त्यांचा शाळेच्या माजी विद्यार्थी-शिक्षकांचा व्हॉट्सप ग्रुप होता.
तरूणांपासून ज्येष्ठ नागरीकांपर्यंत असे अनेक जण त्या ग्रुपमध्ये.
तितकी जुनी परंपरा होतीच त्यांच्या शाळेची.
विश्वस्त मंडळाकडून शाळेसंदर्भात रोज काही ना काही यायचं ग्रुपवर.
कधी प्रगतीचा आलेख , कधी नवीन माहिती,
कधी नव्या इमारतीच्या बांधकामाचा आढावा,
कधी शाळेबद्दल वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी वगैरे ..
त्यातच एके दिवशी दहावीचे निकाल लागले.
सगळ्या विद्यार्थ्यांचे एकापेक्षा एक सरस टक्के.
शाळेचा एकंदरीत निकाल सुद्धा अगदी समाधानकारक.
शाळेच्या भरीव कामगिरीचे ते सगळे मेसेज बघून त्याला खूप छान वाटलं.
त्यात आपल्या शाळेबद्दल म्हंटल्यावर जरा जास्तच अभिमान वाटला.
स्वतःच्या शाळेबद्दल प्रत्येकालाच एक हळवा कोपरा असतोच ..
आणि तो असायलाच हवा.
त्या मेसेजच्या गर्दीतच थोड्यावेळाने एक फोटो झळकला.
मुख्याध्यापकांसोबत उभी असलेली प्रसन्न चेहऱ्याची एक हसरी मुलगी.
जोडीला तिच्याविषयी थोडी माहिती होती.
कॅन्सरसारख्या रोगाशी झुंज देत तिने ८२ % मिळवले होते.
पुढच्या चार ओळीत तिने भोगलेल्या यातना आणि त्यासाठीचा लढा.
त्याहून जास्त लिहिलं असतं तर वाचवलंच नसतं कदाचित.
सलग ट्रीटमेंट, त्यातून वेळ मिळेल तेव्हा अभ्यास .
तिची जिद्द आणि कठीण परिस्थितीत मिळालेलं यश थक्क करणारं होतं.
ग्रुप मधल्या सगळ्यांनाच खूप कौतुक वाटलं.
तिच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला.
पुढेही काही दिवस होत होता.
लवकर बरं होण्यासाठी सगळ्यांनी प्रार्थनाही केली.
त्यानंतरही शाळेच्या नवनवीन घडामोडी ग्रुप वर येतच होत्या.
लहान मुलांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती.
क्रीडा क्षेत्रात नाव कमावलेल्या मुलांच्या बातम्या.
शाळेत उभारलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेच्या उद्घाटनाचे फोटो.
असंच साधारण दिडेक महिना झाला .. आणि ..
त्याच मुलीचा सरांबरोबरचा तोच फोटो पुन्हा एकदा ग्रुपवर आला.
पण यावेळेस त्याखालचा मजकूर मात्र वेगळा होता.
अगदीच वेगळा ……
गेले काही दिवस त्रास वाढून अखेर तिने या जगाचा निरोप घेतला होता.
खरं तर महिन्याभरापूर्वी वाचलेली तिच्या बद्दलची पोस्ट इतकीच तिची ओळख.
तिचं नाव सुद्धा त्याला पूर्ण आठवत नव्हतं.
पण तरीही ती बातमी वाचून त्याचं मन हेलावून गेलं.
काहीही ओळख-पाळख नसूनही क्षणभर डोळ्यात पाणी आलंच.
तिचं फोटोतलं हसू बघून अगदी दाटून आलं आणि मनात विचार आले ..
“बाळा .. तुझे पालक-नातेवाईक यांच्या पुढच्या आयुष्यासाठी तुझा हाच हसरा फोटो आणि आजवरच्या आठवणींची शिदोरी सोबत असणार आहेच पण तुझी शिक्षणासाठीची तळमळ, जिद्द आणि तुला मिळालेल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असलेली तुझी सकरात्मकता यामुळे इतक्या लहान वयात सुद्धा नुसत्या शाळकरी मुलांसाठीच नाही तर आम्हा मोठ्या म्हणवणाऱ्यांना सुद्धा खूप मोठी शिकवण देऊन गेलीस आणि याचा तुझ्या पालकांना कायमच अभिमान वाटत राहील !!.”
थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.
(स्वानुभवावरून प्रेरित कथा)
©️ क्षितिज दाते , ठाणे
Leave a Reply