शांता हुबळीकर यांचा जन्म १४ एप्रिल १९१४ रोजी कर्नाटकातील हुबळी या शहराजवळील ‘अदरगुंजी’ या खेडेगावात शेतकरी कुटूंबात झाला. त्यांचे बालपण तसे कष्टाचेच गेले. त्यांचे मूळ नाव राजम्मा. त्यांच्या वडिलांचे नाव दोड्डप्पा. वयाच्या तिसऱ्या वर्षी आई-वडिलांचे लागोपाठ निधन झाले, तेव्हा मोठी बहीण नीला म्हणजे नीलम्मा लग्न होऊन सासरी गेली होती, तर धाकटी बहीण शारदा फक्त अकरा दिवसांची होती. या पोरक्या पोरी आईच्या आईकडे म्हणजे आजीकडे वाढत असताना मोठा दुष्काळ पडला. या मुलींना पोटभर खाऊपिऊ घालणे अशक्य वाटल्याने आजीने मुलींना हुबळीला आपल्या विधवा शेतमालकिणीकडे, सावित्राक्काकडे पाठविले. सावित्राक्का निपुत्रिक असल्यामुळे चंद्राक्का या दत्तक मुलीसह तेथील एका चिरेबंदी वाड्यात राहत असे. तिने राजम्माचे नाव ‘शांता’ ठेवले. मुलींना प्रेमाने वाढविले. इथे शांताला शालेय शिक्षण, स्वयंपाकादी गृहकृत्यांचे शिक्षण मिळाले आणि अब्दुल करीमखाँ साहेबांकडून चार वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण लाभले. सावित्राक्काने वृद्धत्वामुळे चंद्राक्का आणि जावई चन्नप्पा यांच्या हाती जमीनजुमल्याचा सर्व कारभार सोपविला. सुशिक्षित, काळ्यासावळ्या, अनाथ शांताचे लग्न जमेना, तेव्हा चंद्राक्काने एका पंच्याहत्तर वर्षांच्या वृद्धाशी शांताचे लग्न लावून देण्याचे ठरविले. अंबू या जिवलग शालेय मैत्रिणीकडून ही बातमी कळताच शांता अंबूच्या पतीच्या सहाय्याने घरातून निसटली, त्यांच्याच शिफारशीने गदग येथे ‘गुब्बी’ या नाटक कंपनीत १९३० साली काम करू लागली. त्यामुळे तिचे राहणे, जेवण व पगार यांची सोय झाली.
पुढे त्यांना १९३० नंतर नाटकात थोड्या महत्त्वपूर्ण भूमिका मिळू लागल्या. कंपनीचा मुक्काम हुबळी, बेळगाव येथे असताना बेळगावमध्ये त्यांच्या खोलीशेजारी शांता बेहेरे नावाची मुलगी वासुदेवराव शिंदे या केशवराव भोसल्यांच्या जावयाच्या मार्गदर्शनाखाली पेटी शिकत होती. १९३५ साली तिथे त्यांनी शांताबाईंचा आवाज ऐकून त्यांची शिफारस कोल्हापूर सिनेटोनच्या व्यवस्थापकांकडे केली, तेव्हा त्यांना बाबूराव पेंढारकरांच्या कोल्हापूर सिनेटोनमध्ये नोकरी मिळाली आणि त्यांची चित्रपटातील कारकीर्द सुरू झाली.
भालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. भालजींच्या साध्या राहणीचा आणि वक्तशीरपणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. कान्होपात्रा या चित्रपटात त्यांनी कान्होपात्रेच्या आईची भूमिका केली. इथे दिनकर कामण्णा, चिंतामणराव कोल्हटकर आदींकडून त्यांना अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या.
१९३७ मध्ये त्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये त्या रुजू झाल्या, तिथेच त्यांना अमाप लोकप्रियता, वैभव मिळण्यास सुरुवात झाली. त्यांची परीक्षा घेतली व्ही. शांताराम आणि प्रभातमधील इतर मोठया मंडळींनी. त्या वेळी ‘माझा मुलगा’ तर हिंदी मध्ये ‘मेरा लडका’ दिग्दर्शित करणारे के. नारायण काळे यांनी त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांना नायिकेची भूमिका दिली. त्यानंतर व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘माणूस’ आणि हिंदीत ‘आदमी’ या चित्रपटाने त्यांना कीर्ती, पैसा, लोकप्रियता मिळवून दिली. व्ही. शांताराम यांच्यामुळे त्यांचा या चित्रपटातील अभिनय उत्कृष्ट झाला. त्यातील त्यांचा अभिनय, गाणी प्रचंड गाजली. त्यांनी अभिनय करून गायिलेले ‘आता कशाला उद्याची बात ’ हे गीत अजरामर ठरले. पुढे व्ही. शांताराम यांच्याशी मतभेद झाल्यावर त्यांना प्रभात फिल्म कंपनी सोडावी लागली. दुर्गा खोटे निर्मित ‘सवंगडी’ चित्रपटासाठीही शांता हुबळीकरांनी गाणी गायली.
पुणे येथील मुक्कामी शांता हुबळीकरांचा बापूसाहेब गीते यांच्याबरोबर परिचय झाला व १९३९ साली त्या विवाहबध्द झाल्या. त्यांचा दुसरा मुलगा प्रदीप याच्या नावाने पुण्यात त्यांनी ‘प्रदीप’ हा भव्य बंगला बांधला परंतु नवऱ्याचा कर्जबाजारीपणा, मुलगा प्रदीप याची जबाबदारी यांमुळे बंगला, गाडी सर्व विकून भाड्याच्या खोलीत राहण्याची त्यांच्यावर वेळ आली. १९४५ मध्ये शांताबाईंनी ‘कुलकलंक’ हा चित्रपट केला. तो त्यांचा नायिका म्हणून अखेरचा चित्रपट.
त्यानंतर चरितार्थासाठी शांताबाईंनी १९४५–५७ दरम्यान हैदराबाद, निजामाबाद, दिल्ली, आग्रा, कानपूर, इंदूर, ग्वाल्हेर इ. शहरांतून जलसे केले; नाटकांत कामे केली; गाण्याचे कार्यक्रम केले. परिस्थितीमुळे त्यांना चित्रपटात काम करणे भाग पडले. प्रभात, घर की लाज, कुलकलंक, मालन, घरगृहस्थी,सौभाग्यवती भव इत्यादी हिंदी चित्रपटांत त्यांनी कामे केली त्यानंतर त्या पुन्हा एकदा मराठी चित्रपटांकडे वळल्या. विश्राम बेडेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘पहिला पाळणा’ मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. मातृभाषा कानडी असूनही शांताबाईंनी फक्त एकाच कानडी चित्रपटात काम केले. चित्रपटाचे नाव होते ‘घरसंसार’.
वयोमानामुळे शांता हुबळीकर यांना नायिकेचे काम मिळेना,अखेर त्यांनी चरित्र अभिनेत्रीचे काम स्विकारायचे ठरवले. फिल्मिस्तानच्या ‘सौभाग्यवती भव’ या सिनेमात पहिल्यांदाच चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली. १९५८ साली प्रदर्शित झालेला हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला. सिनेमात काम मिळायचे जवळपास बंद झाल्यामुळे शांता हुबळीकर यांनी गायनाबरोबरच भावगीते तसंच नाट्यसंगीताचा कार्यक्रम त्या करीत. त्या कार्यक्रमांना प्रचंड लोकप्रियता लाभली. पण आर्थिक नियोजनभावी हे कार्यक्रम कालांतराने बंद पडले.सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे त्यांना निवृत्तिवेतन मिळू लागले आणि लोकांनी देणग्या दिल्या. १९८९ मध्ये त्यांचा अमृतमहोत्सव संपन्न झाला. जागतिक मराठी परिषदेत त्यांचा सत्कार करण्यात आला, तेव्हा त्यांना अनेक जुने सहकलाकार भेटले. त्यांची पुणे महिला मंडळाच्या वृद्धाश्रमात शांताबाईंची सोय लागली.ते साल होते १९८९. मृत्यूपूर्वी म्हणजे १९९० साली त्यांनी ‘कशाला उद्याची बात’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी माणूस चित्रपटातील अभिनयासाठीचा १९३९ साली बंगाल फिल्म असोसिएशनचा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला.
एकेकाळी सार्या भारतभर लोकप्रियता मिळवणा-या शांता हुबळीकरांची वैयक्तिक आयुष्यात लहानपणापासुनच चढउतार येत होते.आयुष्याचा उत्तरार्ध तर खुपच हालाखीचा होता.झगमगत्या जगापासून आणि स्वकियांपासून दूर अनेक वर्षे आश्रमात राहून अज्ञातवासातच काढली तेही एका अनाथाश्रमात. १९८८ मध्ये एका प्रसिध्द वृत्तपत्रात त्यांच्या आश्रमातील जीवनावर आधारीत खळबळजनक लेख प्रसिद्ध झाला आणि शांता हुबळीकरांचे आयुष्य पुन्हा बदलले आणि त्या अज्ञातवासातून बाहेर पडल्या, समाजात वावरू लागल्या. पण त्याकाळात देखील त्यांना कौटुंबिक सुख लाभले नाही, त्यांचे पती बापूसाहेब गीते यांचे १९७७ सालीच निधन झाले होते.
शांता हुबळीकर यांनी मृत्यूपूर्वी ‘कशाला उद्याची बात’ हे आत्मचरित्र लिहिले १९९० साली लिहिले. पुढे त्यांनी आश्रमात न राहता पुणे येथील अनाथ महिला मंडळाच्या आश्रमात त्यांनी आश्रय घेतला होता. तिथेच त्यांचे १७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply