शांता जोग म्हणजे शांता दत्तात्रय जोग ह्याचा जन्म २ मार्च १९२५ रोजी झाला. त्याचे माहेरचे नांव शांता खरे. त्या मूळच्या नाशिकच्या, त्यांचे वडील केशवराव खरे आणि त्यांच्या घरातील अन्य मंडळी याना नाटकाचा मनस्वी नाद होता. जुन्या पिढीतले मोठमोठे कलाकार त्यांना ओळखत ते रसिकवर्य केशवराव खरे यांची मुलगी म्हणून. नाशिक येथील श्री. बाळासाहेब काळे यांनी बसवलेल्या ‘ छापील संसार ‘ या नाटकात त्यांनी काम केले. त्याचे तीन प्रयोग केले. त्या काळातील हे तीन प्रयोग म्हणजे एक छोटासा विक्रमच म्हणावा लागेल.
१९४१ साली शांताबाईचे लग्न श्री. जोग यांच्याशी झाले. परंतु लग्नानंतर श्री. जोग यांनी शांताबाईचे शिक्षण चालूच ठेवले. १९४२ साली शांताबाई मॅट्रिक झाल्या आणि नाशिकच्या कॉलजमध्ये फर्स्ट इयरचा अभ्यास करू लागल्या. नाशिकला असताना स्थानिक कलाकारांनी ‘ तारामंडल ‘ हे नाटक केले. त्यात त्यांनी काम केले. पुढे त्या पुण्यास आल्या तेथे फर्गुसन कॉलेज ने बसवलेल्या ‘ उसना नवरा ‘ या नाटकात काम केले. तेव्हा त्यांचे पुढील शिक्षण चालूच होते. त्यांनी भालजी पेंढारकरांच्या ‘ सासुरवास ‘ या चित्रपटात भूमिका केली. त्याचप्रमाणे राजकमलच्या ‘ वनवासी ‘ या चित्रपटातही काम केले. त्यामुळे थोडासा शिक्षणात खंड पडला. परंतु त्या १९४७ साली त्या बी. ए. झाल्या. त्यानंतर त्यांनी कुलवधू, एक होता म्हतारा, वो बाप के बेटे, कोणे एके काळी, राणीचा बाग या नाटकात कामे केली.
पुढे त्या श्री. जोग याच्याबरोबर मुबईला आल्यावर त्यांनी काकासाहेब खाडिलकर यांच्या ‘ सत्वपरीक्षा ‘ या साहित्य संघाच्या नाटकात काम केले. त्याचप्रमाणे वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ वैजयंती ‘ नाटकात काम केले. त्याचप्रमाणे भाऊबंदकी, श्री, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, बाळ कोल्हटकरांचे ‘ अंगाई ‘ या नाटकात कामे केली. तर ‘ येरमा ‘ ह्या इंग्रजी नाटकात काम केले त्याचप्रमाणे ‘ अँन्टिगनी ‘ या इंग्रजी नाटकात काम केले. पुढे क्रोचवध, पुत्रवध, पुत्र मानवाचा, सूर्याची पिल्ले, शं. ना. नवरे यांचे ‘ मन पाखरू पाखरू ‘ या नाटकात काम केले. त्याचप्रमाणे आराम हराम आहे, २२ जून १८९७, वऱ्हाडी नी वाजंत्री आणि सोबती या चित्रपटात कामेही केली. त्यांना मराठी माणसानी डोक्यावर घेतली ती त्यांची अजरामर भूमिका होती ‘ नटसम्राट ‘ या नाटकातील ‘ सरकार ‘ ची म्हणजे कावेरी ची भूमिका. त्यांच्यासमोर होते कसलेले कलाकार डॉक्टर श्रीराम लागू. ती भूमिका त्यानी समर्थपणे पेलली परंतु डॉक्टर श्रीराम लागू यांच्यानंतर ती भूमिका दत्ता भट यांनी केली. तेव्हा त्या ‘ सरकार ‘ म्हणजे कावेरी ची भूमिका करत होत्या. त्यानंतर आले ते वसंत कानेटकर यांचे ‘ हिमालयाची सावली ‘ हे नाटक. ह्याही नाटकात त्याच्याबरोबर डॉक्टर श्रीराम लागू होते. ही दोन्ही नाटके इतकी जबरदस्त होती की त्या नाटकांचा पगडा आजही मराठी मनावर आहे. त्यांचे नटसम्राट, हिमालयाची सावली आणि सूर्याची पिल्ले ही नाटके मी पहिली आहेत, नटसम्राट तर कितीतरी वेळा बघीतले आहे.
त्यांनतर त्यांनी सुरेश खरे यांचे ‘ मंतरलेली चैत्रवेल ‘ हे नाटक केले. ह्या नाटकातील त्यांची भूमिका अत्यंत वेगळी होती. त्या नाटकाचे सगळेकडे प्रयोग होत असत. त्याच्या सोबत जयराम हर्डिकर हे देखील काम करत. ‘ मंतरलेली चैत्रवेल ‘ या नाटकाचा दौरा दक्षिण महाराष्ट्रात चालू असताना ५ एप्रिल १९८० रोजी बसला अपघात झाला. बसमध्ये कॅनमध्ये ठेवलेल्या इंधनाने सर्वजण अर्धवट झोपेत असताना अचानक पेट घेतला आणि त्या आगीत शांता जोग व जयराम हर्डिकर त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सर्व महाराष्ट्र हळहळला. मराठी नाट्यसृष्टीमधील दोन मोठे कलाकार हे जग सोडून गेले होते.
शांता जोग यांचे आत्मचरित्र ’ रंग आणि दंग ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply