आदरणीय बाबासाहेब..
तुम्ही आयुष्यातील पहिले कर्ज
पुस्तकांसाठी घेतले होते,
असे एकदा कानावर आले होते.
ते आम्हीही जयंती मयंतीला सांगतो.
अगदी टाळ्यांच्या कडकडाटात !!
पण चुकून कधीही
पुस्तकाला हात लावित नाहीत.
मला सांगा,
पुस्तकांनी कुठे पोट भरते का?
इतर पुस्तकांचं जाऊ दे
तुमच्या दक्ष निगराणीखाली तयार झालेली
भारताची राज्यघटना तरी
उठ-सुट तुमचं नांव घेणाऱ्या
किती जणांच्या घरी आहे?
आणि आहे त्यातील किती जणांनी
ती उघडून वाचली आहे?
याचं उत्तर नकारार्थीच येईल..
पुस्तकावरच घसरलो तर..
पोटासाठी नामांतर चळवळ,
पोटासाठी बाबासाहेबांचा विचार,
पोटासाठी राजकीय दलाली,
पोटासाठी जयंती-पुण्यतिथी,
पॊटासाठी खास आपला एक मॉब,
असे एक ना भाराभर विषय पडलेत की..,
त्यात पुस्तकांची रद्दी कशाला आणखी..!!
बाबासाहेब, तुमची शिकवण
कुणालाच अंगीकारायला
नको आहे.
कारण ती मूल्यांवर चालायला शिकवते.
आणि त्या ‘मुल्या’चा अर्थ
पैसा असाही दिसतोय डिक्शनरीत;
आणि तो कमावण्याचा तुम्ही एक ‘ब्रान्ड’..
एक चलनी नाणं..!
तुमच्या शिकवण, तुमची मुल्य आम्ही विसरलेली नाही,
वर्षातून दोनदा, जयंती आणि पुण्यातिथीला आणि पांच वर्षांतून एकदा
निवडणूकांच्या वेळी
त्याची आम्ही हमखास आठवण काढतो बाबासाहेब..
जशी आज काढलीय..!
आम्ही कुठे विसरलोत तुम्हाला?
— नितीन साळुंखे