अभिनेते संजय खापरे यांचा जन्म ३१ मे १९७२ रोजी मुंबई येथे झाला.
मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रासाठी अभिनेता ‘संजय खापरे’ हे नाव तसे नवे नाही. परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये संजय खापरे यांचे शिक्षण झाले. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्याखेरीज शालेय स्तरावर अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयीन कॉमर्समधील पदवी बुऱ्हाणी कॉलेजमधून घेतली. केवळ नाटकात काम करायला मिळावे म्हणून एम.डी.कॉलेज मुंबई येथे प्रवेश घेतला. येथेच त्यांची संतोष पवार, अंकुश चौधरी, भरत जाधव, केदार शिंदे यांच्याशी ओळख झाली. संजय बेलोसे हे त्यांचे गुरु. ‘यदा कदाचित’ या नाटकामुळे खापरे यांना लोकप्रियता मिळाली. ’कळत नकळत’ नाटकातून ‘प्रेम’, ‘मैत्री’ या नात्यावर विश्वास ठेवायला शिकवणाऱ्या ‘विश्वास’ची भूमिका असो…’मर्डर मेस्त्री’ चित्रपटातील दारूड्या माजी सरपंच बनलेला ‘माधव मेस्त्री’ असो…‘दगडी चाळ’ चित्रपटातला तापट डोक्याचा ‘चंदू उर्फ ‘मामा’ असो… लहान मुलांपासून ते मोठयां पर्यंत सर्वांना भावलेली ‘लई भारी’ मधील वेगळी भूमिका असो.. किंवा ’रेती’ चित्रपटातून वाळु माफीयांच्याविरोधात आवाज उठविताना प्रचंड संवेदनशीलतेनं प्रेक्षकांना खिळविणारा समाजसेवक ‘सदानंद भामरे’ असो….भूमिका छोटी असो वा मोठी…त्याने प्रत्येक भूमिकेतुन आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
संजय खापरे यांनी आपल्या रुपेरी पडद्यावरील वाटचाल महेश मांजरेकर यांच्या ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या हिंदी चित्रपटापासून सुरु केली. त्यानंतर खापरे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत रॉकी हॅण्डसम या चित्रपटातही काम केले. आपल्या कारकिर्दीत संजय खापरे यांनी जत्रा, गाढवाचं लग्न, टाटा बिर्ला आणि लैला, अजब लग्नाची गजब गोष्ट, अग्निपरिक्षा, भाऊचा धक्का, काकस्पर्श, फक्ता लढ म्हणा, प्रियतमा, लयभारी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वॉण्टेड बायको नं 1, मर्डर मेस्त्री, दगडी चाळ, गलबत, डिस्को सन्या, फॅमिली कट्टा, झाला बोभाटा, नगरसेवक, तलाव, मेमरी कार्ड, बे एके बे या चित्रपटातून अभिनय केला आहे.
या व्यतिरिक्त मराठी नाट्यसृष्टीतही व्यावसायिक रंगभूमीवर ‘गलती से मिस्टेक’,’तू तू मी मी’, ‘रासलीला’, ‘कळत नकळत’ या नाटकातून त्याने भूमिका केल्या आहेत.
संजय खापरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply