अभिनेते शरद पोंक्षे यांंचा जन्म १३ ऑक्टोबरला झाला.
टि व्ही, नाटक आणि चित्रपट ही अभिनयाची सर्व माध्यम आपल्या समर्थ अभिनयाने गाजवणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे.
मराठी अभिनय क्षेत्रातील एक प्रतिभावान कलाकार म्हणून शरद पोंक्षे यांचे नाव घेतले जाते. नाट्य सृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
दूरचित्रवाणीवर ही त्यांनी अनेक मालिकांतून अभिनय केला. दूरदर्शन वरील दामिनी या अत्यंत गाजलेल्या मालिकेत त्यांची महत्वाची भूमिका होती. या मालिकेतील प्रमुख भूमिका प्रतीक्षा लोणकर यांनी साकारली असून पुढे अनेक मालिका व चित्रपटात हे दोघे एकत्र आले.
शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने गाजलेल्या मालिकांमध्ये अग्निहोत्र व वादळवाट या दोन मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय केले. यानंतर उंच माझा झोका या मालिकेत ते रसिकांना पाहायला मिळाले. न्यायमूर्ती रानडे व त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित या मालिकेत शरद पोंक्षे यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या वडिलांची भूमिका रंगवली होती. या शिवाय विनय आपटे यांच्या देहावसानानंतर दुर्वा या मालिकेत त्यांची भूमिका शरद पोंक्षे यांनी अतिशय ताकदीने रंगवली व रसिकांचे मन जिंकले.
याचबरोबर त्यांचे ‘कुंकू’ हा चित्रपट तर मी नथूराम गोडसे बोलतोय हे नाटक विशेष गाजले. गांधी हत्या या अत्यंत संवेदनशील विषयामुळे ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे नाटक विवादाच्या भोवऱ्यात सापडूनही रसिकांनी या नाटकास उचलून धरल ते शरद पोंक्षे यांच्या अभिनयामुळे नथूराम गोडसे या व्यक्तीबद्दल प्रचलित असलेले सर्व गैरसमज काही अंशी कमी करण्यात आणि खऱ्या अर्थानी गोडसे यांची भूमिका स्पष्ट करणारे हे नाटक समीक्षकांच्या पसंतीस ही उतरले. त्यांनी अनेक नाटकात महत्वाच्या भुमिका केल्या असल्या तरी ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे नाटक त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्वाचे आहे.
त्यांचे तुकाराम व मोकळा श्वास हे २ चित्रपट खूपच लक्षणीय ठरले. २०१२ साली आलेल्या या चित्रपटात शरद पोंक्षे यांनी जितेंद्र जोशी ज्यांनी या चित्रपटात तुकाराम ही मध्यवर्ती भूमिका केली आहे त्याच्या वडिलांची भूमिका केली आहे. तरुण वयात वयस्क माणसाची भूमिका करणे हे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले. या चित्रपटास अनेक पारितोषिके मिळाली. शरद पोंक्षे हे सर्व तर्हेच्या भूमिका यशस्वीरीत्या साकारू शकतात हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक भूमिकेत ते प्रेक्षकांसमोर आले.
त्यांची कन्यादान ही मालिका झी वर गाजली होती, त्यात शरद पोंक्षे एका प्रेमळ पण करारी बापाच्या भूमिका केली. त्यांनी ‘हे राम’, ‘८८ अंटोप हिल’, ‘आखरी ख्वाहिश’, ‘ब्लैक फ्राइ डे’, ‘ओटी कृष्णामाईची’, ‘एक पल प्यार का’, ‘गाढवाच लग्न’, ‘तूच खरी घरची लक्ष्मी’, ‘गोळाबेरीज’, ‘तुकाराम’, ‘देख तमाशा देख’, ‘ब्लैक होम’, ‘व्हाट अबाउट सावरकर’ आणि ‘संदूक’ या हिंदी व मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर शरद पोंक्षें यांनी रंगमंचावर गेल्या वर्षी पुनरागमन केले आहे. आता ‘हिमालयाची सावली’ या नाटकात ते काम करत आहेत.
शरद पोंक्षे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply