चंद्रकांत उर्फ गोपाळ तुकाराम मांढरे यांचा जन्म कोल्हापूर येथे १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला. त्यांना एक बहीण आणि वामन उर्फ सूर्यकांत हे भाऊ होते. त्यांच्या वडिलांचा लुगडी विकण्याचा धंदा होता. चंद्रकांत यांचे शिक्षण इयत्ता ६ वी पर्यंत कोल्हापुरातील हरिहर विद्यालयात आणि प्रायव्हेट हायस्कुलमध्ये झाले. त्यावेळी त्यांच्यावर चित्रकलेचे संस्कार झाले ते माधवराव बागल यांच्या निसर्ग चित्रांचे आणि आधीपासून त्यांना चित्रकलेची आवड होतीच. वडिलांनी त्यांना बाबूराव पेंटर यांच्याकडे नेले. परंतु बाबूरावांनी त्यांना बाबा गजबर यांच्याकडे पाठवले. बाबा गजमल त्यावेळी ओब्रायम स्कुलमध्ये कलाशिक्षक होते. चंद्रकांत यांनी गजबल यांच्याकडून सुरवातीचे चित्रकलेचे शिक्षण घेतले आणि चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यावेळी कोल्हापूरच्या राजाराम आर्ट सोसायटीतर्फे भरलेल्या प्रदर्शनात चंद्रकांत यांच्या पन्हाळा किल्ल्याच्या जलचित्राला पाहिले रौप्यपदक मिळाले. ते पाहून बाबा गजमल यांनी चंद्रकांत यांना बलवंत सिनेटोन कंपनीत पोस्टर तयार करण्याची नोकरी मिळवून दिली. परंतु बलवंत कंपनी लवकरच बंद पडली त्यानंतर शालिनी सिनेटोन या बाबूराव पेंटर यांच्या कंपनीमध्ये २५ रुपये पगारावर ते नोकरी करू लागले.
त्यावेळी शालिनी सिनेटोनच्या सुरु असलेल्या ‘ उषा ‘ या चित्रपटांची पोस्टर्स चंद्रकांत यांनी बनवली. ‘ सावकारी पाश ‘ या मूकपटाचे बोलपटात रूपांतर करण्याचे काम बाबुराव पेंटर यांनी सुरु केले आणि त्यात नायकाचे काम करण्यासाठी चंद्रकांत यांची निवड केली. बाबुराव पेंटर यांनी चंद्रकांत यांच्याकडून चांगले काम करून घेतले , तो चित्रपट यशस्वी झाला.
त्यानंतर चंद्रकांत यांनी ‘ ज्वाला ‘ या चित्रपटात अभिनेते चंद्रमोहन यांच्याबरोबर १९३८ मध्ये अभिनय केला. त्याच वर्षी भालजी पेंढारकर यांच्या ‘ राजा गोपीचंद ‘ या चित्रपटासाठी साठी त्यांनी चंद्रकांत यांना बोलवले आणि त्यांचे सिनेसृष्टीसाठी पहिल्यांदा ‘ चंद्रकांत ‘ हे नाव ठेवले.
चंद्रकांत यांनी शेजारी , थोरातांची कमळा कमळा , भरतभेत , रामराज्य, जय मल्हार , मानाचं पान , मीठभाकर , छ्त्रपती शिवाजी , वादळ, मुकं लेकरू , भाऊबीज , सांगत्ये ऐका , मोहित्यांची मंजुळा , पवनाकाठचा धोंडी , संथ वाहते कृष्णामाई , इर्षा , अष्टविनायक , भालू, महारथी कर्ण , नवरंग , मेरे लाल अशा असंख्य चित्रपटातून त्यांनी कामे केली. ‘ लाईन्स ऑफ द रॉक ‘ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी विशेष भूमिका केली.
त्याच्या युगे युगे मी वाट पाहिली , पवनाकाठचा धोंडी आणि संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला राष्ट्रीय सन्मान मिळाले. तर संथ वाहते कृष्णामाई आणि खंडोबाची आण या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारने त्यांचा पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.
१९८० साली त्यांनी त्यांनी चित्रपटसृष्टीमधून निवृत्ती घेतली परंतु १९९७ साली आलेल्या बनगरवाडी या चित्रपटात भूमिका केली आणि हाच त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. ते अभिनेते तर होतेच परंतु उत्तम चित्रकारही होते. त्यांनी चित्रीकरणाच्या मधल्या वेळात अनेक चित्रे जलरंगात काढली. यासाठी त्यांनी फ्रान्स , नेपाळ अमेरिकेसह अनेक परदेश दौरेही केले. त्यांना चित्रपटातील अभिनयासाठी पारितोषिके मिळालीच परंतु चित्रकलेसाठी जागतिक मराठा परिषद , फाय फाऊंडेशन , छत्रपती शाहू पुरस्कार असे पुरस्कार मिळाले. त्याचप्रमाणे व्ही. शांताराम पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा पुरस्कार असे अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. ते दरवर्षी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना निसर्गचित्रांच्या आणि पावडर शेडिंगच्या वर्गात शिकवीत. चंद्रकांत यांनी १९८४ साली स्वतः काढलेली ४०० चित्रे शासनाच्या स्वाधीन केली आणि या चित्रांचे ‘ चंद्रकांत मांढरे कलासंग्रहालय ‘ उभे राहिले. त्यांना मुबंईत अनेकवेळा पाहिले होते , एक वेगळाच रुबाब त्यांच्या चालण्यात , वावरण्यात होता. मी बऱ्याच वर्षांपूर्वी त्या कलासंग्रहालयात गेलो होतो त्यावेळी ते जिवंत होते परंतु त्यावेळी ते कोल्हापुरात नव्हते. म्हणून मी त्यांच्या कलासंग्रहातील चित्रांची काही कार्ड्स घेतली आणि त्यांना चिट्ठी लिहून ठेवली की आपण आलात की या आपल्या कार्ड्सवर स्वाक्षरी करून मला पाठवा , त्याबरोबर माझा पत्ताही त्यांना दिला . काही दिवसांनी त्यांनी स्वाक्षरी केलेली कार्ड्स माझ्या पत्यावर पाठवली आजही मी ती जपून ठेवली आहेत.
चंद्रकांत मांढरे हे संपूर्ण कलाकाराचे आयुष्य जगले असेच म्हणावे लागेल. वास्तविक पाहात अनेक कलाकार आजही आहेत जे उत्तम चित्रे काढतात, परंतु आपल्या चित्रकलेतही अभिनयाबरोबर सातत्य ठवून संग्रहालय कोणी बनवले असे निदान माझ्या आठवणीत तरी नाही.
चंद्रकांत मांढरे यांनी ७७ मराठी चित्रपटात , १४ हिंदी चित्रपटात तर एक इंग्रजी चित्रपटात काम केले.
अखेरच्या काळातही आपल्या कलेत व्यस्त असतानाच कलासंपन्न चंद्रकांत मांढरे यांचे १७ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply