अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापूरमध्ये ७ जुलै १९४४ रोजी झाला. त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता आणि म्हणूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्या चंदेरी दुनियेत प्रवेश करत्या झाल्या. त्यांचे वडील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण हे आधुनिक विचारांचे असल्याने त्यांनीही या त्यांच्या निर्णयाला रोखलं नाही.
अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.
पुढे त्यांच्या यशाचा आलेख हा नेहमी चढता राहिला. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांमधून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्या कधी नायिकेच्या तर कधी खलनायिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. भूमिका कुठलीही असो, त्या भूमिकेत संपूर्णपणे एकरूप होऊन ती साकारित असत. म्हणून त्यांना सहजाभिनय करण्यास कुठलीच अडचण भासली नाही.
त्यांनी केलेल्या प्रत्येक भूमिका या नेहमी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकत असत.
त्या फक्त चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होत्या असं नसून त्यांनी रंगभूमीवरही कारकीर्द गाजवली होती. त्यांच्या नाटकांतील पात्रं कितीतरी काळ प्रेक्षकांना त्यांच्या आठवणीत बांधून ठेवीत असत. ‘गुंतता हृदय हे’ मधील ‘कल्याणी’, ‘नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल’ मधील ‘सुनीता’, ‘माझी बायको माझी मेव्हणी’ मधील ‘रसिका’, ‘लग्नाची बेडी’ मधील ‘रश्मी’ या भूमिकांनी तर अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली.
त्यांच्या नाटकांतील अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना महाराष्ट्राची ‘मर्लिन मन्रो’ हा किताब दिला.
पद्मा चव्हाण यांच्याविषयी पत्रकार व रंगकर्मी शिरीष कणेकर यांनी एक किस्सा लिहिलाय. कणेकरांचा एक प्रयोग शिवाजी रंगमंदिरात सुरू होता. त्या प्रयोगाला पद्मा चव्हाण यांनी हजेरी लावली होती. त्यात शिरीष कणेकरांचा “पद्मा चव्हाणला महाराष्ट्राची मर्लिन मन्रो म्हणतात असं तिकडे अमेरिकेत मन्रोच्या कानावर गेलं म्हणून ना तिने आत्महत्या केली?” असा संवाद होता. आता कणेकरांची पंचाईत झाली की खुद्द पद्मा चव्हाण समोर असताना संवाद फेकायचा कसा? कदाचित त्या संवादाला खिलाडूवृत्तीने स्विकारतीलही पण जर प्रेक्षक त्यांच्यासमोर चित्रविचित्र आवाजांनी चिरकले तर काय होईल? अशी भिती त्यांना वाटत होती. प्रयोग करत असताना आपण घाबरलो होतो आणि तो संवाद घेतला की नाही हेच मला आठवत नाही. कदाचित भीतीपोटी तो संवाद न घेतल्याची शक्यता जास्त. असं कणेकरांनी लिहून ठेवलं आहे.
त्यांनी केलेल्या चित्रपटांपैकी निवडक चित्रपट खालीलप्रमाणे:
१) अवघाची संसार(१९६०)
२) सुहाग सिंदूर(१९६१)
३) स्त्री(१९६१)
४) बिन बादल बरसात(१९६३)
५) कश्मीर की कली(१९६४)
६) फ्लाइंग मॅन(१९६५)
७) नागिन और सपेरा(१९६६)
८) दोस्त असावा तर असा(१९७८)
९) अष्टविनायक(१९७९)
१०) करवा चौथ(१९८०)
११) खून की टक्कर(१९८१)
१२) अंगूर(१९८२)
१३) जीवनधारा(१९८२)
१४) गुपचूप गुपचूप(१९८३)
१५) सद्मा(१९८३)
१६) जीत हमारी(१९८३)
१७) वह फ़िर आयेगी(१९८८)
नाटकं:
१) गुंतता हृदय हे(कल्याणी)
२) नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल(सुनीता)
३) पिंजरा(आई)
४) बायकोला जेव्हा जाग येते(अवंतिका)
५) बिवी करी सलाम(रमा)
६) मवाली(अलकनंदा)
७) माझी बायको माझी मेव्हणी(रसिका)
८) म्हणून मी तुला कुठे नेत नाही(सत्यभामा)
९) लग्नाची बेडी(रश्मी)
१०) लफडा सदन(संदिका)
११) वाजे पाऊल आपुले(सुशीला)
१२) सखी शेजारिणी(प्रीती)
१३) सासरेबुवा जरा जपून
१९७५ या वर्षात ‘या सुखांनो या’ व १९७६ मध्ये ‘आराम हराम है’ या चित्रपटातील भूमिकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले.
अशा या सौंदर्यवतीला, अप्सरेला, महाराष्ट्राच्या मर्लिन मन्रोला जन्मदिनानिमित्त आपल्या समूहाकडून मानाचा मुजरा.
– आदित्य दि. संभूस.
संदर्भ: माहितीजाल / बोलभिडू.कॉम
०७/०७/२०२१.
Leave a Reply