पल्लवी ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी. तिला अतिशय लाडात वाढवल्यामुळे ती कमालीची हट्टी झाली होती. काॅलेजला असतानाच तिचे दिनेशवर प्रेम जडले. दिनेश नोकरीला लागल्यावर त्याच्या बाबांनी दोघांचे शुभमंगल लावून दिले.
दिनेशची आई लहानपणीच गेली होती. त्याच्या बाबांनी त्याला वाढवताना आईची उणीव कधीही भासू दिली नाही. बाबा आता नोकरीतून निवृत्त होऊन आपला वेळ वाचन, लेखन, ज्येष्ठ नागरिक मंडळात आनंदात घालवत होते.
नव्याची नवलाई संपून पल्लवी व दिनेशच्या लग्नाला सात वर्षे कधी होऊन गेली हे समजलेच नाही. त्या दोघांच्या संसारात छोट्या यशच्या जन्मापासून परिपूर्णता आली. यश आता पहिल्या इयत्तेत शिकत होता.
पल्लवीला तिच्या स्वच्छंदी स्वभावामुळे गेल्या दोन वर्षांपासून दिनेशच्या बाबांची घरात अडचण वाटू लागली होती. तिने दिनेशला ‘बाबांना वृद्धाश्रमात पाठवूयात का?’ अशी विचारणा केली. त्यावर दिनेश तिच्यावर संतापला. कारण बाबांनी त्याच्यासाठी घेतलेले कष्ट तो विसरलेला नव्हता.
बाबांना कळून चुकले होते की, आपल्या विषयावरुन दोघांमध्ये कुरबुर चालू आहे. ते शांत राहिले. खरं पाहता पल्लवीला बाबांची मदतच होत होती. ते रोज सकाळी यशला टू व्हिलरवरुन शाळेत सोडायचे व दुपारी घेऊन यायचे. त्या दोघांच्या संसारात त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही की आपली मतं लादली नाहीत. तरीदेखील तिला स्वातंत्र्य हवे होते.
मोबाईल, मैत्रिणी व शाॅपिंग हे तिचे विकपाॅईंट होते.
दिनेशने शेवटी तिच्या हट्टापुढे हार मानली. शहरातीलच ‘विरंगुळा’ नावाच्या वृद्धाश्रमात बाबांची रवानगी झाली. आता पल्लवीला आकाश ठेंगणे झाले. ती मनात येईल, ते करु शकत होती. तिचा दिवस मनसोक्त हुंदडण्यात जायचा.
सकाळी यशला शाळेत दिनेश पोहोचवायचा, दुपारी पल्लवी त्याला गाडीवरुन घरी घेऊन यायची.
आज सकाळपासूनच ढग भरुन आले होते. दिनेशने यशला शाळेत घेऊन जातानाच पल्लवीला विनंती केली होती की, आज मुसळधार पावसाची शक्यता वाटते आहे, त्याला घरीच राहू दे. मात्र पल्लवीने त्याचे काहीएक ऐकले नाही.
दहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला, तो थांबायचं नावच घेईना. रस्त्यावर पाण्याचे लोट वाहू लागले. पल्लवीने तिची फेवरेट कडक काॅफी तयार केली व खिडकीशी बसून व्हाॅटसअपवर चॅटींग करीत काॅफीचा एकेक घोट घेऊ लागली. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. तिने वैतागून फोन कानाला लावला. पलीकडून शाळेतील कर्मचारी बोलत होता, ‘मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने शाळा लवकर सोडली आहे, पालकांनी येऊन आपल्या पाल्याला घेऊन जावे.’
पल्लवीच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. तिच्या डोळ्यांसमोर आईची वाट पहात बसलेला यश दिसू लागला. तिने खिडकीतून रस्त्यावर नजर टाकली तर पाण्याचे लोंढे वाहत होते. तिने घाईने आवरले व पळतच पार्कींगमध्ये पोहोचली. तिथले दृष्य पाहून तिचे धाबे दणाणले. पार्कींगमधल्या सर्व गाड्या पाण्यात निम्या बुडालेल्या होत्या. तिला काय करावे सुचेना. ती तशीच गुडघ्याएवढ्या पाण्यातून सोसायटीच्या गेटकडे निघाली. जाता जाता तिने दिनेशला फोन लावला. दिनेशला तिने फोनवरुन परिस्थितीची कल्पना दिली. मात्र दिनेशही पावसामुळे शाळेपर्यंत जाऊ शकत नव्हता. तो पल्लवीला म्हणाला, ‘आत्ता बाबा घरात असते, तर ही वेळ तुझ्यावर आलीच नसती.’ तिला त्याचे हे बोलणे ऐकून चपराक बसल्यासारखे झाले. तिने फोन बंद करुन पर्समध्ये ठेवताना तिच्या कानावर ‘आईऽ, मी आलो!’ असा यशचा आवाज आला. समोर तिने पाहिलं तर पावसात चिंब भिजलेले बाबा त्यांच्या लाडक्या कोकराला खांद्यावर बसवून गुडघाभर पाण्यातून घेऊन येत होते. पल्लवी जवळ जाताच यश तिच्याकडे झेपावला. तिने रडवेल्या चेहऱ्याने त्याला घट्ट मिठी मारली. बाबा पल्लवीला सांगू लागले, ‘मला व्हाॅटसअपवर शाळेच्या पेरेंटस ग्रुपवर शाळा लवकर सोडल्याचा मेसेज आला होता. कदाचित तू तो पाहिलाही नसशील. मी लगेच शाळेत पोहोचलो व यशला घेऊन आलो.’ पल्लवीला आपण मेसेज न पाहिल्याची चूक कळून आली होती. तिला काय उत्तर द्यावे ते सुचेना. बाबा बोलत होते, ‘पल्लवी, सांभाळ माझ्या नातवाला. घरात अडगळ वाटणारी काठी तू घराबाहेर काढली असली तरीदेखील वर्षातून एकदा गुढी उभारायला तीच उपयोगी पडते, हे लक्षात ठेव!’ एवढं बोलून बाबा पाठमोरे झाले व पाण्यातून हळुहळू जाऊ लागले. पल्लवीने बाबांना हाक मारली, ‘बाबा, मागे फिरा. चुकले मी, मला माफ करा.’ तिचा भावुक स्वर ऐकून बाबा साश्रू नयनांनी माघारी फिरले व तिच्याकडे येऊ लागले. दोघांच्याही डोळ्यांतील अश्रू आणि कोसळणाऱ्या पावसाचे थेंब दोन्ही एकजीव होऊन गालावरुन ओघळत होते…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१०-९-२०.
Leave a Reply