अभिनेत्री रिंकू राजगुरूचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला.
‘सैराट’ या एकाच चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये रिंकूने ‘आर्ची’ची व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटाने तिला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवून दिली. आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणाऱ्या नायिकेपेक्षा अत्यंत विपरीत अशी नायिका रिंकूनं या चित्रपटात साकारली आणि प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. रिंकू राजगुरू मूळची सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजची. तिचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरू.
अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नसताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला निवडले आणि या संधीचं रिंकूनं सोनं केलं. ‘सैराट’चा पुढे कन्नडमध्येही रिमेक झाला. तसेच हा चित्रपट कालांतरानं हिंदी भाषेतही आला. ‘सैराट’मधील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘सैराट’च्या सुपरडुपर यशानंतर ‘कागर’ हा रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा यायला बरेच दिवस लागले. ‘कागर’ या तिच्या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. परंतु, तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिने ‘झुंड’ व ‘मेकअप’चित्रपटामध्ये काम केले आहे.
रिंकू राजगुरूने गेल्या वर्षी वेबविश्वात पदार्पण केले आहे. रिंकु राजगुरूने ‘हंड्रेड’या हॉट स्टारवरील वेबसीरिज मध्ये लारा दत्ता सोबत काम काम केले आहे. या वेबसीरिज मध्ये एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या नेत्राने (रिंकू राजगुरू) अन्य मुलींप्रमाणेच अनेक स्वप्न पाहिली असतात. यात स्वित्झर्लंडला जाण्याचं स्वप्न नेत्राने मनाशी अगदी कवटाळून धरलं असतं. मात्र तिच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडतो ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. याच काळात तिची भेट एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी (लारा दत्ता) होते आणि या कथेला नवं वळण मिळतं. एका सर्व सामान्य कुटुंबात वाढलेली नेत्रा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन वाट धरते. या वाटेत तिला कोणकोणत्या अ़डचणी येता, ती स्वप्न कसं पूर्ण करते, ही या वेबसीरिजची कथा आहे. रिंकू राजगुरू लवकरच ‘आठवा रंग प्रेमाचा’नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply