मोनालिसा बागल… नवोदित अभिनेत्री… पण मेहनती… त्यामुळे कॅमेरा आणि अभिनय याची उत्तम समज….
मराठी सिनेइंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी एक संधीही पुरेशी ठरते, हे अनेक कलाकारांनी याआधीच सिद्ध करून दाखवलंय. उत्तम कलाकृती कलाकाराचं अख्ख आयुष्य बदलायला कधीकधी पुरेशी ठरते आणि हेच मोनालिसा बागल या सध्या चर्चेत असलेल्या अभिनेत्रीबद्दल काहीसं सांगता येईल. मराठी सिने इंडस्ट्रीचा श्रीगणेशा साधारणपणे पाच वर्षांपूर्वी केलेल्या मोनालिसाने काही उत्तम कलाकृती सादर केल्या. मात्र ‘झाला बोभाटा’ हा सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकला आणि मोनालिसाचा चेहरा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. अल्पावधीत यश संपादित केलेल्या मोनालिसाच्या अभिनयाचा प्रवास खडतर जरी नसला तरीही तिची मेहनत, तिचा अभ्यास आणि कलाकृतीच्या बाहेर जाऊन त्यातले अभ्यासलेले बारकावे हेच तिच्या यशाचं गमक सांगता येईल.
हिरवाईने नटलेल्या सातारा गावात जन्माला आलेली अन् निसर्गाच्या कुशीत वसलेल्या लोणावळा इथे आपलं संपूर्ण शालेय अन् महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या मोनालिसासाठी अभिनय हे क्षेत्र तसं फारसं ओळखीचं नव्हतं. अभिनयाबद्दल घरी कोणतंही वातावरण नसताना मोनालिसानं या क्षेत्रात यावं असं तिच्या आईला वाटत होतं आणि हेच आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोनालिसाने २०१४ साली अभिनयाचा श्रीगणेशा केला. अभिनयाचे कोणतेही धडे न गिरवलेल्या मोनालिसासाठी अभिनयाचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. गुरुविना या क्षेत्रात प्रवेश केलेल्या मोनालिसाने तिला मिळालेल्या कामातूनच कलेची शिकवण घेत आपला अभिनय सशक्त केला. ‘प्रेम संकट’ हा मोनालिसाचा पहिला सिनेमा २०१६ साली प्रदर्शित झाला आणि मग तिने मागे वळून पाहिलंच नाही. या सिनेमातल्या तिच्या अभिनयाच्या जोरावर तिला ‘झाला बोभाटा’ या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारण्याची संधी मिळाली. दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, भाऊ कदम अशी स्टारकास्ट असलेल्या सिनेमात मोनालिसाच्या वर्णी लागली आणि या ज्येष्ठ कलाकारांकडून शिकण्याचीही नामी संधी तिला चालून आली. सिनेमा झळकला आणि आपल्या अभिनयानं मोनालिसानं रसिकमन चांगलंच जिंकलं. आपल्या अभिनयाची वेगळी छापच तिने या सिनेमातून पाडली आणि याचं सिनेमाने तिला पुढे अनेक सिनेमाची दारं खुली करून दिली. ‘सोबत’, ‘परफ्यूम’, ‘धिरकीट’ अशा अनेक आगामी सिनेमांतून मोनालिसा आपल्या अभिनयाचे वेगळे पैलू प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.
साधारणपणे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मराठी सिने इंडस्ट्रीत येऊ पाहत असलेल्या एका मॉडेलचं फोटोशूट कारण्यासंबंधित दिग्दर्शक अंकुश मोरे आणि माझ्याकडे फोटोग्राफी शिकत असलेला माझा विद्यार्थी प्रथमेश नायबागकार याने मला विचारलं होतं. मोनालिसाचं प्रोफाइल लक्षात घेऊन आणि त्यावेळी तिचा आगामी सिनेमा लक्षात घेऊन एका नामांकित वृत्तपत्रासाठी आणि नियतकालिकेसाठी मी तिचं फोटोशूट केलं. अभिनयाचा, कॅमेऱ्यासमोर वावरण्याचा अनुभव नसलेली आणि कॅमेऱ्याबाबत मनात प्रचंड भीती असलेली मोनालिसा त्यावेळी प्रत्येक क्लीकनंतर पुढच्या फोटोसंबंधित विचारात होती. तेव्हाची मोनालिसा आणि आता गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘ड्राय डे’ या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारलेली मोनालिसा यात प्रचंड तफावत दिसली. मोनालिसाचा अभिनय प्रौढ होण्यामागे तिची अथक मेहनत, सातत्य आणि अभ्यासूवृत्ती असल्याचं सांगता येईल.
फोटोशूटच्या वेळी मोनालिसाचे चार मेकओव्हर करायचे आम्ही ठरवले होते. सुरुवातीला वेस्टर्न आऊटफिटमध्ये मोनालिसाचं आम्ही फोटोशूट ठरवलं होतं. यासाठी लाल रंगाच्या लाँग गाऊनमधली मोनालिसा पहिल्यांदा कॅमेऱयासमोर आली. यानंतर मॉडर्न लूकमधली हॉटपॅन्ट आणि टॉप घातलेली मोनालिसाचे स्टुडिओत फोटोशूट झाले. तर यानंतर तिचं एक बोल्ड शूटदेखील केलं. सगळ्यात शेवटी पारंपरिक वेषभूषेतली, साडी घातलेली आणि मराठमोळा शृंगार केलेली मोनालिसा फोटोशूटसाठी तयार झाली आणि या पेहरावातले तिचे अनेक पोर्ट्रेट मी कॅमेराबद्ध केले. फोटोशूटच्या वेळी मोनालिसा फारच मदतशीर होती. अभ्यासू वृत्तीच्या मोनालिसाने प्रत्येक क्लिकनंतर पुढे काय, असा प्रश्न करत पुढच्या शॉटला नेमके कसे हावभाव हवे आहेत हे समजून तर घेतलेच शिवाय ते तसेच्या तसे किंबहुना त्याहून अधिक चांगले हावभाव आपल्या चेहऱ्यावर कसे आणता येतील, याचा प्रयत्नदेखील केला. म्हणूनच या शूटच्या वेळी अनेक रेफरन्स नसलेले आणि चांगले फोटो मला कॅमेराबद्ध करता आले.
मोनालिसा आपल्या अभिनयाबद्दल तत्पर असलेली वेळोवेळी दिसली आहे. मात्र या क्षेत्रात केवळ अभिनयापुरतंच न राहता आता तिने सिनेमा वितरक म्हणूनदेखील नवी ओळख करू दिली आहे. कोणत्याही सिनेमासाठी लागणारी मार्केटिंगची बांधणी, त्याचं नियोजन आणि त्यासाठी हवं असलेलं धोरण या सगळ्यावर सिनेमाचं गणित असल्याचं ती मानते आणि म्हणूनच सिनेमाला मोठं करण्यासाठी लागणाऱया पूरक व्यवसायात मोनालिसा आपला पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगते. अवघ्या एकवीस वर्षांची असलेली मोनालिसा आपली अभिनेत्री म्हणून ओळख करून देत असतानाच एक वितरक आणि त्याही पलीकडे जाऊन मराठी इंडस्ट्रीचा अभ्यास करून सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहचेल यासाठीची यंत्रणा बांधण्यासाठीची नव्या कंपनीची स्थापना करू पाहते, या तिच्या वेगानेच तिच्यातलं वेगळेपण जाणवतं आणि हेच तिच्या यशाचं गमक असल्याचं सांगता येईल.
— धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
Leave a Reply