नवीन लेखन...

अडथळ्यांची शर्यत

‘अग बाई, जरा स्वस्थ बस ना सामान किती वेळा भरू मी? थकले बाई ” शब्द तेच, जागा तीच, तस्साच सगळा गोंधळ ! फक्त बोलणारी व्यक्ति माझ्याऐवजी माझी सून अनघा होती.ती व तिची लेक शाल्वली,नीलच्या बारश्यानंतर दुबईला परतत होत्या.ती सामान पेटाऱ्यात बसवण्याच्या व शाल्वली ते तिच्या भाषेत ‘नीट’ ठेवण्याच्या खटाटोपात गर्क होत्या. माझे हात जरी यंत्रासारखे काम करीत होते तरी मन मात्र एका क्षणात २३ वर्षे मागे, १९८७ सालात गेले. अगदी नुकतेच घडल्यासारखे सगळे आठवायला लागले, अगदी संभाषणासह.!

‘अरे बाबांनो, थांबा रे जरा.कितीवेळा सामान उचकाल? कालपासून ४ वेळातरी मी आवरलय!’हा आवाज अर्थातच माझा होता. खरोखरच २ दिवसात सामानाची आवराआवर करून मी अगदी थकून गेले होते.

‘अग आई, आमचे मित्र वेगवेगळ्या वेळेला येतात तयारी बघायला.त्याला आम्ही तरी काय करणार? तुम्ही आयाच आम्हाला एकदम मोकळे सोडत नाही ना!’ असे माझ्या धाकट्याने गौरीकुमारने अत्यंत तत्परतेने सांगितले व माझीच चूक असल्याच्या अविर्भावात तो नवीन मित्रांना बोलाव ण्यासाठी बाहेर गेला. त्याच्या मानाने यशोधन मोठा व समजूतदार होता. त्यामुळे त्याने सगळे मित्र एकदमच उरकले होते.

आदल्या दिवशीच परीक्षा संपल्याने आता मुले पूर्णवेळ रिकामीच होती. आम्हाला ह्यांच्याकडे फ्रान्सला-तुलूसला जायचे होते. त्यासाठी महिनाभरासाठी घराच्या व घरातल्या यंत्रांच्या सुरक्षेची व्यवस्थाही करायची, खराब होणाऱ्या गोष्टींची काळजी घ्यायची, एअर इंडियाच्या विमानात कधीची जागा मिळेल याची चौकशी करायची एक ना दोन……कितीतरी गोष्टींचं टेन्शन डोक्यावर. या सगळ्यांपुढे पॅरिसच्या पुढे विमान बदलायचे, विमानतळ बदलायचा याचा विचारही केला नव्हता.मुलांचा तर हा पहिलाच परदेश प्रवास. त्यांची उत्सुकता मला समजत होती. पण त्यांच्या मित्रमंडळींचेही कुतूहल त्यांच्याइतकेच किंबहुना काकणभर जास्तच शिगेला पोहोचलेले. त्यांनाही ह्या दोघांच्या तयारीला हातभार लावावासा वाटे. त्यामुळे गोंधळात भरच. नशीब तिकीटांचे की ती सहीसलामत राहिली.

शेवटी सगळे अडथळे पार करून रात्री जाण्याचे नक्की झाले. त्यावेळी भांडूपमध्ये आमच्या घरी फोन नव्हता. त्यामुळे ह्यांच्याकडून आलेल्या एकमेव अस्पष्ट ऐकू आलेल्या फोनवर व त्यांनी दिलेल्या फ्रान्सच्या विमानतळाच्या माहितीवर काम चालवायचे होते. त्यातच माझे मधले ३ दिवस घरच्या अडचणींमध्ये वाया गेले होते. महिनाभर रहायचे होते, जरी तिकडे उन्हाळा होता, तरी आमच्यासाठी ती थंडीच! त्यामुळे गरम कपडे, खाण्याचे भरपूर पदार्थ…. बापरे…यादी संपतच नव्हती. आठवून आठवून सामान गोळा होत होते. कसेबसे सगळे कोंबले गेले. त्यावेळी आमच्या भांडूपहून विमानतळावर पोहोचणे सोपे नव्हते. टॅक्सी वा रिक्षा रेल्वेरूळ ओलांडून पूर्वेला यायला राजी नसायच्या, त्यामुळे पश्चिम भांडूपला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यातच भर म्हणून की काय आमच्या घराच्या कोपऱ्यावर प्रचारसभा चालू होती. त्यामुळे २ भल्यामोठ्या बॅगा, तीन हॅन्ड बॅगा, पर्स व आपापल्या मित्रांना भेटायला गर्दीत धावणारी २ मुले या सगळ्यासह गर्दीचा समुद्र पार करणे भाग होते. सगळे गोंधळ गडबड पार पाडून आमची वरात एकदाची विमानात पोहोचली आणि मी हुश्श्य !!!!! ..करून पुढचा विचार करायला सुरूवात केली.

आमची विमानाची तिकीटे पहिल्या वर्गाची होती. मस्त आरामदायी खुर्च्या, एअर इंडियाच्या महाराजाची शान आणि मुख्य म्हणजे पहिल्या वर्गात आम्ही तीनच प्रवासी मुले तर थोड्या वेळातच स्वप्ननगरीत पोहोचली. त्यामुळे पुढच्या प्रवासाच्या काळजीने जागी असलेली मी ३-४ परिचारिकांच्या तावडीत आयतीच सापडले. काय हवे नको विचारून विचारून व सतरावेळा गोष्टी सर्व्ह ‘करून करून अगदी भंडावून सोडले. दमून त्या शांत झाल्या असे वाटते तोच मुले जागी झाली व त्या उत्साहाने ३- खरे तर एक फुल दोन हाफ-प्रवाशांच्या हात धुवून मागे लागल्या. मुलेही भरपूर लाड करून घेत होती. अगदी व्ही.आय.पी लीला चालू होत्या त्यांच्या. त्यांना आवर घालताना पॅरिसचा चार्ल्स द ग़ॉल विमानतळ कधी आला कळलेच नाही. एव्हाना धाकटा गौरीकुमार अगदी दमून गेला होता. त्याचे एकूण एक अवयव दुखायला लागले होते. थंडी वाजायला लागली होती. हे सगळे पाहून परिचारिकांची मात्र मस्त करमणूक होत होती.

विमान अंमळ (!) उशीराने पोहोचले. त्यामुळे पुढचे विमान गाठण्यासाठी अगदी कमी वेळ हाती होता. विमानतळावरील पाट्यांच्या अनुरोधाने आम्ही चालत होतो.संध्याकाळचे ७.३० वाजून गेले होते. पुढे आम्हाला विमानतळ व विमान बदलून तुलूसला जायचे होते . मुले एकूणच चकचकाट,पॉशपणा पाहून अगदी शहाण्यासारखी वागत होती. मी पुढच्या प्रवासाचे विमान कुठे असेल, त्यासाठी कुठे जावे लागेल याच्या काळजीत एवढी बुडाले की या विमानतळाच्या बाहेर जाऊन दुसरी बस पकडायची व दुसऱ्या विमानतळावर जायचे कळल्याबरोबर सामान न घेताच धावत सुटले. तिथे गेल्यावर कळाले की सामान पूर्वीच्या विमानतळावर ताब्यात घेऊन क्लीअर करावे लागते. झाले! आमची वरात जिथून निघाली तिथे परत. सामान बेवारश्यासारखे आमची वाट पहात होते.माझी केविलवाणी सैरभैर अवस्था पाहून कस्टमवाल्यांनी ‘जा मुली तू दुसऱ्या विमानाने आपल्या नवऱ्याकडे जा’ म्हणून पाठवणी केली. परत आम्ही बसमधून दुसरीकडे. तिथल्या अधिकाऱ्यांना मात्र माझे ‘तिकडे ‘जाणे फारसे पसंत नसावे. कारण तुलूसला जाणारे संध्याकाळचे पहिले विमान सामानाच्या गडबडीत चुकले होते. दुसरे कॅन्सल झाले व शेवटचे जागा भरल्यामुळे हुकले. आली का पंचाईत! आता एकदम सकाळीच फ्लाईट ! हा विमानतळ तसा छोटा म्हणण्यापेक्षा काऊंटर्स फ्लाईटपुरतीच उघडणारा म्हणाना! त्यामुळे जसे विमान सुटले तसे माणसेही गायब झाली. एक काऊंटर बंद झाले की आम्ही दुसऱ्या ठिकाणी! ते बंद झाले की पुढे! असे किती वेळ चालणार ! शेवटी असे झाले की मी व मुले सोडून कोणीच दिसेना. तेव्हा मग मघाचा चार्ल्स द गॉल विमानतळ बरा वाटू लागला निदान त्या ठिकाणी कोणीतरी दिसले असते. नशीबाने शेवटची बस मिळाली.

पॅरिसचा चार्ल्स दी गॉल विमानतळ मध्ये जागा सोडून विमानात स्वार होण्यासाठी सरकते जिने, चेक इन काऊंटर्स, गेट वगैरें भोवती गोलाकार बांधला आहे. विमानतळ भव्य, स्वच्छ आणि सुंदर आहे यात शंकाच नाही पण त्याच्या गोलाकारामुळे आपल्या मुंबई विमानतळावर जी गजबज २४ तास दिसते तशी इथे जाणवत नाही. जसजशा पलाईट सुटतात तसतशी त्या त्या काऊंटरची व आसपासची प्रवाशांची उपस्थिती कमी होते. निदान माझ्यासारख्या नवख्या, एकट्या व घाबरलेल्या बाईला तरी तो सोबतीच्या दृष्टीने योग्य वाटला नाही हे खरे! थोडावेळ या काऊंटर पासून त्या काऊंटरकडे असे आम्ही केले पण अशी रात्र कशी काढणार?

‘आई, आपण असे कितीवेळ थांबायचे? आपले इथे कोणीच नाही का गं?” यशोधनच्या प्रश्नाने मी खाडकन शुध् दीवर आले आणि ह्यांनी मला एअर इंडियाच्या श्री.माथूर यांचा नंबर ‘गरज पडली तर असू दे’ म्हणून दिला होता त्याची आठवण झाली. विमान सोडण्याची जबाबदारी माथूर यांच्यावर होती त्यामुळे बराच वेळ ते मला भेटू शकले नाहीत व माझ्याकडे मोबाईल नसल्याने मी निरोपही पाठवू शकले नाही. पुन्हा पुन्हा फोन करण्यापलिकडे माझ्या हाती काहीच नव्हते. नशीब की विमानतळावरचे फोन फ्री होते. मुलांनाही एव्हाना आईचा गोंधळ कळला असावा. यशोधन मोठेपणाने आपण न घाबरल्यासारखे दाखवून मला फोन करायला मोकळीक देत होता, गौरीकुमारच्या बाबतीत बोलायची सोयच नव्हती. थोड्या वेळातच दोघेही बिचारे झोपायला आले पण मला मात्र काय करावे ते कळत नव्हते. हेही तुलूस विमानतळावर आमची वाट पहात असल्याने फोनवर भेटत नव्हते. माझा गोंधळ माझ्या चेहऱ्यावर इतका स्पष्ट दिसत असावा की काऊंटर बंद झाल्यावर तिथल्या मुलीने आपण होऊन हॉटेल रिझर्वेशन समोरच्या काऊंटर वरून कर व तिथे जा’ असे सांगितले. मी आजूबाजूला नजर टाकली तर खरच कोणी नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून केलेला फोन लागला व माथूर बिचारे घरी जाता जाता माझ्या ‘फोनी’ लागले.एकंदर स्थिती कळल्यावर त्यांनी त्यांचा रथ परत फिरवला. मला विमानतळाजवळच्याच हॉटेल मध्ये खोली बुक करून ठेवायला सांगून ‘आता कुठे दुसरीकडे जाऊ नका. मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईन’ असे आश्वासनही दिले. आता मला प्रश्न की त्यांनी मला ओळखलं तरी मी कुणावर विश्वास ठेवू? ‘ कारण एवढ्या वेळात आसपास ‘बरेच जण’ घोटाळून गेले होते. शेवटी देवावर भरवसा ठेवायचे ठरवले. यावेळी माझ्या लहान मुलांचीही मला खूप सोबत वाटू लागली. विमानतळाला सगळ्यात जवळ ‘आर्केड’ नावाचे हॉटेल होते. महाग होते पण दुसऱ्या दिवशी पहिली ७.३० ची फ्लाईट पकडण्यासाठी सोईचे होते. थोडावेळ वाट पाहिल्यावर माथूर आले, त्यांनी आम्हाला हॉटेलवर सोडले.सगळे सुरळीत झाले. पण त्यांना त्या मध्यरात्री आमच्यामुळे किती त्रास पडला ते नंतर मी जेव्हा पॅरिसमध्ये हिंडले तेंव्हा कळाले.देवदूतासारख्या धावून आलेल्या माथूरांचे आभार मानण्याचे भान मला राखता आले नाही याची खंत अद्यापही वाटते. ऑर्केड कसे होते, त्याचे डेकोरेशन कसे होते, खोली कशी होती काही म्हणता काही आठवत नाही. आठवतो तो ३०० फ्रॅकचा पर्सला पडलेला खड्डा. रात्रभर मी वेड्यासारखी खिडकीत बसून येणारी जाणारी विमाने पहात होते व कॉरिडॉर मधून येणारे पावलांचे व क्वचितच येणारे माणसांचे आवाज ऐकून दचकत होते. हॉटेल मध्ये असे रहाण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग – अन तेही ह्यांच्याशिवाय ! आता मी ह्यांच्याबरोबर खूप ठिकाणी उतरते पण ‘ती’ रात्र मला प्रत्येक ठिकाणी आठवते.पहाटे माझी अंघोळ होईपर्यंत मुले रात्रीची झोप झाल्याने तरतरीतपणे उठली व परत आमची यात्रा कं. विमानतळावर दाखल झाली. नशीब की फोन सारखाच हॉटेल व दोन विमानतळ यामधला ट्रान्सपोर्टही विनाशुल्क होता.

पुन: विमानतळावरून ह्यांना फोन करण्याच्या प्रयत्नाला मी लागले व यावेळी मात्र मी केलेल्या फोनवर हे भेटले. निम्मी रात्र विमानतळावर घालवून बिचारे परत खोलीवर आले होते. आमच्या बद्दलचा कुठलाच निरोप न मिळाल्याने आमच्या काळजीने तेही उरलेली रात्र जागले हे कळले व माझा जागरणाचा शीण कुठच्याकुठे पळून गेला. आज तरी विमान मिळू दे अशी प्रार्थना करतच काउंटरवर आम्ही धडकलो. विमानतळावरच्या अधिकाऱ्यांना माझी दया आली असावी. कारण काल रात्री मी जागा न मिळता परत गेले हे लक्षात ठेवून आम्हाला लगेचच तुलूसला जाणाऱ्या विमानात प्रवेश दिला आणि मी इतक्या जोरात हुश्श !! केलं की पायलटने दचकून विमानच सोडलं ! चला….सुटले बाई एकदाची … असे वाटून मी रिलॅक्स होणार तोच शेजारून प्रश्न आला ‘आई, बाबा आपल्याला तुलूसच्या विमानतळावर भेटतील ना? मला त्यांना खुप मज्जा मज्जा सांगायच्यात’. मी काही बोलणार तोच दुसऱ्या बाजूने तत्पर उत्तर आले ‘अरे वेड्या, ते कसे येतील? बाबांना ऑफीस नाही का आज?’ झाले ! दोन्ही बाजूंनी शंकोत्तरे चालू झाली आणि माझ्या डोक्याला मात्र नवीन काळजी लागली. पुढे काय…..???

यथावकाश ‘तुलूस ‘ ग्रामी आम्ही अवतरलो. इथे सामान घ्यायचे व चालायला लागायचे. टॅक्सी करायची की सुटलो ! पण आमचे सामान पट्ट्यावरून खाली काढून ट्रॉलीवर घालण्याचीच वाट बघत असल्यासारखे कुठूनतरी दोन धिप्पाड कस्टमवाले अवतरले व ट्रॉली पकडून मला एक प्रश्नही न विचारता चालायला लागले. मला काही सुचेचना ! माझी एवढी बडदास्त ठेवायला मी काही व्ही.आय. पी. नव्हते किंवा गुन्हेगार. तितक्यात नुकतेच मी दूरदर्शनच्या एका सिरियल मध्ये एका निष्पाप मुलीला स्मगलिंगमध्ये कसे फसवले गेले होते, तिला कसे पकडले, तिचे कसे हालहाल केले ते पाहिले होते, या क्षणी अचूक आठवले आणि घाम फुटला. आपल्यासारख्यांना त्या काळी कुठूनही परतीचा प्रवास सुरू करण्याआधीच कस्टम ऑफिसर स्वप्नात यायला लागायचा आणि खरेदी केलेल्या फुटकळ चॉकलेटांचीही यादी करायला लागायचा. मला तर आता मी बरोबर आणलेल्या पिठामिठासकट सगळे आठवू लागले. आक्षेपार्ह असे काहीच आठवत नव्हते. तरीसुध्दा कस्टमच्या साहेबांनी आपले सामान पकडणे हे साधेसुधे प्रकरण नव्हते.

दोघे ऑफिसर पुढे सामानासह व मागे मी मुलांना खेचत खेचत अशी आमची वरात एका कॉरिडॉर मधून चालली होती. बऱ्याच खोल्या ओलांडत आम्ही शेवटी एका बंदिस्त खोलीत पोहोचलो. ज्या बॅगा मी कशाबशा ट्रॉलीवर चढवल्या होत्या त्या एकाच माणसाने दोन हातात दोन धरून एका फटक्यात टेबलावर ठेवल्या हे पाहून आता आपले काय होणार या विचाराने माझा थरकाप झाला. ‘दरदरून घाम फुटणे ‘ ह्याचा अर्थ मला त्या क्षणी बरोब्बर कळला.मी माझ्या पध्दतीने, इंग्लंडमध्ये सुध्दा लोकांना समजलेल्या (असे मला तरी वाटते) माझ्या इंग्रजीमध्ये त्या दोघांना काही विचारण्याचा, सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला होता. पण एक तर ते दोघे एवढे उंच होते की त्यांच्या कानापर्यंत माझा आवाज पोहोचत नसावा किंवा जरी मी खूप शूरपणे मोठ्या आवाजात बोलत होते तरी तोंडातून शब्दही बाहेर येत नसावेत. त्यांची फ्रेंच भाषेतून बडबड चालू होती. मला काहीतरी सांगायचा ते प्रयत्न करत असावेत अशी शंका मला यायला लागली. पण नक्की काय याचे कोडे उलगडेना. त्यांनाही ‘ही बाई काय सांगतीय’ हे कळेना. खाणाखुणा करत ते बॅगेच्या कुलूपाकडे हात दाख़वायला लागले तर मला वाटले की ते यात काय आहे हेच विचारताहेत. मी माझे सर्व भाषाकौशल्य पणाला लावून कणीक, डाळीचे पीठ, भाजणी, चकल्या, कडबोळी, लाडू वगैरेचे इंग्रजी वर्णन सांगायला लागताच दोघेजण जाम हैराण झाले. ही सगळी गंमत मुले अगदी मन लावून ऐकत होती. यशोधनने थोडे माझ्याबाजूने व थोडे त्यांच्या बाजूने आपले इंग्लिश फाडून परिस्थिती आणखी घाईला आणली. गौरीकुमारही थोडीशी भर घालायला सुरुवात करणार हे बघितल्याबरोवर जादू झाली आणि उपाय लक्षात आला की आता दुभाषा शोधायलाच हवा.’करा रे हाकारा, पिटारे डांगोरा..’ या चालीवर शोध सुरू झाला आणि तुलूसनगरीत एक तरुण मुलगा दुभाषा म्हणून सापडला.झटक्यात सगळा उलगडा झाला की हा गोंधळ बॅगेच्या किल्लीसाठी होता. मग बॅगेत काहीच न सापडल्याने आमची यथावकाश म्हणजे सुमारे दीड-दोन तासाने बाहेर रवानगी झाली.म्हटले चला, आता फक्त ह्यांच्या हॉटेलवर पोहोचायचे की बास. महिनाभर चिंता नाही.

आम्ही रिसेप्शन काउंटरवर चौकशी करून टॅक्सी पकडली. टॅक्सी चालू झाली, चांगले २-३ फर्लांग कापल्यावर मी हॉटेलचे नाव टॅक्सीचालकाला सांगितले- नव्हे दाखवले. कचकन ब्रेक दाबून त्याने वाहन वाहन थांबवले. आता याला काय झाले? का टॅक्सी सुरू करून थोडे आणायचे व नंतर पैशाची मागणी वाढवायची? का बाईमाणूस पाहून आणखी काही? एक ना दोन ! नाना शंका मनात ! चालक एकदम हात हलवू लागला. मान नाही नाही करत होता. ‘होतेल होतेल’ ‘नो नो’ एवढेच शब्द मला कळले. म्हणजे हॉटेलचा पत्ता व रस्ता याला ठावूक नसावा इतका बोध मला झाला. पुन्हा भाषेचा प्रश्न आणखीच गंभीर! पण त्याचा रोज वेगवेगळ्या लोकांशी संबंध येत असल्याने खाणाखुणांच्या भाषेत तो प्रवीण होता. मलाही माझ्या इंग्रजीवरचे प्रभुत्व आत्तापर्यंत कळले होतेच. मघाच्या घोटाळ्यापेक्षा यावेळी लवकर प्रकरण मिटले .व ‘लॉजिटेल’ या नावाचे हॉटेल तुलूसमध्ये आस्तित्वातच नाही एवढा उलगडा उभयपक्षी झाला.आता काय करावे कळेना. मी तर सकाळी विमान-तळावरच्या फोनवरून ‘मि. बोरकर जरी कामावर गेलेत तरी ते रहात असलेले हॉटेल ते हेच. ते कामावर गेले असले तरी तुमच्या येण्याची ते वाट पहात होते व किल्ली देऊन गेलेत’ हा लॉजिटेलमधल्या रिसेप्शनिस्टशी बोलून निरोप ऐकला होता. म्हणजे सकाळपर्यंत जागेवर असणारे हॉटेल पॅरिस ते तुलूस एवढ्या दोन अडीच तासाच्या प्रवासात गायब? टॅक्सी ड्रायव्हर तर त्याच्या मतावर ठाम होता.मला भीती पडली की हा मला इथेच उतर म्हणाला तर काय? पण नशीबाने त्याला ते सुचले नाही. शेवटी परत विमानतळावर जाऊन तिथल्या काऊंटरवर असणाऱ्या मुलीची मदत घ्यावी यावर आमचे एकमत झाले, पण प्रत्यक्षात प्रश्न वेगळाच होता. वन वे असल्याने परत फिरताना खूप लांबचा फेरा पडणार होता. मुलांना टॅक्सीत ठेऊन आपण दोघे परत जाऊ असा चालकाचा पर्याय मला कधीच पटणारा नव्हता. त्यामुळे सामान गाडीत ठेवून मुलांना ओढत आमची वरात परत विमानतळाकडे..! तिथल्या हॉटेल बुकींग करणाऱ्या रिसेप्शनिस्टच्या यादीतही लॉजिटेलची गणना नव्हती.

‘आई, आता काय करायचं? हॉटेल कुठं गेलं? असं कसं गं? ‘ मुलांची प्रश्नावली परत चालू झाली. त्यातच ‘आई, तू आजच फोन केला होतास ना हॉटेलवर? ‘ हा प्रश्न आला आणि उत्तर सापडलं. ‘तुम्ही या फोन नंबरवर फोन करून बघता का प्लीज? मी आजच सकाळी बोलले होते हो तिथल्या बाईशी! ‘माझा अगतिक स्वर एकून हातातली कामे टाकून सगळेजण धावले .फ़ोन झाला आणि उलगडाही झाला की २ महिन्यापूर्वी ‘इनोटेल’ हे नाव धारण करणाऱ्या हॉटेलचे नुकतेच ‘लॉजिटेल’ या नावाने बारसे झाले होते. बाळ अगदीच ‘नवजात’ असल्याने त्याचा कुठेच फारसा गवगवा नव्हता किंवा ‘जन्म’ दाखलाही तयार झालेला नसावा म्हणून सगळा घोटाळा ! पुढचे सगळे एकदम सरळ झाले. ‘इनोटेल’ हे ऐकल्यावर टुणकन उडी मारून चालक जे वेगात निघाले ते हॉटेल आल्यावरच थांबले.’ हॉटेल मध्ये जा, नवऱ्याची खोली, परिचित वस्तू दिसल्यावर खाली ये, नंतर मला पैसे व बाय बाय, थॅन्क्यू जे काय द्यायचे ते दे’ असे म्हणणारा टॅक्सीचालक मी तरी कधीही विसरणार नाही. आम्ही योग्य ठिकाणी पोहोचेपर्यंत मिळालेले अनुभव आज जरी साधे फालतू वाटले तरी त्यावेळी ते निश्चितच अंगावर काटा आणणारे होते यात शंकाच नाही! अशा तऱ्हेने मुंबईपासून सुरू झालेली माझी अडथळ्याची शर्यत अखेर माथूरसाहेब आणि तो फ्रेंच टॅक्सीवाला ह्यांच्या मदतीने अखेर संपली..!

-अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..