रात्री झोपेत असताना अचानक आवाज ऐकू येऊ लागला. कट कटकट, कट कटकट असा आवाज सतत येऊ लागल्याने झोप मोड झाली . विशेष म्हणजे केबिनमधूनच येतोय हे स्पष्ट झाल्याने एका क्षणात बेड वरची लाईट चालू केली. घड्याळात बारा वाजून गेले होते आणि मिनिट काटा आपोआप कट कटकट कट कटकट करीत पुढे पुढे सरकत होता. एकतर आवाजाने झोप उडाली होती त्यात घडाळ्यात बारा वाजल्यानंतर आपोआप भराभर फिरणारा मिनिट काटा बघून चक्रावल्यासारखे व्हायला लागले. सेकंदा सेकंदाला मिनिट काटा पुढे पुढे सरकू लागल्याने हे काय आणि का होतंय ते कळायला मार्ग नव्हता. पुढील काही सेकंदात मिनिट काट्याची कट कट बारा वर येऊन थांबली आणि तास काटा एक वर आला. माझ्या मोबाईल मध्ये बघितले तर बारा वाजून दोन मिनिटे झाली होती. मग केबिनच्या घड्याळात बारा वाजता आपोआप काटे पुढे सरकून एक कसा काय वाजला या विचाराने दरदरून घाम फुटायला लागला. घड्याळाच्या आवाजाने झोप तर उडाली होती पण जाग आली नव्हती, कारण जहाज इटली कडून इस्तंबूल कडे निघाले होते, चीफ इंजिनियर ने संध्याकाळी पाच ऐवजी चार वाजताच सुट्टी करायला सांगितली होती. संध्याकाळी सहा वाजता जहाजाच्या पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम वर क्लॉक्स विल बी अडव्हान्स बाय वन हवर टूनाईट ही सूचना दिली होती. मोटर मन ने पण सांगितले होते की आजचा दिवस 23 तासांचा आहे, उद्या लवकर उठावे लागेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करताना सेकंड आणि थर्ड इंजिनिअर दोघांना रात्रीचा प्रकार सांगितल्यावर ते हसायला लागले, थर्ड इंजिनियर ने विचारले पहिल्यांदा बघितले का क्लॉक अडव्हांस होताना? त्याला हो सांगितल्यावर त्याने माहिती दिली की जहाजावरील सगळी घड्याळे नेवीगेशनल ब्रिजवरुन एकाच वेळी अॅडजस्ट केली जातात. ब्रिजवर असलेले घड्याळ पुढे किंवा मागे केले की केबिन, मेस रूम, इंजिन रूम जिथे जिथे जहाजाची घड्याळे आहेत तिथे तिथे एकाच वेळी सिग्नल जाऊन सगळी घड्याळे एकच वेळ दाखवतात.
भारताकडून इंग्लंड कडे जाताना एक एक तास मागे होत जातो. तेच इंग्लंड कडून भारताकडे येताना एक एक तास कमी कमी होत जातो. ग्रीन वीच प्रमाण वेळेनुसार प्रत्येक देशाचा किंवा शहराचा टाईम झोन असतो. या टाईम झोन मध्ये येताना किंवा बाहेर पडताना अर्धा तास किंवा एक तास पुढे किंवा मागे केला जातो.
ग्रीनवीच हे लंडन शहराचा उप विभाग आहे. येथून जाणारे रेखावृत्त मूळ किंवा शून्य रेखावृत्त म्हणून मानलेले आहे. या रेखावृत्तावर सूर्य डोक्यावर आला की त्या ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे समजतात. हीच त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय. ब्रिटीश बेटांची प्रमाणवेळ याच वेळेवरून ठरवली जाते. भारतीय प्रमाणवेळ ही जीएमटीपेक्षा ५ तास ३० मिनिटे अगोदर येते. उदाहरण: इंग्लंडमध्ये दुपारचे साडेतीन वाजले भारतात रात्रीचे ९ वाजले असतात.
ग्रीनविच मीन टाईम (जीएमटी) खरं तर मानकीकरण आणि नियमीकरणाचा प्रयत्न आहे ज्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जागेवर त्या त्या वेळी किती वाजलेत हे सांगू शकतो. १९७२ पर्यंत जीएमटीच आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ होती. आज त्याची जागा UTC म्हणजे Coordinated Universal Time ने घेतली असली तरी भारतात अजूनही बऱ्यापैकी जीएमटीचा बोलबाला आहे.
जहाजाच्या ऑफिस मध्ये तीन चार घड्याळे असतात त्यापैकी एक जहाज ज्या टाईम झोन मध्ये असेल तिथली स्थानिक वेळ दाखवत, एक जीएमटी, एक भारतीय आणि एक कंपनीचे मुख्यालय जे मोनॅको नावाच्या देशात मोंन्टेकार्लो मध्ये आहे तिथली वेळ दाखवते.
घरी फोन करताना जहाजावर आता दुपारचे बारा वाजलेत मग भारतात एवढे एवढे वाजले असतील असा हिशोब करून फोन करायला लागतो. प्रियाला बर्थ डे विश करायला रात्री बारा वाजून एक सेकंद वेळ गाठण्यासाठी रात्रीचा सव्वा दोन वाजता चा अलार्म लावून झोपायला लागले होते कारण तेव्हा आमचे जहाज भारतीय प्रमाण वेळेपेक्षा अडीच तास पुढे असलेल्या टाईम झोन मध्ये सिंगापूर जवळ जहाज चालले होते.
ज्या दिवशी क्लॉक अडव्हान्स होते त्या दिवशी सर्व इंजिनियर आणि इंजिन क्रृ ला एक तास लवकर सुट्टी मिळते कारण जहाज नेहमी खोल समुद्रात असते पण डेक ऑफिसर चार चार तासाची वॉच ड्युटी करत असल्याने त्यांना वीस वीस मिनिटे वॉच वर लवकर यावे लागते. जेव्हा क्लॉक रिटार्ड म्हणजे एक तास मागे केले जाते त्या दिवशी रात्री घड्याळाचे काटे उलटे फिरवले जातात. रात्री बारा वाजता काटे फिरवून अकरा वाजेवले जातात. असे बोलतात प्रत्येकाच्या जीवनात एक एक टाईम झोन असतो चांगला किंवा वाईट मग त्यानुसार जो तो त्याच्या त्याच्या टाईम झोन मध्ये सुखी किंवा दुःखी असतो. पण जहाजावर जेव्हा जेव्हा आम्ही जीएमटी टाईम झोन कडे जात असतो तेव्हा तेव्हा होणाऱ्या एक तासाच्या टाईम रीटार्ड मुळे त्या दिवसा पुरते तरी पंचवीस तासाचा दिवस मिळाल्यामुळे आनंदी असतो.
अजूनही कोणाला फोन केला जहाजावरून की पहिला प्रश्न असतो की किती वाजलेत तुझाकडे आता, मग घड्याळात बघून सांगावे लागते अमुक अमुक वाजले आहेत. जहाजावर कधी कधी पंचवीस तर कधी कधी तेवीस तासांचा दिवस अनुभवायला मिळतो.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर,
B. E. (mech ), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply