काळीभोर मखमली मध्यरात्र पुढ्यात असावी, वातावरणात गोड शिरशिरी अंगावर उठवणारी थंडी असावी, समुद्राच्या पाण्यावर चंदेरी लहरी हेलकावे घेत असाव्यात आणि हातात असलेल्या ग्लासातील मद्यात चंद्र किरण शिरून, त्या मद्याची लज्जत अधिक मदिर व्हावी!! दूर अंतरावर क्षितिजाच्या परिघात कुठेच कसलीही हालचाल नसावी आणि त्यामुळे शांतता अबाधित असावी!! समुद्राच्या लाटा देखील, नेहमीचा खळखळ न करता, आत्ममग्न असल्याप्रमाणे वहात होत्या. पाण्यात, निळ्या रंगाबरोबर विलोभनीय काळा रंग देखील आपले अस्तित्व देखणेपणाने दर्शवत होता!! किंबहुना, पाण्यातील निळा आणि काळा रंगांचे मिश्रण, वरून ओतत असलेल्या चंद्राच्या किरणांत इतके एकजीव झाले होते की, रंगांना स्वत:चे वेगळे आयुष्य लाभावे,असा अपरिमित गोडवा, मनाला अधिक गोड करीत असावा!! महाभारतात, व्यासांनी द्रौपदीच्या सौंदर्याचे वर्णन करताना, “तिच्या अंगाला निळ्या कमळाचा सुगंध होता” अशी असामान्य प्रतिमा वापरली आहे, त्याच प्रतिमेची नेमकी आठवण, पाण्याचा निळा रंग बघताना व्हावी!! आणि कानावर दुरून कुठूनतरी आर्त “रिषभ” यावा आणि तो सूर नेमक्या सोहनी रागाची आठवण करून देणारा असावा, इतका तरल असावा!!
आरती प्रभूंच्या ओळी या संदर्भात आठवल्या.
“वाजून मेघ जातो घननिळासा विरून,
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे;
बोलें अखेरचे तो: आलो इथे रिकामा,
सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे”.
एकाच वेळी प्रणयाची धुंद साद घालणारा, त्याचबरोबर प्रणयातील विरहाची प्रचीती देणारा, मृदुभाषी असा हा सोहनी राग. सोहनी राग असाच स्वप्नांच्या प्रदेशात हिंडवून आणणारा प्रणयोत्सुक राग आहे. कोमल रिषभाची आच घेऊन, तीव्र मध्यमाला स्पर्श करून, जेंव्हा शुद्ध धैवत स्वरावर स्थिरावतो, तेंव्हा प्रणयाचे एक सुंदर वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटते!! वास्तविक “मारवा थाट” मध्ये या रागाचे वर्गीकरण आहे आणि हा राग ऐकताना, कुठेतरी पुरिया आणि मारवा रागाची पुसटशी का होईना आठवण होते. आडव/षाडव जातीचा हा राग तसा मैफिलीत फारसा गायला जात नाही परंतु वादकांनी मात्र या रागावर मनापासून प्रेम केलेले आढळते. “पंचम” स्वर, आरोह आणि अवरोह सप्तकात वर्ज्य असला तरी या रागाची अवीट गोडी कुठेही रतिभर देखील कमी होत नाही. वास्तविक भारतीय रागसंगीतात, “षडज पंचम” भावाला अपरिमित महत्व आहे पण, इथे खुद्द “पंचम” स्वराला अजिबात स्थान नाही. वादी, संवादी स्वर – धैवत आणि गंधार हे असले तरी अखेर, परिणाम घडवतात ते कोमल रिषभ आणि तीव्र मध्यम,हेच स्वर. या रागातील खास स्वरसमूह झाल्यास, “सा नि ध ग म(तीव्र) ध ग म(तीव्र)” किंवा “सा नि ध नि ध ग म(तीव्र) ग म(तीव्र) ग रे(कोमल) सा” यांचा वेध घेणे, बहारीचे ठरेल.
पंडित शिवकुमार शर्मा यांनी सादर केलेला राग सोहनी या रागाच्या संदर्भात ऐकणे हा एक अनिवर्चनीय अनुभव आहे. मुळात, लोक संगीतातील वाद्य परंतु त्याला शास्त्रीय संगीताची बैठक देऊन, मैफिलीत स्थान प्राप्त करून दिले, ते याच कलाकाराने. तसे बघायला गेल्यास, या वाद्याला काहीशा मर्यादा आहेत, म्हणजे या वाद्यातून अति खर्ज किंवा अति तार सप्तकाची ओळख करून घेता येणे कठीण जाते. खरे तर मंद्र आणि शुद्ध सप्तकात हे वाद्य खुलते. ऐकायला अतिशय गोड असल्याने, रसिकांच्या मनाची पकड लगेच घेतली जाते. वाद्यातील तारांच्या नादाला देखील काही मर्यादा असल्याने काही वेळा “मींड” काढणे अवघड जाते आणि विशेषत: द्रुत किंवा अति द्रुत लयीत सुरांचा सुटेपणा काहीसा अदृश्य स्वरूपात वावरतो. अर्थात, इथे मी सतार आणि सरोद ही वाद्ये ध्यानात घेऊन, ही विधाने केली आहेत.
