आई आणि वडील ही जीवनातील दोन सामर्थ्ये आहेत . भारतीय संस्कृती मध्ये राष्ट्र , आचार्य , अथिती , माता व पिता यांना परम आदराचे स्थान आहे . ‘ राष्ट्र देवो भवं i आचार्य देवो भवं ‘ या मंत्राप्रमाणे ‘ मातृ देवो भवं i पितृ देवो भवं ‘ हि संस्कारसूत्रे शिरोधार्य मानली जातात . कधी राष्ट्राला मातृभूमी तर कधी पितृभूमी म्हंटले जाते .
कोणाच्या जीवनावर आईचा तर कोणाच्या जीवनावर वडिलांचा प्रभाव तुलनेने अधिक प्रमाणावर अढळतो . शिवछत्रपतीनां त्यांच्या आईने काय दिले हे आख्खा महाराष्ट्र जाणतो . जिजाऊ या जगात नसत्या तर या मराठ्यांच्या इतिहासाला अंकुर फुटला नसता, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . अशा या राजमातेचा आदर्श सारया भारतीय संस्कृतीतील स्त्रियांना घेण्यासारखा आहे . या आदर्श राजमातेचा जन्म सर्व प्रकारच्या सुजलाम सुफलाम भूमीत म्हणजेच विदर्भातील बुलढाणा जिल्हयातील महेकर तालुक्यातील शिंधखेड गावातील लखुजी जाधव ब आई म्हाळसाबाई यांच्या पोटी १ २ जानेवारी १ ५ ९ ८ रोजी झाला . जिजाऊनां मोठे चार भाऊ होते. रघुजी , अचलोजि बहादूरजी , आणि दत्तोजी , यांच्या पाठीवर जिजाऊचा जन्म झाला कदाचित स्वराज्य संकल्पनेचा प्रकाश घेऊनच ही वीज लखलखली असावी . साऱ्या महाराष्ट्राला अंधारातून मुक्त करून आशेचा तेजोमई किरण देण्यासाठी या राजमातेचा जन्म झाला असावा . आईतील करारीपण, वडिलांमधील तल्लखता , शौर्य , कुलाभिमान , महत्वकांक्षा , या गुणांना वाव मिळणारे शिक्षण त्या घेत होत्या . घोडेस्वारी , दांडपट्टा , तलवारबाजी , अशा प्रकारचे शिक्षण लहानपणातच त्यांना मिळाले. त्या काळी आजच्या सारखी शिक्षणाची व्यवस्था नव्हती . त्या काळी कलम बहाद्दरापेक्षा तानाजी सारखे तलवार बहाद्दर महत्वाचे होते . त्यामुळे अशा प्रकारचे शिक्षण त्यांना मिळाले . राजकुटुंबातील महिलांना राज्यकारभाराचेहि शिक्षण अतिशय महत्वाचे होते . त्यामुळे कुटुंबातील सदस्याकडून त्यांना तेही शिक्षण मिळत गेले . रयतेवरिल संकटे , शत्रुचा पाठलाग , शत्रूकडून कैद , त्यातून सुटण्याची युक्ती असे अनेक अनुभव त्यांना लहानपणापासुनच मिळत गेले आणि त्या आत्मसात करत गेल्या .
बहुजन महिला संकटसमयी मुळूमुळू रडत बसत नव्हत्या . त्या संकटाच्या छातीवर बसत होत्या . अनेकदा संकटे ओढून घेण्याचे धाडस ही त्या करत होत्या. कुटुंबातील सर्वाना मोहिमेवर जाण्यासठी त्या प्रेरित करत होत्या . त्यांच्यात एकप्रकारची उर्मी निर्माण करत होत्या. या बरोबरच जिजाऊना राज्यरक्षण , राज्यकारभार , राज्यवर्धन , यासंबंधीचे शिक्षण बालपणापासूनच मिळत होते.
कोवळ्या वयात बाल जिजाऊ i तलवार चालवण्या शिकली हो i
रयतेवरचा अन्याय पाहुनी i वाघीण पेटून उठली हो i
अशा प्रकारे जिजाऊंचे वर्णन केले जाते.” जिजाऊ ” या शब्दाचा अर्थच मुळी ‘ महान ‘ आहे. एक दिवशी जिजाउंनी लाखोजी राजांना माझ्या नावाचा अर्थ काय आहे ? असे विचारले . तेव्हा लाखोजीराजे उत्तरले . जिजाउचा अर्थ जय- विजय , तुमच्याकडून एक यशोगाथा , विजयगाथा रचली जाईल . त्यामध्ये तुमच्या कर्तुत्वाचे , पराक्रमाचे , यशाचे , आदर्शाचे , माणुसकीचे , नीतीमत्तेचे , बुद्धिमत्तेचे , अध्याय असतील . याची प्रचीती घराघरात येईल. आणि यातून पुढची पिढी आदर्श घेईल.
जिजाऊ बद्दल पाहिलेले स्वप्न , उच्चारलेले शब्द , व्यक्त केलेली भावना आणि प्रकट झालेली आकांक्षा हि शिदोरी घेऊन त्याच्या पूर्तीसाठी जिजाऊ मासाहेब अखंडपने परीश्रम करत होत्या . अशा महान पराक्रमी मुलीचा विवाह तितक्याच पराक्रमी , खानदानी , सुसंस्कृत , मर्यादशील मुलाशी म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला .
जीजाउंचा अंगार फुलला ! शहाजीसवे विवाह घडला
सून लाभली भोसले कुळाला ! राष्ट्र घडवावया .
जिजाऊ म्हणजे लाखमोलाचा हिरा होती आणि त्यासाठी शहाजीराजांसारख कोंदण योग्यच होतं . अशा हिरयाचा विवाह इ . स १६१० साली झाला . जाधव घराण्याची मुलगी आता भोसले घराण्याची सून झाली . शिंदखेड पासून दौलताबाद ते पुण्यापर्यंतचा प्रवास जिजाऊना खूप काही सांगत होता . रयतेची दु:ख संकट , अन्याय , अत्याचार , कोंडमारा त्याना दिसत होता आणि हे सर्व थांबवावे म्हणून त्यांनी पाउलं उचलण्यास सुरवात केली . शहाजीराजे जिजाउना राजकारणातील गुंतागुंत समजाऊन सांगत असत आणि त्याही त्यामध्ये समरस होत असत . अशा जिजाऊनी स्वराज्यामध्ये शहाजीराजांना मोठं पाठबळ दिलं . रयतेला एकत्र आणून त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलं .
संकटे येतील हजारो ! तू मात दे मराठ्या
दीप उजळव उत्कर्षाचे ! तू वात दे मराठ्या
एकमेका सहाय्य करू साथ दे मराठ्या
काळाची गरज आहे हात दे मराठ्या
या उक्तीप्रमाणे सर्वाना एकत्र आणण्याचे संघटन कौशल्य जिजाऊमध्ये होते आणि त्या संघटन कौशल्याच्या आधारे रयतेला एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले . अशातच त्यांच्या पोटी एक नवा जीव अंकुरला आणि या जीवाची आणखी एक जबाबदारी त्यांच्यावर पडली . त्याकाळी गर्भसंस्कार घेण्याची सोय नव्हती . पण स्वतः माता म्हणून त्यांनी स्वतचे विचार, भावना , आणि वर्तनातून त्यांनी गर्भसंस्कार केले . त्या गरोदरपानात तुळजाभवानिशी हितगुज करायच्या , मागण्या मागायच्या , असा पुत्र पोटी दे ज्याचा या मातीला अभिमान वाटेल , कुळाला अभिमान वाटेल , लोकांना अभिमान वाटेल , देशाला धर्माला अभिमान वाटेल .
पुत्र असा दे जो अन्यायाविरुद्ध खड्ग होईल . गुलामीच्या शरण शृंखला तडातड तोडेल . जो न्याय नीती स्थापन करेल आणि जो स्वधर्माचा ध्वज त्रिलोकी उंचावेल. माझा पुत्र असाच असू दे . असे गर्भसंस्कार झाले तर पुत्र सुद्धा तसाच आदर्शवत होईल , यात तिळमात्र शंका नाही आणि अशा आदर्शवत राजमातेच्या पोटी तितकाच आदर्शवत पुत्र जन्माला आला .
वाघिणीच्या पोटी पराक्रमी छावा जन्मला
गुलामीच्या शृंखला तोडूनी मुक्त केले मानवाला
१ ९ फेब्रुवारी १ ६ ३ ० रोजी फाल्गुन वध्य तृतीयेस सायंकाळी एका कर्तुत्ववान आपत्यास जीजाउनी जन्म दिला . हा पुत्र म्हणजे शिवाजी . शिव म्हणजे महादेव शंकर . महादेव शिव हे कुणबी मराठा समाजाचे श्रद्धा स्थान म्हणून जिजाउच्या सहाव्या अपत्याचे नाव ठेवले शिवबा , शिवराय , शिवाजी .
पुत्र जन्मला शिवनेरीला ! न्याय देण्या भूमिपुत्राला
वारस बळीच्या राज्याला ! झाला शिवबा
शिवबांना असामान्य व्यक्तिमत्वाचे बनविण्याचे त्यांनी ठरविले . जिजाऊंची खात्री होती की शहाजी राजांचे शौर्य ,ध्येर्य ,पराक्रम , यांचा वसा शिवबा घेतील. बाळ राजांना आम्ही वेगळ्या कुशीत घडवू . ती कूस आमच्या विचारांची , संस्काराची , शिकवणुकीची , असेल . बाळराज्याच्या प्रत्येक कृतीवर , विचारावर आमच्या कृतीचा ठसा असेल . जीजाउंच्या विचारांची उंची , व्यापकता , दूरदृष्टी , तडफ , जिद्द , चिकाटी , अन्यायाविरोधातील चीड स्वाभिमानी वृत्ती , स्वतंत्र बाणा आणि स्वातंत्र्याची आस यामुळे शिवरायांवर तेच संस्कार करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यांनी होम स्कूलिंग पद्धत राबवली . घरामध्येच त्यांनी त्याना शिक्षणाचे धडे दिले . पुण्याच्या लाल महालातून त्यांच्या न्याय कारभारास सुरवात झाली . याच पुण्याच्या कसबा वस्तीतून गाढवाचा नांगर फिरवला होता . अशा जमिनीवर शेती केली तर निर्वंश होईल हि भीती होती . याच जमिनीवरून जिजाऊनि सोन्याचा नांगर फिरविला आणि अंधश्रदधा मोडून काढली . अशा आदर्शवत राजमातेचा आजच्या माता बोध घेतील काय ?
परिस्थितीवर अवलंबून राहून परिस्थिती झुकवेल तसं झुलणं मी नाकारेण , म्हणणाऱ्या शिवबांना आरोग्यसंपन्न , बहुश्रुत , चतुर , शिस्तप्रिय , कुशल संघटक , प्रभावी व्यवस्थापक , सामताप्रेमी , स्वातंत्र्य व न्यायबुद्धी असलेला एक सर्वगुणसंपन्न महानायक बनविला . जिजाऊ विवेकी माता होत्या . त्यांची कार्यशैली जवळून बघणारे शिवबा त्या तालमीत घडत गेले . त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यागी वृत्ती , प्रामाणीकपणा , निस्वार्थीपणा , साहस , शौर्य , इ. मानुसपनाचे गुण विकसित झाले .
खेडेबारया नजीकच्या रांझे गावातील एक घटना . या गावातील बाबाजी भिकाजी गुजर पाटलांन गावातील शेतकऱ्याच्या बायकोची आब्रूं लुटली . यामुळे तिने आत्महत्या केली . यामुळे जिजाऊ संतापल्या म्हणाल्या ; ‘ रांझ्याच्या पाटलाच्या मुसक्या बांधून इथ आणा आणि चौकशी करा ‘ त्याला आणलं , चौकशी झाली . गुन्हा शिद्ध झाला . शिवरायांनी शिक्षा फर्मावली .
” पाटलाचे हातपाय कलम करा . याचं वतन अमानत करा ” शिक्षेची आमलबजावणी ताबडतोब झाली . जिजाऊच्या संस्काराची खरया अर्थाने अमलबजावणी झाली . हि घटना आजच्या पिढीला विचार करावयास लावणारी आहे . जोपर्यंत शिवरायांसारखे व्यक्तिमत्व घडवणाऱ्या जिजाउसारख्या मातांची संख्या वाढत नाही , तोपर्यंत स्त्रियांवरील अत्याचारांची संख्या कशी कमी होईल ? शिवछत्रपतींना जिजाऊनी जशी युद्धनीती शिकविली तसाच श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरकही शिकविला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होऊ दिली नाही .
लढाया केल्या अंधारया राती ! पाहिली नाही पंचांग पोथी !
अशी होती शिवनिती ! जिजाऊ पुत्राची !
अशा पद्धतीने कार्य करण्याची प्रेरणा जिजाऊ साहेबांनी राजांना दिली आणि त्यांच्या विचाराच्या जोरावरच शिवबा आयुष्यभर लढले . अशा राजमातेने १ ७ जून १ ६ ७ ४ रोजी रात्री आपले डोळे मिटले . स्वामी स्वराज्याचा आईविना पोरका झाला.शिवरायांना प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात जीजामातेचे मार्गदर्शन असे. खरे म्हणजे जिजामाता या स्वराज्यातील संसद आणी सुप्रीम कोर्ट होत्या. शिवरायांचा निर्णय बदलण्याची शक्ती फक्त जिजाऊ नावाच्या मातृशक्तीचिच होती जिजाऊ जास्त जगल्या असत्या तर शिवरायांचे निधन एवढ्या लवकर झाले नसते . एखादा कुशल प्रशिक्षक आणि वस्ताद जसा आपल्या विजयी शिष्याची पाठ थोपटतो तशीच पाठ थोपटून शिवराय व त्यांच्या सहकाऱ्यांना उत्तेजन देण्याचे कार्य जिजाऊनी केले . केवळ माता नव्हे , राजमाता म्हणून त्यांचा आदर्श जगातील मातांनी ठेवावा असाच आहे .
जिजामाता स्वराज्याची स्फूर्ती होत्या , महाशक्ती होत्या , मातृशक्ती होत्या ,आदर्श राजमाता होत्या , प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजलेल्यांची पालनकर्त्या राजमाता होत्या .
जगदंब !! जगदंब !!
— उमेश महादेव तोडकर
Leave a Reply