नवीन लेखन...

‘अदरक के पंजे’ या एकपात्री प्रयोगाची सुरुवात

२२ सप्टेंबर १९६५ ला रंगमंचावर आलेल्या ह्या एकपात्री कार्यक्रमाची सांगता ११ फेब्रुवारी २०११ ला झाली . त्या दिवशी पडलेला पडदा प्रचंड लोकप्रियता आणि रसिकांची मागणी असूनही, पुन्हा वर उचलला गेला नाही . त्याचा कर्ता करविता बब्बन खान आपल्या निर्णयावर ठाम राहिले .

अद्रक के पंजे आणि बब्बन खान ह्यांची स्टोरी पुरी फिल्मी वाटावी अशी आहे . बब्बन खान तेव्हां ऐन विशीत होते . हातात पदवी होती पण नोकरी नव्हती . घरात चारी विश्व दारिद्र्य होतं . हातातोंडाची गाठ पडणं मुश्कील होतं . बब्बन खान चे ३ भाऊ आणि ४ बहिणी कुपोषणामुळे निरनिराळ्या वयाला मरण पावले होते . हे धाकटे मुल जगले होते . गरिबीत कसेबसे वाढत होते . नोकरी साठी , काही आमदनी व्हावी , कुटुंबाला चार घास मिळावेत म्हणून रस्तोरस्ती फिरत होते .

एक दिवस त्यांच्या मनात कल्पना आली . हैदराबादच्या त्यांच्या चंद्रमौळी घरासमोरच्या टुकार गल्लीतल्या मंद प्रकाशाच्या ,रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून त्यांनी आपलीच जीवन गाथा लिहायला सुरवात केली. उपहास, उपरोध ह्यांनी ते लेखन ओतप्रोत भरलेलं होतं. विनोदाला कारुण्याची झालर होती. ते जे काही भोगत होते त्याहून काहीतरी वेगळंच कागदावर उतरत होतं. ह्याला कारण म्हणजे आयुष्याकडे बघायची त्यांची सकारात्मक वृत्ती. हाती दमडी नव्हती. आईचं मंगळसूत्र त्या काळात २७५ रुपयाला विकून त्यांनी २२ सप्टेंबर १९६५ मध्ये अद्रक के पंजे रंगमंचावर आणलं. पैशाची तर वानवाच होती. डोळे दिपवणारा सेट नाही , पार्श्वसंगीत नाही ,दिव्यांची ..प्रकाशाची उधळण नाही ; असा हा एकपात्री कार्यक्रम सुरु झाला. मंचावर फक्त जुनाट, पत्र्याची दुमडता येणारी खुर्ची, काही पत्र्याचे डबे , एक मोडकी , बाबा आदमच्या काळातली बाज, खाटलं ! एवढंच ! पहिले एक दोन प्रयोग साफ पडले. खर्च सुद्धा भरून आला नाही . पण नंतर मात्र हा कार्यक्रम धोधो चालायला लागला.

१९८४ मध्ये सर्वात जास्त प्रयोग झालेला एकपात्री कार्यक्रम म्हणून त्याची Guinness Book of World Records नोंद झाली. उर्दू आणि जुन्या हैद्राबादी भाषेत असणाऱ्या ह्या एकपात्री कार्यक्रमाचं , जगभरातील २७ निरनिराळ्या भाषांमध्ये अनुवाद झाले. ३५ वर्षांत ३ करोड लोकांनी तो पाहिला. ६० देशांत त्याचे प्रयोग झाले. परदेशातील त्यांच्या प्रयोगांना भारतीय लोकांबरोबरच ही भाषा अवगत नसणारे स्थानिक पण हजर असायचे. केवळ हे काय अजब गारुड आहे , हे बघण्याच्या उद्देशाने ! Washington Auditorium मध्ये मायकेल ज्याकसन, फ्र्यांक सिनात्रा यांच्या बरोबरच बब्बन खान यांची पण स्वाक्षरी जतन करून ठेवलेली आहे. १२८ आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रातून ही अजब कहाणी लिहिली गेली आहे. परदेशात तर Babban Khan In Your Town एवढीच पाटी गर्दी खेचायला पुरेशी असायची.

बब्बन खान नी आपल्या कार्यक्रमाचे हक्क टीवी , सिनेमा कुणालाच विकले नाहीत. सर्व हक्क त्यांच्या स्वाधीन आहेत . त्या काळात कुटुंब नियोजनाचा संदेश देणारा, ” छोटा परिवार सुखी परिवार ‘ हे हास्यस्फोटक पद्धतीने सांगत असणारा हा कार्यक्रम सरकारी कृपा दृष्टी पासून वंचित राहिला.

मी देखील हा कार्यक्रम बऱ्याच उशिरा , ठाण्यात झाला तेव्हां , साधारण ऐशीच्या उत्तर दशकात पाहिला . ह्या कार्यक्रमाने बब्बन खान ह्यांना प्रचंड लोकप्रियता, कीर्ती, यश, पैसा, नाव लौकिक दिला ; पण त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले . जिथे त्यांचं मोडकळीला आलेलं दरिद्री घर होतं तिथे आज त्यांचा ८ शयनकक्ष असणारा आलिशान बंगला आहे . हैद्राबाद मधे ते Babban Khan Acting Academy चालवतात. आनंदाने आयुष्य घालवताहेत.

यू ट्यूबवर जमशीद खान यांचा मूळ संहितेवर आधारित ‘ अद्रक को पंजे ‘ हा कार्यक्रम उपलब्ध आहे. पण आता विनोदाने आणि एकंदरीत जगानेच , माणसांच्या आवडीनिवडीने च इतकं अजब रूप धारण केलं आहे की हा कार्यक्रम मनापर्यंत पोचत नाही. पण ज्यांना हा कार्यक्रम माहिती नसेल त्यांनी बब्बन खान आणि अद्रक के पंजे ही काय चीज होती ह्याची झलक म्हणून ही क्लिप बघायला हरकत नाही. पण ती मजा येत नाहीये . काहीकाही कलाकृतींना काल मर्यादा असते तर काही कालातीत असतात .

–सुरेखा मोंडकर.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..