अधीर मन, अपूर्ण ध्यान
कसे सांगते तत्वज्ञान
ज्याचे त्याचे उत्तर सांगे
तोची करे निरूपण
हाती असे ज्ञानेश्वरी
मुखात शिवी अघोरी
प्रसन्न झाला भगवंत जरी
कृपादृष्टी नाही…..
अर्थ–
अधीर मन, अपूर्ण ध्यान, कसे सांगते तत्वज्ञान, ज्याचे त्याचे उत्तर सांगे, तोची करे निरूपण
(मला किती कळतं, मला किती माहिती याचा गवगवा करणारा आजकाल समाजाला प्रबोधन करू पहातो, तो खरंच त्या केपेबल आहे का? याची खात्री आपण कधीच करत नाही. जो व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेऊ शकत नाही, ज्याला आपणच पूर्ण ज्ञानी आहोत असे वाटते त्याने सांगितलेल्या तत्व आणि ज्ञानाला मी पणाची झालर ही असणारच.)
हाती असे ज्ञानेश्वरी, मुखात शिवी अघोरी, प्रसन्न झाला भगवंत जरी, कृपादृष्टी नाही.
(चार चौघात समोर ग्रंथ ठेऊन पठण करून ज्ञान प्राप्त होत नाही. वाचन प्रचंड असलेल्या माणसाला काय वाचावे हेच कळत नसेल तर त्याच्या ज्ञानाची उपयुक्तता कोण ठरवणार? त्यामुळे वाचनाने माणूस समृद्ध होतो हे जरी खरे असले तरी त्याची वाणी जर अशुद्ध असेल तर त्याने शिकलेली विद्या, ज्ञान, विचार, अध्यात्म सारं काही पाण्यासारखे वाहून जाते. आधी केले मग सांगीतले या समर्थांच्या विचारसरणी वर पाऊल ठेऊन जो वागतो आणि ते टिकवून ठेवतो तो खरा ज्ञानी म्हटलं पाहिजे.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply