एक अतिशय सुंदर व भव्य शिखर असलेले देवीचे मंदीर होते. सुरवातीच्या कांही पायऱ्या व मग मंदीरांत प्रवेश. मी त्या गांवी कांही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळची वेळ, देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सुरवातीला दोन ओटे होते. मी एका बाजूने बसून बुट काढू लागलो. माझी नजर कोपऱ्यांत बसलेल्या एका वृद्ध माणसावर गेली. ते भिंतीला टेकून बसले होते. पांढरे कपडे, धोतर व झब्बा होता. कानटोपी घातलेली होती. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हती. त्यांच्या हातात एक पुस्तक होते. ते वाचत होते. हाती माळ होती. पाण्याच्या कडीचा तांब्या, फुलपात्र, छोटी टोपली त्यांत कांही फळे, दोन-चार पुस्तकें.
मी जाण्याच्या बेतात असता, त्यांचेच लक्ष मजकडे गेले. त्यानी हात करुन मला बोलावले. त्यानी आपली कान टोपी बाजूस सारली. मला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. ते वसंतराव काळे होते. “ओळखलत मला? ”
” हो ओळखल की– – आपण वैद्यकीय संचालक —- —- —- मी क्षणभर थांबलो. आपण कांही चुक तर करीत नाही ना ? ह्याची मनांत कल्पना आली. त्याना बघून १५ वर्षापेक्षा जास्त काळ गेलेला होता. मी संभ्रमांत पडलो. पण लगेच त्यानीच माझी शंका दुर केली. ” होय तुम्ही मला ओळखलंत. जा प्रथम दर्शन करुन या. मग बोलूत. ”
मी ह्या प्रकाराने, त्यांच्या अशा स्थितीत व अशा ठिकाणी त्याना बघणे मनाला चटका देणारे वाटले. मी समोरच्या मंदीरातील गाभाऱ्यांत बघत होतो. श्री देवीची उज्वल प्रतिमा दुरुन दिसत होती. मी मंदीराच्या पायऱ्या चढू लागलो.
डोक्यांत विचारांचे काहूर चालू होते. खूप पूर्वीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आला.
मी सर्व कुटुंबीयासह चार धाम व इतर धार्मिक स्थळ-दर्शनासाठी जाण्याचे योजीले होते. एक महीन्याच्या रजेची गरज होती. वैद्यकीय संचालक साहेब डॉ. वसंतराव काळे हेच होते. मी रजेसाठी विनंती केली. सर्व परिस्थिती व कौटूंबीक निकड व्यक्त केली. ते क्षणभर थांबले. विचार केला. ” आहो देवदर्शनाला जात आहांत. मग कसा रोकू ? मजसाठी देखील प्रसाद घेऊन या. ” किंचीत हसत ते म्हणाले. अतिशय सज्जन गृहस्थ. चांगले प्रशासक होते.
डॉ. काळ्यांना ह्या स्थितीत बघताना मला क्लेशदायक वाटू लागले. मी फार बेचैन झालो. कोणती परिस्थिती उद्भवली असेल? कोणता आघांत जीवनावर झाला असेल की ज्याने त्यांचे उत्तुंग व श्रेष्ठ जीवन एका क्षणांत बदलून टाकले. मी जगदंबेचे दर्शन घेतले. मंदीराबाहेर आलो.
मी डॉ. काळ्यांच्या जवळ जाऊन बसलो. त्यानी आनंद व्यक्त केला. मी आपूलकीने त्यांच्याविषयी चौकशी करु लागलो
“आपण कसे आहांत ? आपण काय करतां हल्ली ? ”
” मी ८० वर्षे पूर्ण केली. काय करावे तुम्हाला वाटते ? ”
“आध्यात्म्याच्या पुस्तकातून कांही शोध बोध घेत आहांत कां? ”
“शोध घ्यावयाचा नसतो. शोध लागतो. ”
“कोणता शोध लागला ?”
” वर्णन करता येणार नाही.”
काळेसाहेब सांगत होते. मी एक चित्त करुन ऐकत होतो.
” मी आजपर्यंत काय केल उमगल नाही. शरीर मनाला वाटत होत. करीत गेलो. चाकोरीत फिरत होतो. सर्व सोडून दिले. न करण्यातच समाधान मिळू लागले. कुठे बसतो, काय करतो, ह्या अस्तित्वाच्या कल्पनेपेक्षा, कुठेच नाही ही जाणीव परम श्रेष्ठ वाटते. आवाजापेक्षा शांततेत समाधान. करण्यापेक्षा न करण्यांत समाधान. ते आपली दिनचर्या सांगू लागले.
” मी मंदीर परिसरांत राहतो, जवळच एक विहीर आहे. ते पाण्याची गरज पूर्ण करते. मला निवृत्ती वेतन मिळते. दोन वेळा खानावळीतून जेवनाचा डबा येतो. त्यांत भाजी पोळी एक ग्लास दुध व एक फळ असते. मंदीर परीसर स्वच्छता आणि येथील बागेची निगा हे व्यायामाचे साधन. मुल, सुना, जावाई, नातवंड व इतर अधून मधून येऊन भेटून जातात. ”
थोड थांबून ते सांगू लागले. ” हे माझे आधुनिक सन्यासी जीवन समजा. जो मार्ग थोर ऋषीमुनी, श्रेष्ठ संत मंडळी, धर्मग्रंथ यांनी सुचविले, त्यावर जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या क्षणापर्यंत माझाच अन्तरात्मा जो ईश्वर आहे, तो इतर कोणता मार्ग दाखवित नाही, तो पर्यंत प्रस्तूत वाट चालणे हे मी योग्य समजतो.
काळ्यांची दैनंदिनी, वयासाठी योग्य उपक्रम वाटला. पूर्वी सन्यास आश्रमांत लोक सर्वसंग परीत्याग करुन मंदीरी, निसर्गांत गंगातीरी, हिमालयी, आपले उर्वरीत आयुष्य व्यतीत करीत. त्यावेळी अंतःपेरणा, संस्कार धर्म संस्कृती यांचा मानसिक दबाव संकल्प होता. मनाला ह्या मार्गाने जाण्याची उपरती होत असे. काळा प्रमाणे काळ्यांच्या दैनदिनीतून जवळ जवळ हेच साध्य केले गेले. फक्त येथे सन्यासाचे अनेक जागी भ्रमण नसून, एक जागी बैठक होती. त्यांची वृत्ती एकदम सन्याशाच्या अवस्थेमधली वाटली. कदाचित् मी त्याला अधूनिक सन्यास आश्रमी म्हणेल. देहाच्या गरजा यांची त्यांनी व्यवस्था केली होती. मनाला मात्र आत्म्याशी केंद्रित करीत होते. स्वतःला विसरुन-जगाला विसरुन.
ह्यात होता ईश्वरी सतसंगाचा विचार, जीवन कार्य व ओढ यातून निवृत्ती, निजी संबंधीता पासून अलीप्तता, कांहीही न करता मिळणारा आनंद शांतता व समाधान काळे उपभोगीत असल्याचे जाणवले. जीवनाच्या परीपूर्ण शेवटाची वाट बघत.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply