ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचा जन्म २२ जून १९५० मसुरी येथे झाला. सोनेरी केस, निळे डोळे आणि टॉम अल्टर या नावामुळे चटकन अमेरिकन किंवा ब्रिटिश वाटणारा हा ज्येष्ठ अभिनेता-लेखक जन्माने आणि मनाने मात्र पक्का भारतीय होता.
टॉम अल्टर यांचे प्राथमिक शिक्षण मसुरीच्या वुडस्टॉक स्कूलमधून झाले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी येल विद्यापीठात गेले. त्यांनी येल युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केले. सत्तरच्या सुरुवातीच्या दशकात ते भारतात परतले होते. पुण्यातील ‘एफटीआयआय’मध्ये त्यांना १९७२ मध्ये प्रवेश मिळाला. उत्तर भारतातील ८०० जणांमधून केवळ ३ विद्यार्थ्यांना निवडण्यात आले होते, ज्यात टॉम अल्टर यांचा समावेश होता. पुढे त्यांनी अभिनयामध्ये डिप्लोमा केला, ज्यात त्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले.
टॉम अल्टर यांनी १९७६ मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘चरस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘शतरंज के खिलाडी’, ‘गांधी’, ‘क्रांती’, ‘बोस : द अन फरगॉटन हिरो’ आणि ‘वीर झारा’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. त्यांनी तीनशे हून चित्रपटांमध्ये काम केले. ‘जबान संभालके’ या मालिकेमुळे टॉम अल्टर घराघरांत पोचले. याशिवाय ‘शक्तिमान’, ‘कॅप्टन व्योम’ सारख्या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
दूरचित्रवाणी आणि चित्रपटांशिवाय टॉम अल्टर यांनी हिंदी रंगभूमीवरही काम केले होते. नाटक विश्वातही टॉम अल्टर हे मोठे नाव होते. पृथ्वी थिएटर्ससाठी अनेक नाटकांत त्यांनी काम केले आहे. १९७७ साली नसिरुद्दीन शहा आणि बेंजामिन गिलानी यांसोबत मिळून टॉम अल्टर यांनी मॉटले प्रोडक्शनची स्थापना केली.
भारतीय संस्कृतीची उत्तम जाण असलेल्या टॉम अल्टर यांना इंग्रजीसह अस्खलित उर्दू आणि हिंदीत लिहिता, वाचता आणि बोलता यायचे. विशेषतः त्यांना उर्दू शायरीची आवड होती. ‘गालिब इन दिल्ली’ नाटकात त्यांनी उर्दू कवी मिर्झा गालिब यांची लक्षवेधी भूमिका साकारली होती. टॉम अल्टर यांनी हिंदी, बंगाली,आसामीसोबत मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटविला होता. टॉम अल्टर यांनी मराठी चित्रपट ‘दप्तर’मध्ये काम केले होते. टॉम अल्टर यांनी ३०० हून अधिक सिनेमात काम केले होते.
अभिनयाशिवाय लेखन आणि पत्रकारितेमध्येही टॉम अल्टर यांनी काम केले होते. ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय पदार्पण होण्यापूर्वी टॉम अल्टर यांनी त्याची मुलाखत घेतली होती. टॉम अल्टर यांना त्यांच्या अभिनय कारकीर्दीसाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते. टॉम अल्टर यांनी तीन पुस्तकेही लिहिली होती. टॉम अल्टर यांचे निधन २९ सप्टेंबर २०१७ रोजी झाले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply