सागर कारंडे यांचा जन्म १ जानेवारी १९८० रोजी झाला.
सागर कारंडेचं लहानपण मुंबईतच गेलं. बालमोहन ही त्याची शाळा. या शाळेत असलेल्या कलासक्त वातावरणाचा परिणाम नाही म्हटलं तरी सागरवर कळत नकळत झाला. शाळेत असल्यापासूनच सागरला अभिनयाची आवड होती. त्यामुळे शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये, नाटकांमध्ये सागर आवर्जून सहभागी व्हायचा. त्यामुळे रंगमंचाची त्याची भीती शाळेतूनच गेली. मग गणेशोत्सवात, सत्यनारायणाच्या पूजेवेळी होणाऱ्या नाटकांत तो सहभागी होऊन अभिनयाची हौस भागवू लागला. अभिनयाच्या क्षेत्रात जावं आणि नशीब आजमावावं असं त्याला वाटत होतं. मध्यमवर्गीय घरातील कोणत्याही मुलानं असा निर्णय घेतल्यानंतर पालकांची जी प्रतिक्रिया असते तशीच सागरच्या घरीही व्यक्त झाली. ‘आधी पोटापाण्याची सोय ती बघ. ती झाली की मग अभिनय’ असं वडिलांनी त्याला परखडपणे सुनावलं. त्यामुळे दहावी झाल्यानंतर कम्प्युटर हार्डवेअरमध्ये इंजिनीयरिंग केलं. कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग इंजिनिअर असून त्याने एका आयटी कंपनीत काम काम करत असे. ते काम त्याला खूपच कंटाळवाणं वाटू लागलं म्हणून त्याने नोकरी सोडली. मग अभिनयाची आवड असलेल्या मित्रमंडळींना एकत्र आणून एक ग्रुप स्थापन केला. हा ग्रुप गणेशोत्सवात नाटक करत आपली अभिनयाची आवड जोपासत होता. दरम्यानच्या काळात आपल्याला अभिनय चांगला करता येतो असा आत्मविश्वास सागरमध्ये आला होता. ‘गोदरेज’, ‘एचपी’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सागरनं काम केलं. परंतु नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला. अखेर सागरनं नोकरी सोडत पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरण्याचा निर्णय घेतला.
त्याच्या या निर्णयामुळे घरात त्सुनामी उसळली. वडिलांचे कान भरणारे नातेवाईक, इतर मंडळी सागरच्या अडचणीत अधिक भर घालत होते. परंतु सागर आपल्या निर्णयावर ठाम होता. अभिनयासाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे त्यासाठी मेहनत घेण्याची सागरची तयारी होती. कामासाठी त्याची शोधशोध सुरू होती. त्या दिवसांबद्दल सागर सांगतो, “ माझे वडील आणि काका मुलाखतीसाठी कंपन्यांमध्ये पाठवायचे. परंतु मला तिथे जाण्यात जराही रस नसल्यानं इकडेतिकडे फिरायचो आणि नंतर माझी निवडच झाली नाही असं घरी फोन करून सांगायचो.’’ स्ट्रगलच्या दिवसांमधला मजेशीर किस्सा सागरनं सांगितला, “ त्यावेळी नाटकातून पैसे मिळायचे हे मला माहीतच नव्हतं. चर्चगेट येथील एलआयसीच्या कार्यालयात सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी काहीतरी मनोरंनात्मक कार्यक्रम सादर करायला मला बोलावलं. मी तिथं गेलो आणि दहा मिनिटांच नाटकुले सादर केले. त्याचे मला एकशे एक रुपये मानधन मिळालं. माझ्या उभ्या आयुष्यात मानधन हा शब्द त्यावेळी पहिल्यांदा ऐकला होता…”
कामाच्या शोध सुरू होता पण म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. परंतु त्यामुळे सागर निराश झाला नाही. स्वत:बद्दल त्याला विश्वास होता. काम मिळवण्यासाठी धडपड सुरू असतानाच त्याला पहिलं नाटक मिळालं ते योगेश सोमण लिखित ‘गणपती बाप्पा मोरया!’ या नाटकाच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रातील त्याच्या वाटचालीचाही श्रीगणेशा झाला… पहिल्या व्यावसायिक नाटकानंतर सागरची नाट्यक्षेत्रात घौडदौड सुरू झाली. त्यानंतर त्याने संतोष पवार व राजेश देशपांडे यांच्यासोबत खूप काम केलं. संतोष पवार यांच्यासोबत ‘यदा कदाचित’, ‘यदा कदाचित २’, ‘आम्ही पाचपुते’,‘जळूबाई हळू’ ही नाटकं केली. नाटकातील त्याची घोडदौड सुरू असतानाच त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली ती ‘चल धरपकड’च्या माध्यमातून. चित्रपटमाध्यमाबद्दल सागर सांगतो, “ हे माध्यम पूर्णपणे दिग्दर्शकाचं आहे. दिग्दर्शक कसं आणि किती कल्पकतेनं करतो यावर त्या चित्रपटाचं भवितव्य अवलंबून असतं…” या चित्रपटानंतर सागरनं ‘कॅरिऑन देशपांडे’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘बायोस्कोप’, ‘फ्रेंड्स’, ‘बस्ता’, ‘मन उधाण वारा’, ‘एक तारा ’, ‘तुझं तू माझं मी’ या चित्रपटांतही अभिनय केला. तरीही त्याच्यातील अभिनेता अस्वस्थ होता. काहीतरी वेगळं करण्याची त्याची इच्छा होती… ही इच्छा साध्य झाली ती ‘झी मराठी’वरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागर हा उत्तम विनोदी अभिनेता असल्याचं जाहीर झालं. ‘फू बाई फू’ या विनोदी कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात सुनील तावडे आणि सागर कारंडे रनरअप ठरले. त्यानंतर भारतसोबत त्यानं अंतिम फेरीत धडक मारत ही स्पर्धाही जिंकली. या कार्यक्रमात त्यानं केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या आणि तो खऱ्या अर्थानं चर्चेत आला. या कार्यक्रमामुळे छोट्या पडद्याची ओळख आणि त्याचं महत्त्व त्याला समजलं. त्याबद्दल सागर सांगतो, “ राजेश देशपांडे यांच्या ‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’ या मालिकेतून पहिल्यांदा छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. परंतु फू बाई फू या कार्यक्रमामुळे छोट्या पडद्याचं महत्त्व अधिक जाणवलं. आणखी एक गोष्ट इथं काम करताना जाणवली ती म्हणजे नाटक आणि चित्रपटात तुम्हाला तुमचं अभिनयकौशल्य सुधारण्याची संधी मिळत नाही. परंतु टेलिव्हिजन या माध्यमात काम करताना ती मिळतेच. याशिवाय या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाच्या घराघरात पोहोचता आणि तुमची स्वत:ची ओळख निर्माण होते…” सागरला खऱ्या अर्थानं ओळख मिळाली ती ‘झी मराठी’ वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून…‘फू बाई फू’ कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉ. नीलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे अशी विनोदवीरांची फौज एकत्र आली. कर्मधर्मसंयोगानं ‘झी मराठी’नं यांना बरोबर घेत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. आणि त्यातून मराठी दूरचित्रवाणी वाहिनीच्या क्षेत्रात एक इतिहास रचला गेला. या कार्यक्रमातून सागरनं विविध भूमिका साकारल्या आहेत. कधी तो अभिनेत्याची भूमिका साकारतो तर कधी बेरकी राजकारणी… तर कधी इरसाल पुणेरी बाई… या सर्व भूमिका सागर अगदी लीलया साकारतो.
त्यानं साकारलेल्या या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी तर भरभरून दाद दिलीच आहे, शिवाय ज्यांच्या व्यक्तिरेखा त्यानं साकारल्या आहेत त्यांनीही कौतुक केलं आहे. ‘पाणी फाऊंडेशन’साठीही सागरनं पत्रं वाचली आहेत. हा अनुभव सागरसाठी अत्यंत खास आहे. परफेक्शनिस्ट असलेला अभिनेता आमिर खान यानंही सागरचं खूप कौतुक केलं आहे. सागरलाही अमीरबद्दल खूप अप्रूप आहे. तो सांगतो, “प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारकाईनं लक्ष देणारा हा अभिनेता आहे. त्याला जी गोष्ट येत नाही असं वाटतं ती गोष्ट प्रयत्नपूर्वक साध्य करतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर आमिर खान यानं एक नाटक सादर केलं होतं. तसंच नाटक परत करण्याची इच्छा त्यानं यावेळी व्यक्त केली होती.”
‘चला हवा येऊ द्या’मधील सागर ज्या स्त्री भूमिका साकारतो त्यांना प्रेक्षकांकडून अतिशय भरभरून प्रतिसाद मिळतो. या भूमिकांबद्दल सागर सांगतो, “ या कार्यक्रमात मी स्त्रीभूमिका साकारतो ती कुठेही अश्लील वाटू नयेत, याची कटाक्षानं काळजी घेतो. कार्यक्रम सादर करताना चार विनोद कमी झाले तरी चालतील मात्र स्त्रीचा अपमान होता कामा नये. कारण माझ्या घरीही माझी आई, माझी पत्नी आणि माझी मुलगी आहे त्यांना कसं वाटेल याचा मी विचार प्राधान्यानं करतो.” स्त्रीभूमिका या प्रत्येकवेळी वेगळ्या होतील यासाठी सागर खूप मेहनत घेतो.
सागरसाठी नाटक हेच पहिलं प्रेम आहे. वर्षातून एकतरी नाटक करायलाच पाहिजे असा त्याचा अट्टहास असतो. याविषयी सागर म्हणतो, “नाटकांची एक-दोन महिने आधी तालीम होते. नाटकाची प्रक्रियाच मला फार आवडते. त्या प्रक्रियेत तुम्हाला तुमची भूमिका सापडत जाते. बायकोलाही नाटकाबद्दलची त्याची आवड माहीत असल्यामुळे तीदेखील मी नाटक करावं यासाठी आग्रही असते. ती म्हणते, तुम्ही नाटकच करा. कारण तिथं तुम्ही खूप कम्फर्टेबल असता….”
सध्या सागर ‘झी मराठी’ प्रस्तुत आणि श्रीरंग गोडबोले लिखित- दिग्दर्शित ‘इडियट्स’ हे नाटक करत आहे. या नाटकात तो प्रीतम ही भूमिका साकारत आहे. थोडी विनोदी आणि थोडी गंभीर अशी ही भूमिका आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सागरनं ‘कामदेव’ नावाची वेब सीरिज केली आहे. ‘सेक्रेड गेम्स’मध्येही तो दिसला आहे. सागरच्या आणखी तीन वेब सीरिजचं चित्रीकरण सध्या सुरू आहे.
‘हवा येऊ द्या’मध्ये सागर ज्या विविध व्यक्तिरेखा साकारतो त्यातील पोस्टमनकाका ही व्यक्तिरेखा सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. या पोस्टमनच्या भूमिकेला त्याला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळते. त्याबद्दल सागर सांगतो, “अरविंद जगताप ही पत्रं खूपच सुंदर लिहितात. काळजाला हात घालणारी ही पत्रं असतात. पत्र जेव्हा हातात येतं तेव्हा पाच-सहा वेळा पत्र वाचतो. ते वाचताना कोणत्या शब्दांवर जोर द्यायचा, कोणतं वाक्य कसं बोलायचं याचा अभ्यास करतो. चुकीच्या शब्दावर भर दिला किंवा एखादं वाक्य चुकीच्या पद्धतीनं उच्चारलं गेलं तर त्याचा चुकीचा संदर्भ प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते, तसं होऊ नये म्हणून मी खूप दक्ष असतो…” त्यातूनच कामाबद्दल असलेली त्याची निष्ठा जाणवते.
कधी कधी चित्रीकरणाच्या काही तास आधी पत्र हातात येतं तेव्हादेखील त्याच्या या नियमात खंड पडत नाही. सागर मुळातच खूप हळवा असल्यानं पत्रं वाचताना त्याला मुद्दाम भावविवश व्हावं लागत नाही. पत्र वाचण्याच्या ओघात सर्व होऊन जातं. पोस्टमनकाका हे गंभीर असूनही विनोदी कार्यक्रमात प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारलं आहे, हे खरोखरच विशेष म्हणावं लागेल… सागर सादर करत असलेले ‘चला हवा येऊ द्या’ मधील पोस्टमन काका हे प्रेक्षकांच्या मनातील हळवा कोपरा आहेत. हे पोस्टमन काका प्रेक्षकांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देतात. हीच खऱ्या अर्थानं सागरमधील अभिनेत्याला मिळालेली दाद आहे…
सागरला सतत आपण वेगवेगळ्या भूमिका कराव्यात असं वाटतं. ‘सागर म्हणजे विनोदी अभिनेता’ अशी मर्यादित ओळख होऊ नये असं त्याला मनोमन वाटतं. त्यामुळे तो प्रत्येक भूमिका कशी वेगळी करता येईल, याचा सतत शोध घेत असतो. त्याचा हा प्रयत्न ‘हलकंफुलकं’ या नाटकातून दिसून येतो. एकाच नाटकात तीन वेगळ्या पठडीच्या भूमिका सागरनं साकारल्या होत्या. त्यामुळेच आजही ‘हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात तो कधी नाना पाटेकर असतो,कधी मकरंद अनासपुरे असतो, तर कधी साक्षात अमिताभ बच्चनही तो असतो, तर कधी पुण्याची मास्तरीणबाई अथवा एखादी नटी देखील सहजपणे साकारतो.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply