मराठी अभिनेता विवेक म्हणजे गणेश भास्कर अभ्यंकर यांचा जन्म अलिबाग येथे २३ फेब्रुवारी १९१८ रोजी अलिबाग येथे झाला. त्यांचे वास्तव्य आधी ठाणे आणि मग पुणे येथे होते. त्यांचे शिक्षण ठाण्यातील मो.ह. विद्यालयात झाले. त्यांना क्रिकेटची आवड होती परंतु त्यावेळी क्रिकेटचा छंद सहजासहजी होऊ शकत नसे. त्यांना चित्रकलेचीही आवड होती. त्या काळात त्यांनी ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अर्धवेळ चित्रकला शिक्षकांची नोकरी पत्करली याच्याच जोडीला ठाण्याच्याच ‘ आर्य क्रीडा मंडळ ‘ या संस्थेच्या बॅन्डचे संचलनही केले होते. त्यांनी जे.जे. आर्टस मध्ये प्रवेश घेतला. शिक्षणाचा महागडा खर्च भागवण्यासाठी त्यानी स्वतः काढलेली चित्रे आणि मातीच्या वस्तू दादरच्या फूटपाथवर विकलेली आहेत.
पुढे महात्मा गांधींच्या ‘ भारत छोडो ‘ आंदोलनात उडी घेतली आणि शिक्षणाला राम राम ठोकला. ‘ प्रभात ‘ चित्रपट संस्थेत मालक असलेल्या दामले आणि फत्तेलाल या दोघांना ते भेटले कारण त्यांना चित्रकलेत जास्त रुची होती . जातिवंत चित्रकार असलेल्या फत्तेलाल यांनी त्याच्यातील चित्रकार अचूक हेरला त्यांचे कौतुक केले, दामल्यांनी त्यांचा देखणा चेहरा बघून त्यांच्या आगामी ‘ दहा वाजता ‘ चित्रपटासाठी विचारले पण विवेक याना त्यावेळी चित्रपटात काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती , त्याचा ओढा चित्रकलेकडे जास्त होता .
त्यांनी नंतर १९४४ साली ‘ भक्तीचा मळा ‘ या चित्रपटात काम केले. यथावकास पुढे ते चित्रपटात काम करु लागले. त्यांना ‘ विवेक ‘ हे नाव दिले ते बाळ कुडतरकर यांनी दिले . त्यांना गणेश अभ्यंकर म्हणजे जी. बी. म्हणत. जेव्हा त्यांना प्रभातच्या संत नामदेव चित्रपटासाठी गोविंदराव घाणेकरांनी निवडले तेव्हा ते बाळ कुडतरकर यांच्याकडे आले आणि म्हणाले की पडद्यावर जी. बी. अभ्यंकर हे नांव शोभणार नाही काहीतरी माझ्यासाठी नाव शोध, तीन अक्षरी नांव शोध त्यावेळी कुडतडकरांना विवेकनंदाच्या कार्याने झपाटलेले होते .त्यांनी विवेक हे नाव सांगितले ते जी. बी. आणि गोविंदराव घाणेकरांनाही आवडले. आणि असे जी.बी . अभ्यंकर मराठी चित्रपटसृष्टीत गाजले ते ‘ विवेक ‘ या नावाने.
त्या काळातील सर्वात सुंदर , देखणा नट म्हणून आजच्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांना त्यावेळी ‘ स्टारडम ‘ होते. त्यांच्यासारखा सज्जन आणि चारित्र्यवान नट शोधून मिळणार नाही असे अनेकजण सांगतात. कुठे फसवेगिरी नाही , चातुर्य नाही , हेवे दावे नाही आजच्या भाषेत सांगायचे झाले तर कुठलेही राजकरण माहीत नसलेल्या नटाला अनेकांनी फसवले पण त्यांनी कुणालाही दुखावले नाही. त्याचे व्हायचे झाले तेच झाले सुमार दिसणारे मराठीतील अनेक चेहरे पुढे गेले आणि ‘ विवेक ‘ मागे राहिले. त्याच्या ‘ देवबाप्पा ‘ ह्या चित्रपटापासून ते सर्वाना खऱ्या अर्थाने परिचित झाले. ‘ जेथे सागरा धरणी मिळते ‘ हे गाणे आजही कुणी विसरू शकत नाही , ते गाणे ठाण्याच्याच कवीश्रेष्ठ पी. सावळाराम यांनी लिहिले. त्या ‘ पुत्र व्हावा ऐसा ‘ या चित्रपटात त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या जीवनकला त्याच्याबद्दल म्हणतात की ते इतके जीव तोडून काम करत की त्याच्यासाठी दिग्दर्शकांना रिटेक घ्यावा लागत नसे.
गृहदेवता या चित्रपटात त्यांची मुलगी रेखा हिनेही त्याच्या लहानपणी काम केले होते . त्या सध्या पुण्याला राहतात तर त्यांची दुसरी मुलगी रेशम आठवले ठाण्यात राहतात. ठाण्यातील लीला मुळे याच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला होता . त्याच्या पत्नीनी अपार कष्ट घेतले , पडत्या काळात परिस्थिती ओढाताणीची झाल्यावर डगमगून न जाता लोणची , पापड , मसाले विकून संसाराला हातभार लावला. महाराष्ट्र शासनाचे तुटपुंजे आणि अनियमितपणे मिळणारे मासिक मानधन या सर्व गोष्टीचा सामना त्यांनी विवेकच्या जोडीने धैर्याने केला.
त्यांचे गाजलेले चित्रपट होते पुढचे पाऊल, दूधभात , वहिनीच्या बांगड्या . देवबाप्पा , पोष्टातील मुलगी , ओवाळणी , देवघर, गृहदेवता , धाकटी जाऊ , बोलकी बाहुली , कलंकशोभा , सुवासिनी , पुत्र व्हावा ऐसा , अपराध , भाग्यलक्ष्मी अशा एकूण ७५ ते ८० चित्रपटात त्यांनी काम केले . त्याच्या ‘ धाकटी जाऊ ‘आणि ‘ बोलकी बाहुली ‘ या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रपतीचे रौप्यपदक मिळाले .
त्यांनी ‘ राम जोशी ‘ या चित्रपटात माधवराव पेशव्यांची केलेली भूमिका त्यावेळी खुप गाजली. त्याचप्रमाणे त्यांनी रंगीला नावाचा एक हिंदी चित्रपटही केला होता.
विवेक यांनी अनेक नाटकांमधून कामे केली. आचार्य अत्रे यांच्या ‘ लग्नाच्या बेडी ‘ या नाटकात २५ वर्षे काम केले. त्यांनी लग्नाची बेडी , दिल्या घरी तू सुखी राहा , नाथ हा माझा या चित्रपटात कामेही केली होती.
त्यांच्यावर ‘ अभिनेता विवेक ‘ या नावाचे पहिलेच पुस्तक प्रकाशित झाले आहे. चारित्र्यसंपन्न कलाकाराचे ९ जून १९८८ रोजी पुण्यात निधन झाले .
— सतीश चाफेकर.
Leave a Reply