मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी गोडबोले या मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांच्या कन्या होत. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९७५ रोजी झाला. मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडलक्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी, यासारख्या हिंदी मराठी मालिका त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत. फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन हे चित्रपट त्यांनी गाजवले आहेत. कोका-कोला, च्यवनप्राश, जॉन्सन अशा मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत झळकलेल्या किशोरी गोडबोले या हिंदी-मराठी या दोन्ही इंडस्ट्रींत विनोदी अभिनयाचं अचूक टायमिंग आणि मिमिक्री यासाठी प्रसिद्ध आहेत. किशोरी गोडबोले या हेमा मालिनी यांची उत्तम मिमिक्री करतात. त्यांची पहिली मालिका ‘चुटकी बजाके’ होती.
किशोरी गोडबोले सध्या मराठी सृष्टीत कमी दिसत असल्या तरी हिंदी मालिकेत त्यांनी आपला चांगलाच जम बसवला आहे. किशोरी गोडबोले यांनी हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ‘स्टार प्रवाह’वर ‘माधुरी मिडलक्लास’ मधल्या माया राजे या व्यक्तिरेखेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होते. किशोरी गोडबोले आता मेरे साई या मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसत आहेत. मेरे साई या मालिकेद्वारे किशोरी तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतल्या आहेत. चित्रपट आणि नाटकांत व्यग्र असल्याने त्यांना मालिकेत काम करता आले नव्हते.
त्यांनी हिंदी व मराठी इंडस्ट्रीतल्या अशोक सराफ, सचिन पिळगावकर, बिंदू दारा सिंग, अतुल परचुरे, भरत जाधव, देवेन भोजानी अशा एकापेक्षा एक विनोदवीरांसोबत त्यांनी काम केलं आहे. त्यांना हिंदी आणि मराठी यापैकी कुठल्या भाषेत काम करणं जास्त आवडतं, असा प्रश्न विचारला की मात्र उत्तर देताना त्यांची पंचाईतच होते. ‘माहेर आवडतं की सासरं असं एखाद्या स्त्रीला विचारलं जातं, तेव्हा ‘हे’ की ‘ते’ निवडावं असा पर्याय तिच्यासमोर नसतो. माझ्यासाठी हिंदी इंडस्ट्री ‘सासर’आहे तर मराठी इंडस्ट्री माहेर आहे’ असं उत्तर देऊन या प्रश्नाचा पेच त्या सोडवतात.
किशोरी गोडबोले यांचे पती सचिन गोडबोले यांचे दादर येथे खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे अद्ययावत दुकान आहे. सचिन यांच्या आई सुमती गोडबोले यांनी अगदी पाच पदार्थ विकून हा व्यवसाय उभा केला होता. सचिन गोडबोले हे जपानमधील एका बड्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. पण वडिलांच्या निधनानंतर आईने त्याला नोकरी सोडून तिचा व्यवसाय सांभाळण्याची गळ घातली आणि मुलाने आईच्या या शब्दाखातर उच्च पदाची नोकरी सोडली. विशेष म्हणजे त्यांच्या पदार्थांची लोकप्रियता आणि मागणी इतकी वाढली की थेट परदेशातून त्यांच्या पदार्थांना मागणी येऊ लागली. इतकंच नाही तर अभिनेत्री माधुरी दीक्षित ज्यावेळी परदेशात स्थायिक झाली त्यावेळी तिच्या घरी दिवाळीमध्ये खास गोडबोले यांच्याकडूनच फराळ यायचा.
“किशोरी गोडबोले” यांच्या भगिनी “संगीता शेंबेकर”. संगीता शेंबेकर या देखील आपल्या वडीलांप्रमाणे गायन क्षेत्रातच उतरल्या. त्यांचे पती किरण शेंबेकर आणि संगीता शेंबेकर दोघेही अनेक मंचावर आपल्या गायनाचे जाहीर कार्यक्रम सादर करतात. अनेक चित्रपट गीते देखील त्यांनी गायली आहेत. तर त्यांचा मुलगा निहार शेंबेकर हा देखील संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी घेताना दिसत आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply