अभिनेत्री पल्लवी जोशीचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी झाला.
पल्लवी जोशी या मूळच्या मुंबईच्या. त्यांचे वडील मध्य प्रदेशातील इंदूरजवळच्या धार जिल्ह्यातील आहेत. पल्लवी जोशी यांचे किंग जॉर्ज शाळेत शालेय शिक्षण झाले व बांद्रा येथील रिझवी कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. चित्रपट आणि नाटक क्षेत्राची पार्श्वधभूमी असलेल्या त्यांच्या परिवाराची ही तिसरी पिढी आहे.
पल्लवी यांची आजी विमल घैसास आणि वडील हे दोघे बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक कंपनीत काम करत होते. पल्लवी जोशी यांच्या आई शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका होत्या. त्या संगीतात एम. ए. करत असताना त्यांची आणि पल्लवी यांच्या वडिलांची भेट झाली आणि तिथून त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरवात झाली. पल्लवी जोशी यांच्या वडिलांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यासोबत ‘माझा कुणा म्हणून मी’, ‘अकुलीना’, ‘मिलन’ अशा अनेक नाटकांची निर्मिती केली.
पल्लवी या चार- पाच वर्षांची होत्या, तेव्हापासूनच त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरवात झाली. त्यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटांतून अभिनयाला सुरवात केली. ‘खम्मा मारा वीरा’ या द्विभाषिक गुजराती आणि ‘रक्षाबंधन’ या हिंदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला आणि त्यासाठी पल्लवी यांना गुजरात सरकारकडून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही मिळाला. त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का नावाचे दोन चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनी १९७९ साली आलेल्या झालेल्या दादा ह्या चित्रपटात एक कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीच्या भूमिका साकारली होती. १९८० आणि १९९० च्या काळात त्यांनी काही आर्ट फिल्म मध्ये काम केली ज्या मध्ये रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी, वंचित आणि रिहाई प्रमुख होता. त्यांनी व्यावसायिक मोठ्या बजेटची चित्रपटात बहिण किवा हिरोईनची मैत्रीण सारखे सहकारी भूमिकेत देखील अभिनय केली होती ज्यात सौदागर, पनाह, तहलका आणि मुजरीम हे चित्रपट प्रमुख होता.
पल्लवी जोशी यांनी मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत काम केले आहे. एखादा अपवाद वगळता नेहमी हिंदीत रमणारी पल्लवी जोशी मराठीतून “सा रे ग म’ करू लागल्या, तेव्हा समस्त मराठी रसिकांना तो सुखद धक्का होता. त्यांचे निवेदन, टाळ्या वाजविण्यासाठीचे आवाहन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. हिंदीतील “अंताक्षरी’ही त्यांनी केली. “रिटा’ हा मराठी चित्रपट त्यांनी केला आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या “बुद्धा इन ट्रॅफिक जॅम’ या चित्रपटात ती अनुपम खेर यांच्या पत्नीची भूमिका केली होती. “सौदागर’, “तेहलका’ मध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या. श्याम बेनेगल यांच्या “मेकिंग ऑफ महात्मा’ मध्येही त्यांनी काम केले होते. “वो छोकरी’ साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. टीव्हीवरही “जुस्तजू’, “अल्पविराम’ या त्यांच्या मालिका खूप गाजल्या. आतापर्यंत त्यांनी जवळपास ८५ हून अधिक मालिका आणि ६५ ते ७० चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
पल्लवी यांची बहीण पद्मश्री या एक रंगकर्मी आहेत. त्यांचा विवाह ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्याशी झाला आहे. त्यांचा मुलगा गंधार रॅप सिंगर आहे. पल्लवी यांचा भाऊ मास्टर अलंकार हा प्रसिद्ध बालकलाकार होता. पल्लवी यांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याशी लग्न केले असून विवेक अग्निहोत्री यांनी ‘चॉकलेट’, ‘धनधान गोल’, ‘हेट स्टोरी’, ‘बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम’, ‘द ताश्कंयद फाइल्स’, ‘कश्मीर फाईल्स’ अशा अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
पल्लवी जोशी व त्यांचे पती विवेक अग्निहोत्री हे सध्या त्यांच्या ‘कश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply