नवीन लेखन...

आधुनिक स्त्री

स्त्रीयांना संधी मिळाली की त्या तिचे सोने करतात. स्त्रीशक्तीने आज आपली ताकद दाखविली आहे. आधुनिक स्त्रीचा विचार करताना ती आज लाचार नाही हे सहज दिसते. तिला शिक्षण मिळाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात, विश्वाच्या प्रांगणात तिने पाऊल टाकले. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांनी तर अवकाशाचा वेध घेतला. धाडस, धडाडी, साहस येथे ती कोठेही कमी नाही. आज असे एकही क्षेत्र नाही की, ज्यात तिचा सहभाग नाही, शिरकाव नाही. राजकारण, समाजकारण, न्याय, शिक्षण, अध्यात्म, चित्रपट, नाट्य, साहित्य, संगीत, नृत्य, कीर्तन, क्रीडा, गिर्यारोहण, कृषी, प्रशासन, पत्रकारिता, माध्यमविद्या, अभियांत्रिकी, तंत्रविद्या, वैद्यक, जलतरण आदी असंख्य नि अगणित ठिकाणी ती प्रथम श्रेणीत आहे. परीक्षा निकालात, गुणवत्ता यादीत त्या पहिल्या स्थानी झळकताना दिसतात.

शौर्य दाखवितानाही त्या कोठे कमी पडत नाहीत. लष्करात त्या आनंदाने दाखल होताना दिसतात. हवाई दलात महिला भरती संदर्भात जाहिरात आली, तर वीस जागांसाठी चोवीस हजार महिलांनी अर्ज केले. जबाबदारीची जाणीव सर्वाधिक त्यांना आहे याचाही प्रत्यय आला. विमानापासून ते रेल्वेपर्यंतच्या व पाणबोटीपासून अवकाशयानापर्यंतच्या सर्व प्रकारांच्या अवजड व नाजूक वाहनांचे चालन (ड्रायव्हिंग) त्या कुशलतेने करू शकतात.

अशी ही आधुनिक स्त्री सर्व ठिकाणी आपल्या शक्तीने प्रभावित करीत आहे. जुन्या पिढीतील कष्ट भोगलेल्या स्त्रियांची तिला जाणीव आहे. ते कष्ट सांगतानाच केवळ दुःख न उगाळता आजच्या स्त्रीचे कष्ट व दुःख कसे कमी होईल याबाबत ती सक्रिय आहे. भारतीय स्त्रीचे संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि व्रतवैकल्ये यामध्ये बंदिस्त झाले होते. अशा स्त्रीला जागृत करून तिच्या विकासाचे प्रयत्न अनेक समाजसुधारकांनीकेले. जोपर्यंत कुटुंबात स्त्रीपुरुषात अशी समानता येणार नाही तोपर्यंत समाजातही समता येऊ शकत नाही अशा आशयाची महात्मा ज्योतीराव फुले यांची भूमिका होती. सावित्रीबाई फुले भूतकाळात (इतिहासात) होऊन गेल्या म्हणून आज स्त्रिया वर्तमानकाळात आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तर स्त्री उद्धाराचा हौसेने वसा घेऊन त्यासाठी जीवन अर्पिले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या कार्यांचा एक महत्त्वाचा आयाम म्हणजे स्त्रियांचे प्रश्न धसास लावण्यासाठी त्यांनी संस्थांचा संसार केला. त्यातून कृतज्ञ स्त्रियांची पिढीच्या पिढी पुढे उत्पन्न झाली. अगदी अलीकडच्या काळात इंदिरा गांधी यांनी, भारतीय स्त्रीची प्रतिमा मजबूत स्त्री अशी निर्माण केली. त्यांचा वाटा महत्त्वाचा. इंग्रजी शब्दकोशात इंदिरा या शब्दाचा अर्थ मजबूत स्त्री असा लिहिला आहे. सानिया मिर्झा, पी.टी. उषा, अंजली पाठक इत्यादींनी शंभर कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची अब्रू थोडीफार सांभाळली आहे. आज संगणक क्षेत्रात मुलींनी मुलांना मागे टाकले आहे.

दैनिक सकाळच्या ८ मार्च २००३ च्या पहिल्या पानावर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेले छायाचित्र हे आधुनिक स्त्रीचे विलोभनीय रूप आहे. स्त्री स्कूटर चालवत आहे. पुढे मुलगा उभा आहे. मागे आईला घट्ट धरून दुसरा मुलगा बसला आहे. आधुनिक झांशीच्या राणीला प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठी नोकरीला जावे लागते. जीवनाच्या युद्धात ती प्रपंचाला, मुलाला विसरलेली नाही. तिचा चेहरा प्रसन्न आहे. त्याच्यावर आत्मविश्वासाचे तेज आहे.

स्त्रीत्व हे एक वेगळेच सामर्थ्य आहे. तिने केलेली अभिव्यक्ती इतकी वैशिष्ट्यपूर्ण असेल की, तिला कुठेच तोड नसेल. असेही घडू शकते. घडतेही. स्त्री-पुरुष भेद आधुनिक काळात घालवायचा असेल तर नवजाणिवेची आवश्यकता आहे. शिरीष पै म्हणतात, आजच्या समाजात स्त्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना आपल्या परस्पर संबंधापेक्षा आपल्यावरच्या कामाची जबाबदारी मोठी आहे ही जाणीव उभयतांच्या मनात जागृत राहील तर स्त्री-पुरुष हा भेद कधीच रहाणार नाही. पण असे कधीकधी होत नाही.

स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेच्या बाबतीत आज जगात स्वीडनचा पहिला क्रमांक आहे. भारताचा कल्पनेच्या बाहेर अतिदूर आहे असे सुधा मूर्ती सांगतात. केवळ लग्न करणे, मुलांचा सांभाळ करणे हे एकमेव उद्दिष्ट असू शकत नाही. आधुनिक मुलींना आज खरी गरज आहे शिक्षण, आर्थिक स्वावलंबन व आत्मविश्वास या तीन शस्त्रांची. आज शिक्षित महिलांना हक्कांची जाणीव आहे पण न्यायासाठी झगडण्यास त्या घाबरतात. जाऊ दे म्हणून प्रश्न दृष्टिआड करतात असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य नफिसा हुसेन यांचे निरीक्षण आहे. खरंतर लग्नानंतर स्वतःची नोकरी असणाऱ्या स्त्रियासुद्धा, एकंदर किती कुचंबणा आयुष्यभर सहन करतात हे पाहताना आश्चर्य वाटतं. जबरदस्त जोखड घेऊन आजही त्यांना जगावं लागतं. पत्नीचे पटते पण समाज काय म्हणेल.

तिच्या मताने चालतोय म्हणेल म्हणून तिच्या विरुद्ध वागणारे लोक आहेत. आधुनिक स्त्रीला या अडचणीलाही सामोरे जावे लागत आहे.

स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम स्त्रीपुरुष यांच्या स्थानामुळे संख्यात्मक गुणोत्तरात स्त्रीचे प्रमाण घटत आहे. अशा रीतीने जन्मापूर्वीच अदृश्य होणाऱ्या स्त्रिया हे एक संकट होऊ शकते. असा धोक्याचा इशारा नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांनी दिला आहे. आर्थिक विकासात महिलांचा सहभाग आणि योगदान अतिशय महत्त्वाचे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. सुदैवाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे नेते व समाजधुरीण याबाबत काळजी घेतानाही दिसतात. १९९३च्या कायद्यान्वये लक्षावधी स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता मिळाली. एका अहवालानुसार स्त्रिया सरपंच झाल्यापासून आरोग्य आणि निवारा या क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत.

जागतिक पातळीवर विचार केला तर स्वीडन, नॉर्वे, फिनलंड व डेन्मार्क या देशातील संसदेत अनुक्रमे ४५, ३८, ३७ व ३६ टक्के स्त्रियांना संधी मिळाली आहे. आधुनिक स्त्री घडविण्यात महात्मा गांधी यांच्या विचारांनी फार मोठे काम केले. मातृत्व हेच स्त्री जीवनाचे अंतिम ध्येय नाही हे सांगून, मातृत्वापेक्षाही समाजसेवा श्रेष्ठ हे सांगून स्त्रीला मातृत्वाच्या दडपणातून मुक्त करण्याचा गांधीजींनी प्रयत्न केला. पुरुषाच्या बाहेरच्या कमाईत निम्मा हिस्सा बाईचा आहे. कारण ती घरात राहते म्हणून पुरुष बाहेर कमावतो असे गांधीजी म्हणत.

स्त्रियांच्या प्रश्नांसाठी शंकरराव किर्लोस्कर यांनी स्त्री हे स्वतंत्र मासिक काढले. कर्तृत्ववान स्त्रियांचा समाजाला परिचय आणि कर्तृत्वाच्या नव्या नव्या क्षेत्रांचा स्त्रियांना परिचय हे काम त्यांनी केले. आज स्त्रीविषयक नियतकालिकांनी जबरदस्त आघाडी घेतली आहे. आधुनिक स्त्री घडली ती अशा पुण्यपुरुषांच्या पवित्र कार्यातून. आधुनिक स्त्रीचा विचार करताना कष्टकरी थरातल्या स्त्रियांना विसरून चालणार नाही. विश्रांती, प्रतिष्ठा, संस्कृती निर्मितीसाठी अवकाश या साऱ्यांची तिला गरज आहे. आजही बहुजन स्त्री जितकी शेतात रमलेली दिसते तितकी ती साहित्यात रमलेली दिसत नाही. स्त्रियांचा मान राखणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. कारण स्त्रीनेच प्रथमतः संस्कृतीची निर्मिती केली. परिवार व शेतीची सुरुवात तिने केली. आपले जग हे स्त्रीने तयार केलेले जग आहे, असे डॉ. राम मनोहर लोहिया म्हणत.

आधुनिक स्त्रीचा काही क्षेत्रातील प्रगतीचा आलेख नोंद घेण्यासारखा आहे. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा इतिहास, सहभाग स्पृहणीय आहे. दलित उद्धाराच्या चळवळीत आम्हीही इतिहास घडविला हे त्या अभिमानाने सांगू शकतात. सहकारी चळवळ, बचत गट, अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामगिरीत नेत्रदीपक आहे. इंदापूर तालुक्यात ७२ सहकारी दूधसंस्था महिलांच्या स आहेत. स्त्रियांना दिलेल्या कर्जाच्या द वसुलीचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. अर्थतज्ञांच्या मते पुढील १७ वर्षांत गे महिला सशक्त होतील. आता स्त्री अ सर्वच दृष्टींनी सक्षम आणि स्वावलंबी अ झाली आहे. काळाप्रमाणे स्त्रियांच्या विचारसरणीतही बदल होत आहे. १९वे शतक हे स्त्रीला कुटुंबात स्थान व प्रतिष्ठा मिळविण्यात गेले. मागची पिढी त्यागी समर्पणशील, आजची समन्वयशील आणि पुढची निर्धारात्मक विकासोन्मुख अशी असेल. आधुनिक शिक्षणाने तिच्यात विलक्षण दृष्टी आली आहे. माणुसकी हा धर्म मानणारी भारतीय वंशाची मी विश्व नागरिक (ग्लोबल सिटिझन) आहे. माझे भविष्य मी स्वतः घडविणार आहे. मला कोणी रोखू शकणार नाही असा खर आत्मविश्वास भारतीय कन्या जागवत आहे. फुलदाणीसारखे मर्यादित न राहता वृक्षासारखे बहरण्याची जिद्द तिने बाळगली आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील स्त्री शिक्षण महता जागृती चळवळीमुळे माजघरात बंदिस्त झालेली स्त्री दिवाणखान्यातून अंगणात उतरली आणि यानंतर सर्वच क्षेत्रात कार्यरत झाली. हे आपण आज पहाणे. जगातला सर्वोच्च सन्मान नोबेल पारितोषिक आजतागायत ३४ स्त्रियांनी प्राप्त केला आहे.

स्त्री-पुरुषांच्यातल्या नात्यात काळानुरूप, परिस्थितीनुरूप काही बदल झालाय का? हा महत्त्वाचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. संसारात स्त्रियांनीच तडजोडी कराव्यात अशीच अपेक्षा का केली जाते? असा प्रश्न त्या आता विचारतात.

आधुनिक स्त्रीची ही सर्व रूपे, प्रगती, वाटचाल पाहिली तरी दुसऱ्या बाजूला शिक्षण मिळाले पण त्यांच्यातील अंधश्रद्धा अजूनही दूर गेल्या नाहीत. धार्मिक कर्मकांडापेक्षा आंतरिक भाव सहसा आहे याचा आविष्कार विस्तृत प्रमाणावर दिसत नाही. त्यांच्यातील सोन्याबद्दलचे आकर्षण कायम आहे. गोड गोड व भूलथापा अडकल्याने देणाऱ्यांच्या शब्दांत नुकसान होते हे आजूबाजूला पाहूनही त्या सावध नाहीत. ‘बुवा तेथे बाया’ हा आचार्य अत्रे यांनी सतर्कतेचा इशारा देऊनही त्या सावध नाहीत. वस्तू म्हणून जाहिरातीत मिळणारे स्थान, देहाची अदर्शनीय प्रसिद्धी त्यांना खटकत नाही. उपासतापासाने देह कष्टविणे योग्य नाही हा उपदेश त्यांनी अजूनही आत्मसात केला नाही. एक पाय त्रेतायुगात आणि एक पाय एकविसाव्या शतकात अशी वृत्ती ठेवली तर कशी प्रगती होणार? मस्टर आणि मिस्टर या दोहोंचा तोल सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागते हे मान्य करूनही त्यांनी आपली आंतरिक ताकद आणि विवेकशक्ती यांचा मेळ साधला तर आगामी शतक त्या गाजविल्याशिवाय राहणार नाहीत. अहंकाराचा वारा न लागो मज या चालीवर भ्रष्टाचार, त्यांनी लाचलुचपत या ‘दुर्गुणाचा स्पर्श न होवो मज’ हे पथ्य त्यांनी सांभाळले व एकंदरीत परिस्थितीत, आपला दृष्टिकोन आशावादी आणि विचार सकारात्मक ठेवले, काही बाबतीत थोडी चलाखी आणि युक्ती वापरली तर त्यांचे आयुष्य नक्कीच सुखाचे होईल. स्वचिंतनातून त्या आपल्या यशाचा व समाधानाचा मार्ग शोधतानाही दिसतात. चिंतन आणि विचार हे तर आधुनिक स्त्रीजगताचे महत्त्वाचे लक्षण आहे. पदवीधर, सुशिक्षित झालेल्या परंतु आजही संकुचित घरट्यात जगणाऱ्या तमाम स्त्रियांची परिवर्तनवादी भूमिका खचितच अभिवादनयोग्य आहे.

– सतीश कुलकर्णी

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..