काही व्यक्तींची नावे घेतात त्यांचे काव्य. गाणी. तर काही काव्य गाणी वाचले की कवींचे नाव ओठांवर येते. मात्र ओव्या. मुहुर्ताची गाणी. डोहाळे. बारसे. शेतातील गाणी पोवाडा. लावण्या अंगाईगीत आणि बरेच काही आपल्याला माहीत असतात. पण ते कुणी लिहिले आहेत हे माहीत नसते. ती आवडतात. आणि चालत येतात.
तर काहींना काहीही अर्थ लागलेला समजत नाही तरीही ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. दहा पंधरा मुले लंपडाव खेळण्यासाठी जमतात. आणि राज्य कुणावर. राज्य हा शब्द का वापरला जातो माहित नाही. त्यामुळे एक गोलाकार तयार करून एक ठराविक उदा.
अरिंग मिरींग लवंगा चिरींग.
चिरता चिरता डूबडूब बाजा.
गया गोपिका उतरला राजा…
अगुलाल बगुलाल संभाजी कोतवाल.
गिरगिर पगडी माधव रगडी.
चाबकाचा खणका.
मोगलाई दणका.
चुकली मुकली करंजी फुटली..
पहिल्यात उतरला राजा व दुसऱ्यात करंजी फुटली म्हणून ते म्हणणे थांबते तेव्हा त्याच्या कडे किंवा त्याला बोटाने खांद्यावर स्पर्श केला की तो बाजूला होतो. आणि शेवटी जो उरतो त्याच्या वर राज्य आलेले असते म्हणून बाकीचे लपतात व हा शोधायला जातो. आता हे दोन आपण पिढ्यानपिढ्या म्हणत आलेलो आहोत. अर्थ माहित नाही आणि कोणी लिहिले आहे हे सुद्धा माहित नाही…. अशी किती तरी गाणी. काव्य. बडबड गीत. वगैरे फार मोठा खजिना आहे कवितांचा. कवी. रचियता कोण आहेत हे मात्र अज्ञात आहे. म्हणून त्यांचे मोल कमी होत नाही. त्याचे जतन केले आहे…
काही कविता अजरामर आहेत म्हणून कवी सुद्धा. तर काही जण शीघ्र कवी असतात. थोडक्यात काय तर मनातील त्या वेळी आलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव केलेली असते. ती माणसाला हसवते. रडवते. प्रेरणा देते. उस्फूर्त करते. त्वेष निर्माण करते अजून बरेच काही. आणि म्हणूनच आजच्या दिवशी त्या ज्ञात. अज्ञात. नावाजलेले. अनामिक सर्व कवी वृंदाना आदरयुक्त नमस्कार.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply