गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुजबूज संपली आणि अशोक चव्हाण पायउतार झाले. त्यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसने काही संकेत दिले असले तरी प्रश्न कायम आहेत. एखाद्याने गैरव्यवहार केला की हकालपट्टी होते पण भ्रष्टाचारही पचवला जातो असे चित्र उभे रहात आहे.
कलमाडींबाबतही नेमके हेच घडले आहे. ताज्या बदलामुळे जनतेला क्षणभर बरे वाटेलही पण समाजाभिमुख राजकारणापासून आपण आजही कोसो दूर आहोत.बराक ओबामा यांची पाठ वळताच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दोन बॉम्ब टाकले. मुंबईच्या आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेला राजीनामा मंजूर करून टाकला. राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळाप्रकरणी सुरेश कलमाडी यांची काँग्रेस संसदीय दलातून हकालपट्टी केली. सचिवपदाचा राजीनामाही स्वीकारण्यात आला.
या दोघा नेत्यांना खरोखर घोटाळे भोवले की यामागे अन्यही काही कारणे आहेत, याचा परामर्श घेतला जाणे क्रमप्राप्त ठरते.
भ्रष्टाचार हाच मुद्दा दोघांना भोवला का? आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात महसूल मंत्री नारायण राणे यांचेही नाव घेतले जात असून त्यांचीही गच्छंती होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांच्या कारकीर्दीस एक वर्ष पुरे होते न होते तोच आदर्श सोसायटी घोटाळा भोवून त्यांना राजीनामा द्यावा लागला. बर्याच दिवसांपासून हा घोटाळा गाजत होता. काही दिवसांपूर्वी चव्हाण यांनी दिल्ली येथे जाऊनपक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. सोनिया गांधींनी बरेच दिवस त्यावर निर्णय घेतला नाही.राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्याचे प्रकरणही याच काळात गाजत होते. या क्रीडा स्पर्धा आयोजनाची सर्व सूत्रे सुरेश कलमाडीयांच्याकडे होती. त्यांनीही पक्षाच्या संसदीय समितीच्या सचिवपदाचा राजीनामा सोनियांच्या सुपुर्द केला होता.
उभयतांचे राजीनामे घेऊन ठेवण्यात आले पण बरेच दिवस स्वीकारले का गेले नाहीत, हा एक उत्सुकतेचा विषय ठरला होता. पक्षश्रेष्ठींनी दोघांना वाचवले, त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे पाठ फिरवली अशा अटकळी बांधल्या जाऊ लागल्या. परंतु सोनियाजी केवळ योग्य वेळेची वाट पाहात होत्या. त्यांनी राजीनामे स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता, हे काल स्पष्ट झाले. अखेर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पाठ वळताच दोघांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले. एका अर्थाने सोनियाजींनी हा योग्य निर्णय घेतला. प्रसारमाध्यमांनी जगातील सर्वशक्तीमान नेत्याच्या भारतभेटीत राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरेजगाच्या वेशीवर टांगू नयेत, हा यामागील हेतू विवेकी म्हणायला हवा.
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री लवकरच निश्चित होईल. त्यासाठी काँग्रेसमध्ये लगेचच लॉबिंग सुरू झाले. दिल्ली दरबारी वजन टाकण्याचे प्रयत्नही त्वरित सुरू झाले.चव्हाण किंवा सुरेश कलमाडी यांना खरोखर घोटाळेच भोवले असावेत का? आदर्श सोसायटीत चव्हाण यांचे मेहुणे, मेव्हणी, सासू अशा झाडून सार्या नातलगांना फ्लॅट देण्यात आल्याचे आरोप आहेत. सोसायटीने जणू मुख्यमंत्र्यांच्या घरी फ्लॅटची खिरापतच वाटली असावी.
भ्रष्टाचार हा राजकारणात गृहितच असतो. तो कुठे नाही? भ्रष्टाचार करणे कठीण नाही पण तो पचवणे महाकठीण असते. असे महाकठीण कर्म अनेक राजकीय नेते लीलया पार पाडत असतात. भ्रष्टाचारात एखाद्याला वाटा मिळाला नाही किंवा मनाजोगता हिस्सा हाती आला नाही की असे घोटाळे उघडकीस येतात. वास्तविक पाहता अशा घोटाळ्यातील वाटे थेट वरपर्यंत जातात. त्यामुळे भ्रष्टाचारामुळेच उभयतांचे राजीनामे घेण्यात आले असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
मुळात अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदाला साजेसे वाटलेच नाहीत. मुख्यमंत्री होऊनही त्यांना गेल्या वर्षभरात पक्षात किंवा विरोधकांमध्ये मित्र मिळवता आले नाहीत. ते एकाकी पडत गेले. राजकारणात एक वेळ कितीही शत्रू केले तरी चालतात. परंतु जमेच्या बाजूला मित्रांची संख्याही मोठी असावी लागते. नेमके तेच चव्हाण यांना जमले नाही. स्व. शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणे त्यांच्यात उत्तम प्रशासकाचे गुणही नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना पक्षात गॉडफादर नाही. गॉडफादर असणे राजकारणात अत्यंत महत्वाचे असते. तो नसला तर अवस्था त्रिशंकू होते. याक्षणी चव्हाण आणि कलमाडी यांची अवस्था अशीच झाली आहे. हे गॉडफादर दिल्लीत बसून राज्यातील नेत्यांच्या ललाटीचे भविष्य लिहित असतात. अंतिम निर्णयाचा अधिकार पक्षाध्यक्षांचा असला तरी निर्णयप्रकि’येत हे गॉडफादर महत्वाची भूमिका बजावत असतात. आपले राजकीय वजन वापरून ते राज्य पातळीवरील संबंध टिकवण्याचा, पर्यायाने आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. याचा त्यांना भरघोस मोबदलाही दिला जात असतो. काँग्रेसमध्ये सार्याच नेत्यांना गॉडफादर आहेत. अगदी काल-परवा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नारायण राणेंनीही अल्पावधीतच प्रभा रावांसारखा गॉडफादर मिळवला होता. हेच गॉडफादर नेत्यांच्या घोटाळ्यांवर पांघरूण घालण्यात हातभार लावतात!
राजकारणातली ही प्रक्रिया दुर्दैवी अली तरी वस्तुस्थिती मानली जाते. दुर्दैवाने चव्हाणांना असा गॉडफादर मिळवता आला नाही. त्यामुळे दिल्लीदरबारी ते उघडे पडले. त्यांचे वकीलपत्र घेण्यास पक्षातील कुठलाही ज्येष्ठ नेता पुढे सरसावला नाही, यातच चव्हाणांच्या गाफीलपणावर प्रकाश पडतो.कुणाची हाजी हाजी करणे हा चव्हाणांचा स्वभाव नसेल. पण, राजकारणात मनाला न पटणारी अप्रिय कृती वारंवार करावी लागते, मनाविरुद्ध बोलावे लागते ! राजकारणात ठामपणे पाय रोवून उभे रहायचे असेल तर ‘नेटवर्किंग’ वाढवायला हवे हे त्यांना पटलेले दिसत नाही. याची किंमत त्यांना मोजावी लागणार होती. दरम्यान राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनातील घोटाळ्यात बुडाल्यामुळे कलमाडींना जावे लागले असे नाही; तर कलमाडींच्या पक्षातील विरोधकांनी त्यांना हुशारीने घेरले, हे लक्षात घ्यायला हवे. कलमाडींच्या घोटाळ्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा करून त्यांनी कलमाडींना घालवले आहे. या दोन्ही जागांवर दिल्लीतले गॉडफादर आपापली प्यादी पुढे करण्याच्या उद्योगाला पंधरवड्यापूर्वीच लागले असतील, यात काहीच शंका नाही. म्हणजेच मुख्यमंत्र्यांची निवड पंधरवड्यापूर्वीच झाली असून केवळ निवडीचा घोळ घातला जाईल. एव्हाना राजकारणीच नव्हे तर सामान्य जनताही या सोपस्कारांना सरावली आहे. त्यामुळे या घटनाचक्राचे आश्चर्य वाटणार नाही. मात्र, ज्या पद्धतीने राजकारणात साठमारी वाढत आहे आणि नैतिकता रसातळाला जात आहे ते पाहून सामान्य माणसाला चक्रावल्याशिवाय राहवणार नाही.
चव्हाणांचे नेमके काय चुकले?
* राजकारणात गॉडफादर लागतो असे सांगितले जात असले तरी गॉडफादर नसतानाही अनेक राजकारणी लोकप्रियता अबाधित राखतात. ही कला चव्हाणांना साधली नाही.
* विलासराव देशमुख, नारायण राणे आणि सुशीलकुमार शिंदे यापैकी एकाही नेत्याशी उत्तम प्रकारे जुळवून घेण्यात चव्हाणांना अपयश आले. त्यामुळे त्यांची लॉबी उभी राहिली नाही.
* अशोक चव्हाण अप-टू-डेट राहतात, इंग्रजी बोलतात, मीडियाबरोबर जास्त रमतात असे मुद्दे गेल्या काही दिवसात पुढे आले. त्यामुळे त्यांचा शहरी तोंडावळा सतत समोर येत राहिला. आमदारांच्या कोणत्याही गटाशी त्यांचे जवळचे संबंध निर्माण झाले नाहीत.
* काँग्रेसमधले माणिकराव ठाकरे, गोविंदराव आदिक, पतंगराव कदम अशा नेत्यांचे गटही त्यांच्यासोबत नव्हते. ते सहकार्यांपासून फटकून राहतात असेही चित्र उभे राहिले.
* राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही त्यांना सहानुभूती लाभली नाही. मुख्यमंत्र्यांचे दुसर्या पक्षातही चांगले मित्र असतात. या पातळीवरही अशोक चव्हाण काहीसे अपयशी ठरले. किंबहुना, अलीकडे त्यांचे छगन भुजबळ, अजित पवार आणि आर. आर. पाटील यांच्याशी जुळत नव्हते.
— मनोज मनोहर
(अद्वैत फीचर्स)
Leave a Reply