वरील सादरीकरणात, पंडितजींनी सुरवातीच्या आलापीमध्ये, या रागाची ओळख करून दिली आहे आणि ती जरा बारकाईने ऐकली म्हणजे लगेच समजून घेता येईल, मी वरती मारवा आणि पुरिया रागाच्या साद्धर्म्याशी सांगड घातली होती पण ती घालताना, फरक सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि तो फरक इथे प्रकर्षाने ऐकायला मिळतो. रागाचे स्वरूप पहिल्याच आलापीमध्ये स्पष्ट झाल्यामुळे, पुढील वादनात, रागाचा विस्तार कसा होणार आहे, याची कल्पना करणे अवघड जात नाही.
हिंदी चित्रपट संगीतात, “मोगल-ए-आझम” या चित्रपटाचे अढळ स्थान आहे. प्रचंड आणि वैभवशाली मोगल राज्याची कल्पना करता येऊ शकेल, अशा भव्यतेची कल्पना देणारा चित्रपट. त्यालाच साजेशा अशा संगीत रचना, संगीतकार नौशाद यांनी तयार केल्या. त्यातलीच, उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेबांनी अजरामर केलेली रचना, या रागाची सुंदर ओळख करून देते. वास्तविक पहाता, रूढार्थाने हे चित्रपट गीत नव्हे, लखनवी ढंगाची ठुमरी आहे पण चित्रपटात ती चपखल बसली आहे. दीपचंदी सारख्या अनघड तालात ही रचना आहे.
“प्रेम जोगन बन के,
सुंदर पिया ओर चले,
प्रेम गगन बन के
प्रेम जोगन बन के.”
ठुमरी गायन, हा खास बडे गुलाम अली साहेबांचा प्रांत. ठुमरीला किती लडिवाळ पद्धतीने रंगवता येते, याचा खानसाहेबांचे गायन, हा अप्रतिम वस्तुपाठ ठरावा. मुळात, ठुमरी म्हणजे शृंगाराचा मनोज्ञ आविष्कार आणि तो आविष्कार त्याच तितक्याच रंजकतेने, खानसाहेब सादर करतात. यांच्या गायनाबाबत बोलायचे झाल्यास, आलापचारी गुंतागुंतीची नाही, सगळ्या स्वरांना त्यांचे मूल्य प्रदान करत, ती आवाहक होत असे. तान मात्र गुंतागुंतीची असे. एक तान सरळ तर दुसरी तान जवळजवळ तिन्ही सप्तकात प्रवेश करीत असे. याचा परिणाम, गायली गेलेली ठुमरी वैविध्यतेने सादर होत असे.
उपरीनिर्दिष्ट रचना, सरळ सरळ ठुमरी गायन आहे पण, चित्रपटातील गायन असल्याने, थोडक्यात स्वरिक मजकूर भरून काढलेला आहे. पहिल्याच आलापीत सोहनी राग सिद्ध होतो आणि त्याच अंगाने, पुढे या रचनेचा विस्तार होत रहातो. परिणाम असा झाला, चित्रपटातील प्रसंग अधिक गहिरा आणि उठावदार झाला. अर्थात, चित्रपटातील गाण्यांचे मूळ प्रयोजन हेच तर असते. रचना ऐकताना, प्रत्येक स्वर, लोचदार तान आणि एकूणच, गायनाची संपूर्ण अभिव्यक्ती भारून टाकणारी आहे.
असेच एक सुंदर गाणे, “गृहस्थी” या चित्रपटात आहे. अगदी या रागाची ओळख म्हणून निर्देश करावे, असे हे गाणे – “जीवन ज्योत जले”.
“जीवन ज्योत जले,
कौन जाने कब निकसे दिन और रात ढले;
जीवन ज्योत जले.”
त्रितालात रचना बांधली आहे आणि संगीतकार रवी आहे. गाणे अतिशय श्रवणीय आहे पण गाण्याची चाल म्हणून स्वतंत्र विचार केला तर त्यात तसे फार गुंतागुंतीचे काही नाही. गाण्यात, गायकीच्या अंगाने ताना आहेत आणि त्याचाच वेगळा विचार करावा लागेल. आता यात असे आहे, राग आधाराला घेतल्यावर, रागाच्या अंगाने, ज्या सुरावटी बांधल्या जातात, त्यात बहुतेकवेळा “अंगभूत” ताना अंतर्भूत असतात, त्यासाठी रचनेत फारसा बदल करावा लागत नाही. रचना म्हणून, संगीतकाराने अगदी सरळसोट रचना बांधली आहे. गायकी म्हणून निश्चितरीत्या आशा भोसले, यांचे कर्तृत्व अधिक पुढे येते. कविता म्हणून देखील फार उच्च प्रतीचे काव्य नाही. चालीच्या “मीटर” मध्ये शब्द चपखल बसले आहेत. पहिल्या सुरापासून, आपल्याला यात “सोहनी” राग ऐकायला मिळतो पण, रागाचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात पातळ ठेवले आहे.
गायकी म्हणून विचार करताना काही वैशिष्ट्ये इथे मांडावी लागतील. रचनाकारांना हवासा वाटेल त्या प्रकारचा स्वन (टोन) घेऊन, त्यास सांगीत गुण प्रचुर प्रमाणात बहाल करण्यासाठी आवश्यक ते कौशल्य आणि लागणारी कल्पनाशक्ती या आवाजात भरपूर आहे प्रस्तुत रचना, रागाधारित असल्याने, स्वरांचा लगाव कसा असावा आणि त्यातून, नेमकी गायकी कशी सादर केली जाईल, हा विचार ही रचना गाताना, स्पष्टपणे दिसून येतो. थोडक्यात मूल्यमापन करायचे झाल्यास, कंठसंगीतातील ध्वनीपरिणामांच्या शब्दावलीत भर टाकून, या आवाजाने चित्रपटीय आणि सांगीत शक्यतांची नवी परिमाणे एकत्र करण्यात लक्षणीय आणि ठाम पाउल पुढे टाकले. वास्तविक वरील रचना, “बंदिश” सहज होऊ शकली असती पण या गायिकेने तो धोका टाळला आणि सुगम संगीताच्या सीमारेषा आणि त्याचा परीघ, अधिक विस्तारित केला आणि हे योगदान, केवळ अतुलनीय, असेच म्हणावे लागेल. चित्रपट गीत गाताना, त्यात किती प्रमाणात नाट्यमयता आणायची, याबाबत या आवाजाने आदीनमुना पेश केला आहे आणि जसे लता मंगेशकर, यांच्याबाबत ठामपणे विधान करता येईल, त्याच विचारात आणखी पुढे जाउन, आशा भोसले यांनी स्वत:च्या गायकीचे स्वतंत्र “घराणे” निर्माण केले.
“सुवर्ण सुंदरी” या चित्रपटात रागमाला धर्तीवर एक गाणे आहे – “कुहु कुहु बोले कोयलिया”. वास्तविक या गाण्यात अनेक राग आहेत परंतु रागाचा “मुखडा” खास सोहनी रागाच्या वळणावर आहे.
“कुहु कुहु बोले कोयलिया,
कुंज-कुंज में भंवरे डोले;
गुन-गुन बोले
कुहु कुहु बोले कोयलिया”.
सगळे गाणे अतिशय द्रुत लयीत बांधले आहे आणि नेहमी वापरात असणारा त्रिताल योजलेला आहे. अर्थात गाणे मनावर लगेच गारुड घालते. संगीतकार आदी नारायण राव या दक्षिणात्य संगीतकाराने चाल बांधली आहे. या गाण्यातील, रफी आणि लताबाईंची “गायकी” विशेषत्वाने उठून दिसते. तसे बघितले तर रागांच्या अंगभूत सौंदर्यामुळे गाणे खुलते परंतु केवळ रचना म्हणून विचार केला तर सरळ सरळ रागाच्या चौकटीत गाणे तयार केले आहे, पण तरीही हे गाणे श्रवणीय वाटते.
संगीत नाटक “कट्यार काळजात घुसली” मधील “सुरत पिया की छिन बिसराये” हे गाणे सोहनी रागाची आठवण करून देणारे आहे. तसे बघितले तर गाण्याची रचना पारंपारिक ठुमरी अंगावर बेतलेली आहे परंतु ठुमरी अंग घेऊन देखील, गाणे म्हणून ही रचना फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. गायक म्हणून वसंतराव देशपांडे, यांची ” खानसाहेबी” ढंगाची गायकी खुलून आलेली आहे. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी, वसंतरावांच्या या गायकीचा, या गाण्यात बहारीने उपयोग करून घेतला आहे.
— अनिल गोविलकर
Leave a Reply