊन बसला. इतक्यात काकू सुद्धा सगळं आवरून आल्या आणि बाजूच्या पायरीवर बसल्या . पुन्हा गप्पा सुरू होणं स्वाभाविकच ..
राजूने गेल्यावेळचा फणसाच्या भाजीचा किस्सा सांगितल्यावर त्यांना आठवला. बोलण्याच्या ओघात राजूने विचारलं ..
“ तुमचा मुंबईतला मुलगा काय म्हणतोय?”
“ मस्त मजेत .. आत्ता गेल्याच आठवड्यात येऊन गेला. शेजारच्या पोह्याच्या मिल मधून गाडीभरून पोहे घेऊन गेला. मुंबईच्या मित्रांना खूप आवडतात आमच्या आगरातले पोहे !!”
“ हो तर.. मी सुद्धा घेऊन जाणारच आहे .. आणि तुमचा दूसरा मुलगा दिसत नाही ? …तो इथेच असतो ना ?..
गेलयावेळेस पण भेट नव्हती झाली त्याची !!”.
काका काकू दोघेही गप्प .. काकांनी काकूंकडे निर्विकारपणे बघितलं … काकू सुद्धा एकदम स्तब्ध. आपण काहीतरी गोंधळ घातलाय याची राजूला कल्पना आली म्हणून सावरून घेण्यासाठी तो म्हणाला ..
“ सॉरी काका …. मला मागे तुम्ही तसं म्हणाल्यासारखं वाटलं म्हणून विचारलं … बहुतेक ऐकण्यात काहीतरी गडबड झाली असावी माझी !!” .
काकूंकडे बघत काहीश्या कापऱ्या आवाजात काका म्हणाले ..
“ बघ गं ss … लांब लांबची लोकं पण आठवण काढतात लेकराची !!”
काकू लाल झालेल्या पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला म्हणाल्या
“ तो ssss .. एका अॅक्सिडेंट मध्ये गेला sss .. दोन वर्ष झाली !!” ..
हे ऐकून राजूला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं.
“ अरे बाप रे !! मला काहीच कल्पना नव्हती … खरंच सॉरी !!” ..
उगाच अजून त्याबद्दल विचारून त्यांना त्रास होऊ नये म्हणून याने विषय बदलला. थोडावेळ गप्पा मारून तोही डुलकी काढायला गेला. अपेक्षेप्रमाणे सगळ्यां नातेवाइकांनी धमाल केली आणि ठरलेल्या दिवशी तिथून निघाले. बिल वगैरे देऊन झाल्यावर काकांनी एक वही दिली. “अभिप्राय” लिहायला. निघण्याच्या गडबडीत त्यानी वरचे खालचे अभिप्राय बघून काहीतरी नेहमीचीच एक दोन वाक्य लिहिली आणि परतीच्या प्रवासाला निघाले.
दोन-तीन वर्षांनी राजू पुन्हा एकदा दोन मित्रांसोबत तिथेच गेला. रात्री जेवण वगैरे आटोपून सगळे खोलीत गेले. संध्याकाळी समुद्रावर भिजून दमल्यामुळे एक मित्र रात्री जरा लवकरच झोपला. दूसरा मित्र बराच वेळ फोनला चिकटला होता. राजूला उशिरापर्यंत झोप येत नव्हती म्हणून हा पाय मोकळे करत पडवीत आला. बाहेर नीरव शांतता होती. रातकिड्यांची किरकिर मात्र अधूनमधून सुरू होती. त्याच जुन्या लाकडी बाकावर एका मिणमिणत्या दिव्याखाली काका मांडी घालून बसले होते. चष्मा लावून कुठलासा मोठा ग्रंथ वाचत होते. थोडे निराश वाटत होते. राजूला बाहेर आलेलं बघून चष्मा खाली करत म्हणाले …
“ या या … बसा !!.. “
तो लगेच बाजूला जाऊन बसला. शेजारी बघितल्यावर लक्षात आलं की तो ग्रंथ नाही तर एक जाडजूड “अभिप्राय वही” होती ती. पुढची काही मिनिटे काका वेगवेगळी पानं उलटत एकटेच वाचत होते. मध्येच एका पानावर येऊन थांबले. ती वही राजूला दाखवत म्हणाले ..
“ हे बघाss.. किती आणि काय काय लिहून ठेवलंय लोकांनी .. हे गृहस्थ नागपूरचे होते .. त्यांच्या जबलपूरच्या पाहुण्यांना घेऊन आले होते .. किती सुंदर प्रतिक्रिया ss .. आणि ss .. हे बघा … पुण्याच्या शिक्षिकांचा ग्रुप होता .. किती अलंकारीक लिहिलंय ..
चष्मा काढत काकांनी राजूच्या हातात वही दिली आणि पाणावलेले डोळे अलगद पुसू लागले. हा वही चाळू लागला. बऱ्याच जणांनी भरभरून कौतुक केलं होतं , काहींनी आपुलकीने काही सूचना केल्या होत्या , कुणी कविता-चारोळी केली होती , कुणी सुंदर हस्ताक्षरात लिहिलं होतं , कुठे लहान मुलांनी सुद्धा त्यांच्या परीने काही लिहिलं होतं ..वाचता क्षणी हसू फुटेल असं विनोदी अंगानी काही प्रतिक्रिया होत्या. एकांनी तर काका काकूंचं अप्रतिम व्यंगचित्र सुद्धा काढलं होतं. असे सगळे एकापेक्षा एक अभिनव आणि कौतुकाचा वर्षाव असणारे अभिप्राय बघून तो सुद्धा भारावून गेला. एकीकडे काका बोलतच होते .मात्र जरा दाटून आल्यामुळे आता काकांचा आवाज थोडा घोगरा झाला होता .
“ बघा हो ss .. अजून काय पाहिजे माणसाला ?? .. हे असं सगळं वाचलं तर खूप छान वाटतं .. उभारी मिळते .. बाकी पैसा वगैरे ठीक आहे हो ss .. जगायला लागतो ss .. गरजेचाच आहे ss .. म्हणून मिळवायचा , पण ही खरी संपत्ती .. आयुष्यात काय मिळवलं ??.. तर हे ss .. खरंच समाधान आहे हो यात … आम्हाला दोघांनाही कधी उदास वाटलं ,सीझन नसला किंवा एकटेपणा जाणवला की रात्रभर निवांतपणे वाचत बसतो .. खूप उत्साह वाटतो .. चार्जिंग होतं हो ss मोबाईलसारखं ss !! “..
राजूसुद्धा त्या वहीत बराच वेळ रमला . काकांचे आजवरचे काही अनुभव , किस्से ऐकण्यात मग्न झाला. अशा गुजगोष्टींनीच दिवसाची सांगता झाली.
दुसऱ्या दिवशी निघताना तीच वही पुन्हा त्याच्या समोर आली पण आता अभिप्राय लिहिण्यासाठी म्हणून. याला कालचं सगळं बोलणं आठवलं. खरं तर बरंच काही लिहावं असं वाटत होतं पण काहीसा भावूक झाल्यामुळे ४-५ ओळीच लिहू शकला. प्रवासात मित्रांना सगळा प्रसंग आणि त्यावरून मनात आलेला विचार सांगितला ..
“ अरे यार .. मोठाल्या फाईव्ह स्टार हॉटेलातल्या फीडबॅक फॉर्म मध्ये गुड-बेटर-बेस्ट सारखं थातुरमातुर लिहिलं तर एकवेळ चालू शकेल कारण त्यातल्या सगळ्याचं शेवटी कॉम्प्युटर मधला डेटा , रेटिंग , पॉईंट्स असलंच काहीतरी होणार पण अशा छोट्या व्यावसायिकांच्या वहीत जर व्यवस्थित आणि मनापासून अभिप्राय लिहिला ना ss तर न जाणो कदाचित दोन-पाच-दहा वर्षांनंतर तो वाचून कुणाच्या तरी चेहऱ्यावर प्रसन्नता उमटेल , कदाचित त्यांच्या वैफल्याच्या काळात आपण लिहिलेले २-४ कौतुकाचे शब्द वाचून त्यांना पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळेल आणि तसं जर झालं तर अप्रत्यक्षपणे आपल्या हातूनही काहीतरी चांगलं घडेल की, तेही अगदी आपल्या नकळत !!”
अविस्मरणीय अशा आठवणींचा ठेवा घेऊन राजू आपल्या घरी परतला. लवकरच संसारात रमला, जबादऱ्यात अडकला.
पुढे बरंच कुठे कुठे फिरला पण या ना त्या कारणाने दिवे आगरात जाणंच नाही झालं. त्यानंतर जवळपास दहा-बारा वर्षांनी ते काका-काकू टीव्हीवर दिसले अन् तेही अशा भीषण परिस्थितीत. घराची झालेली पडझड आणि आजूबाजूच्या परिसराची वाताहात बघून राजूलाही खूप वाईट वाटलं. दोघंही खचल्यासारखे वाटत होते . त्यांचे हताश चेहरे बघताच राजूच्या नजरेसमोर आली ती त्या काका-काकूंचा अनमोल खजिना असलेली “अभिप्राय” वही. जे घडलंय ते तर आता कुणी बदलू शकत नव्हतं. झालेलं आर्थिक नुकसान कदाचित आज ना उद्या भरून निघेलही , विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसेलही पण त्यांना या मानसिक धक्क्यातून बाहेर काढू शकणारी एकमेव गोष्ट होती ती म्हणजे “अभिप्राय” वही.
राजूनी टीव्ही बंद केला आणि मनोमन प्रार्थना केली की या कोपलेल्या निसर्गाच्या तडाख्यातून काका-काकूंसाठी संजीवनी सारखे असणारे ते सगळे “अभिप्राय” तरी निदान सुरक्षित राहिले असू देत.
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply