ए.टि.पी. याचा अर्थ ऍटोमॅटीक ट्रान्सफर प्लॅन!
भारतीय गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंड व आयुर्विमा क्षेत्रातील युलीप हे गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध होऊन बरीच वर्षे होऊन गेली आहेत. छोट्या छोट्या रकमांपासून गुंतवणुक करण्याची सोय, चार वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांमधे गुंतवणुक करण्याची सुविधा, चक्रवाढ पद्धतीने मिळणारा परतावा व लवचिकता या मुळे म्युच्युअल फंडांच्या योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रीय झाल्या. म्युच्युअल फंडांच्या योजनांव्यतिरीक्त मीळणारे व आपोआप वाढत जाणारे आयुर्विमा संरक्षण, तसेच आयकरामधे मिळणारा दुहेरी फायदा या मुळे युलिप योजना पण तुफान लोकप्रीय झाल्या. बघता बघता या योजनांमधील गुंतवणुक 10,000 कोटी रुपयांवर पोचली.
पण आता या योजनांची लोकप्रीयता बर्यापैकी घसरत चालल्याचे दिसुन येत आहे. म्युच्युअल फंडांच्या योजनांवरील लोकांचा विश्वास उडत चालला असून आयुर्विमा क्षेत्रातील युलीपच्या योजना नाकारणार्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे असे दृष्य सध्या पहायला मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या तीन चार वर्षांमधे ज्या लोकांनी या योजनांमधे गुंतवणुक केली त्यांना अपेक्षीत फायदा मिळालेला नाही, तर बर्याच जणांचे आर्थिक नुकसान पण झालेले आहे असे अढळून येत आहे.
असे कां व्हावे? याचा मी थोडाफार अभ्यास केला. मला असे आढळून आले की बहुतेक गुंतवणुकदारांनी ‘स्टॉक मार्केट’शी संबंधीत असलेल्या ‘ग्रोथ किंवा इक्विटी’ फंडाची निवड केली आहे. गेल्या तीन ते चार वर्षातील स्टॉक मार्केटची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. याचा परिणाम या फंडांच्या एन्. ए. व्ही. वर होऊन यात म्हणावी तशी भरीव वाढ होत नव्हती तर बर्याच वेळा यामधे घसरण पण होत होती. ‘स्टॉक मार्केट’ मधे सर्वात जास्त फायदा होतो असे सांगीतले गेल्या मुळे व तसे आकडेवारिनिशी सिद्ध होत असल्यामुळे बहुतेकांनी या फंडाची निवड केली होती. पण स्टॉक मार्केटच्या दिर्घकालीन असमाधानकारक कामगिरीमुळे या आकडेवारीला फारसा कांही अर्थ राहीला नाही व त्यामूळे गुंतवणुकदारांचा या फंडावरील असलेला विश्वास व भरोसा दिवसेंदिवस कमी कमी होत चालला होता. या योजनांची लोकप्रियता कमी होण्यामधे हे एक महत्वाचे कारण आहे असे मला आढळून आले. असे जरी असले तरी स्टॉक मार्केटशी निगडीत आलेल्या ग्रोथ किंवा इक्विटी फंडामधेच सर्वात जास्त फायदा होऊ शकतो हे सत्य नाकारता येत नाही.
यावर एक उपाय म्हणून एस. आय. पी. चा (सिस्टिमॅटीक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन) चा तोडगा सुचवण्यात येतो. याचा अर्थ एकरकमी गुंतवणुक नकरता ठरावीक कालावधीने थोडी थोडी गुंतवणुक करायची. जर एखाद्याला वर्षाला 24000 रुपये गुंतवणुक करायची असेल तर एक रकमी गुंतवणुकीऐवजी महीन्याला 2000 रुपये किंवा दर तीन महिन्यांनी 6000 रुपये गुंतवणुक करायची. अशा प्रकारची गुंतवणुक केल्यामुळे मार्केटमधील चढ उताराचा फायदा मिळतो. ज्यांनी एस.आय.पी. केलेला आहे त्यांना फारसा फायदा झालेला नसला तरी फारसे नुकसान झालेले नाही असे मला आढळुन आले आहे. त्यामुळे चढ-उतार होत असलेल्या मार्केटमधे एस. आय.पी. हा एक चांगला पर्याय आहे.
असाच अजुन एक पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजै ए.टि.पी. यामधे गुंतवणुक करण्यासाठी ‘डेट फंड किंवा बॉन्ड फंड’ व ‘ग्रोथ किंवा इक्विटी फंड’ यादोन फंडांचा उपयोग करण्यात येतो. ज्यावेळी स्टॉक मार्केटची कामगिरी समाधानकारक नव्हती त्यावेळी ‘डेट किंवा बॉन्ड’ फंडाने उत्तम परतावा दिलेला आहे.(बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त) तसेच गुंतवणुकिच्या दृष्टीने हा फंड जास्त सुरक्षीत समजला जातो
ए.टि.पी मधे पहिल्यांदा गुंतवणुक डेट फंडात केली जाते. मग ठरावीक काळाने व ठरावीक पद्धतिने हे पैसे हळू हळू ग्रोथ किंवा इक्विटी फंडात ऍटोमॅटीक पद्धतिने ट्रान्सफर केले जातात. अशा रितीने वर्षभर पैसे डेट फंडातुन ग्रोथ किंवा इक्विटी फंडामधे ट्रान्सफर होत असतात. वर्ष संपले की ग्रोथ किंवा इक्विटी फंडातील पैसे परत डेट फंडात ट्रान्सफर होतात व वरील पद्धतिने ग्रोथ किंवा इक्विटी फंडात ट्रान्सफर होत रहाताता.
या पद्धतीने तिहेरी फायदा होतो. डेट फंडाचा परतावा मिळतो. एस.आय. पी. सारखा फायदा मिळतो व ग्रोथ अथवा इक्विटी फंडाचा पण फायदा मिळतो. गुंतवणुक अधीक सुरक्षीत होते. कारण गुंतवणुकिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘डेट किंवा बॉन्ड’ फंड जास्त सुरक्षीत समाजला जातो. हा फंड व्याज देणार्या योजनांशी संबंधी असतो व व्याज दर कधी शुन्य टक्यां ईतके खाली येत नसताता.
ही योजना म्युच्युअल फंड व युलीप या दोन्ही योजनांसाठी उपलब्ध असुन ती विनामुल्य असते. तसेच ही योजना केव्हाही चालु करता येते व बंद करता येते. ज्या लोकांना एक रकमी गुंतवणुक करण्याची आवश्यकता किंवा इच्छा असते त्यांच्यासाठीही योजना अत्यंत लाभदायक ठरू शकते. परंतू जे लोक एस.आय.पी.द्वारे गुंतवणुक करतात त्यांना पण या योजनेचा फायदा मिळु शकतो.
भारत सरकारने बजेटमधे सेक्शन 80 सी ची मर्यादा 50,000 रुपयांनी वाढवली आहे. तसेच ‘टॅक्स फ्री इन्कम’ ची मर्यादा पण 50,000 रुपयांनी वाढवली आहे. याचा अर्थ आता ‘टॅक्सेबल इन्कम’ मधे 100000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. त्यामुळे इन्कम टॅक्सचा बोजा कमी होऊन गुंतवणुकिसाठी अधीक पैसे उपलब्ध होऊ शकतात. लोकांनी म्युच्युअल फंड व युलिप सारख्या योजनांमधे जास्तीतजास्त गुंतवणुक करावी व ए.टि.पी. चा उपयोग करून सुरक्षीत गुंतवणूकीबरोबर जास्तीतजास्त फायदा पदरात पाडून घ्यावा हाच या लोखाचा मुळ उद्देश आहे.
— उल्हास हरि जोशी
Leave a Reply