कुलदीप वसंत पवार यांचा जन्म १० जून १९४९ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वसंतराव पवार मोटारसायकलीच्या एजन्सीचे काम करत आणि त्यांच्या आई शांतादेवी यांनी गुजराथी शाळा चालवली होती. त्यांचे वडील व्हायोलिन आणि माऊथ ऑर्गन वाजवत तर त्यांच्या आई उत्तम नकला करत. कुलदीप पवार यांचे शिक्षण ‘ सेट झेविअर्स ‘ स्कुलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी अभिनयाला सुरवात केली. शालेय वयातच त्यांनी सुलोचनबाईच्या हस्ते बक्षिसेही मिळवली. ‘ ज्यांना काही करता येत नाही तेच सिनेमात जातात ‘ अशी त्या काळात समजूत होती, लोकांची धारणा होती. त्याचकाळात कुलदीप पवार यांनी या क्षेत्रात यायचे ठरवले. त्यांच्या वडिलांकडून त्यांना विरोधही झाला कारण त्यांचे म्हणणे होते आजोबांची ‘ जयश्री ‘, ‘ प्रताप ‘ आणि ‘ वसंतबहार ‘ ही सांगली-कोल्हापूरची थिएटर्स सांभाळ, असे त्यांचा वडिलांचे म्हणणे होते. एकीकडे अभिनयाचा ओढा आणि दुसरीकडे घरी होणारा विरोध यामध्ये ते पुरते सापडले होते आणि त्याच वेळी वयाच्या सोळाव्या वर्षी घरातून पळून कऱ्हाडला आले आणि ‘ हिंदुस्थान गियर्स ‘ कंपनीमध्ये कामाला लागले. लेथवर काम केल्यावर खाली पडणारा कचरा उचलण्याचे काम त्यांना देण्यात आले आणि पगार होता फक्त ९० रुपये.
संध्याकाळी काम संपल्यावर ते कामगारांची नाटके बघत आणि याच काळात कृष्णा पाटील यांचे कुलदीप पवार यांच्याकडे लक्ष गेले आणि ‘ एक माती अनेक नाती ‘ या चित्रपटाबद्दल त्यांना विचारण्यात आले. तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता. परंतु तो चित्रपट फारसा चालला नाही. आपल्याला अभिनयात अजून सुधारणा करायला हवी हे त्यांना कळून चुकले म्हणूंन ते पुण्यास आले. त्यांना मार्गदर्शन करणारी या क्षेत्रातील अनेक माणसे भेटली परंतु काम काही मिळाले नाही म्हणून ते मुंबईला आले. कामासाठी स्टुडिओमध्ये चकरा सुरु झाल्या आणि उपजिवीकेसाठी एका बंगाली माणसाच्या गाड्यांच्या गॅरेजमध्ये गाडयांना रंग देण्याचे काम सुरु केले. त्यांना खरे तर पूर्णपणे नैराश्य आले होते. त्यावेळी त्यांची दाढी वाढल्यामुळे ते भारदस्त दिसत होते आणि अशातच त्यांची एक माणसाशी ओळख झाली ते गृहस्थ पवारांना ‘नाट्यसंपदेच्या’ कार्यालयात घेऊन गेले. आणि तेथे ‘नाट्यसंपदे’ ला ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकासाठी हवा होता तसा संभाजी कुलदीप पवार यांच्या रूपाने सापडला. या नाटकाचा पहिला प्रयोग बेळगाव येथे झाला आणि तो हाऊसफुल्ल झाला. त्याचे पुढे ३५० हुन अधिक प्रयोग झाले. पुढे नाट्यसंपदा आणि कुलदीप पवार यांचे अतूट नाते निर्माण झाले.
त्या दिवसात कुलदीप पवार यांनी जणू प्रतिज्ञाच केली होती की नाटकात सर्व प्रकारच्या भूमिका केल्याशिवाय सिनेमात काम करणार नाही. त्यांनी खरोखर ऐतिहासिक, फार्सिकल, तसेच लोकनाट्येही केली. त्यांनी नकटीच्या लग्नाला, वीज म्हणाली धरतीला, गोलमाल, पाखरू, रखेली, निष्कलंक, खेळ थोडा वेळ, अश्रूंची झाली फुले, सोळावं वरीस धोक्याचं, पती सगळे उचापती, एन्काउंटर, राजकारण गेलं चुलीत, अशी नाटके केली आणि लोकनाट्य देखील. त्यांनी ‘ गीतगोविंद ‘ नावाची स्वतःची नाट्यसंस्था काढली.
कुलदीप पवार यांनी सिनेमात पुनरागमन केले ते गविंद कुलकर्णी यांच्या ‘ जय तुळजाभवानी ‘ या चित्रपटातून. त्यात त्यांची छोटीशी भूमिका होती. या चित्रपटाच्यावेळी दिग्दर्शक अनंत माने यांनी त्यांना ‘ कलावंत ‘ या चित्रपटासाठी करारबद्ध केले ते खलनायकाच्या भूमिकेसाठी. ते पाहून कमलाकर तोरणे यांनी त्यांना त्यांच्या ‘ दरोडेखोर ‘ या चित्रपटासाठी नायकाची भूमिका दिली. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर त्यांनी जावयाची जात या चित्रपटात काम केले आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट आले अरे संसार संसार, शापित, सर्जा, बिनकामाचा नवरा, गोष्ट धमाल नाम्याची, वजीर, आई तुळजाभवानी, नवरा माझा नवसाचा असे अनेक चित्रपट आले. त्यांनी हिंदी मध्ये प्रोफेसर प्यारेलाल, दूध का कर्ज, जीत अशा काही हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या. त्याप्रमाणे परमवीर, तू तू मै मै, वक्त की रफ्तार, या हिंदी मालिकांमधून काम केले तर त्यांची बंदिनी मालिका खूप लोकप्रिय झाली. त्यांनी केलेले खलनायक तर गाजलेच परंतु त्यांनी केलेल्या विनोदी भूमिकाही खूप गाजल्या. बंदिनी आणि परमवीर या मालिकांचे काही भाग त्यांनी लिहिले होते. त्याचप्रमाणे हळद-कुंकू ह्या चित्रपटासाठी त्यांना परितोषिक मिळाले, त्यांच्या एन्काउंटर या नाटकलाही नाट्यगौरव पुरस्कार मिळाला.
कुलदीप पवार यांना ‘ सत्ताधीश ‘ मधील सहाय्यक भूमिकेबद्दल उत्तम अभिनेता म्ह्णून परितोषिक मिळाले.
कुलदीप पवार यांचा स्वभाव अत्यंत मनमोकळा तर होताच परंतु ते एखादी लहान गोष्ट गप्पाच्या मैफलीत रंगवून सांगत, नेहमी त्यांच्या भोवती मित्रांचा, चाहत्यांचा गराडा पडलेला असायचा, मुख्य म्हणजे ते माणूस म्हणून खूप चांगले होते, कलाकार तर होतेच.
अशा चतुरस्त्र कलाकाराचे २४ मार्च २०१४ रोजी मुंबईत निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply