लहानपणी मुलांना प्रथम आपण टाळ्या वाजवायला शिकवतो. टाळ्या वाजवताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच असतो. लहानपणी शिकलेली टाळ्या वाजवण्याची सवय आपल्याला आजन्म उपयोगी पडते. कारण कुठल्याही चांगल्या प्रसंगी आपण आनंदाने टाळ्या वाजवतो. उदा. वाढदिवसाला, समारंभात, शाळेत कुणी बक्षीस मिळवलं की, कुठल्याही कार्यक्रमात वक्ता अथवा पाहुणे ह्याच स्वागत करताना, एखाद्याचे व्याख्यान झाल्यावर त्यांना दाद म्हणून, गाण्याच्या किंवा नाचण्याच्या कार्यक्रमानंतर, स्पर्धा जिकंल्यावर इत्यादी विविध कारणासाठी आपण टाळ्या वाजवून इतरांना आणि स्वतःलाही प्रोत्साहित करत असतो.
आपल्या सर्वांचा आवडता गणपती बाप्पा आला की, आपण सर्वजण मिळून दिवसातून दोनदा आरती करतो आणि आरती करताना आनंदाने आणि उत्साहाने टाळ्या वाजवतो. अशा प्रकारे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच विविध प्रसंगांना टाळ्या वाजवायला आवडतात. अशा ह्या सर्वांचा आवडत्या टाळ्या वाजवणे हा आरोग्याच्या दृष्टीनेही एक चांगला व्यायाम आहे. त्याला इंग्रजीमध्ये “क्लॅपिंग थेरपी” असे संबोधिले जाते. आपल्या शरीरात विविध प्रेशर पॉईंट आहेत. एक्यूप्रेशर टच थेरेपीचा एक प्रकार आहे. एक्यूप्रेशरचा वापर विविध लक्षणे आणि वेदना कमी करण्यासाठी केला जातो.
केरळ आयुर्वेद ग्रुपचे डॉ. राहुल डोगरा सांगतात की, आपल्या शरीरात एकूण 340 ज्ञात दाब गुण (प्रेशर पॉईंट)आहेत, त्यापैकी 28 आपल्या हातामध्ये आहेत. त्या दाबांची ठिकाणे आपण ओळखू शकतो आणि थेरपीचा वापर करून आपण त्यांना मालिश करून आश्चर्यकारक फायद्यांचा आनंद घेवू शकतो. या पॉइंट्सचा शरीराच्या वेगवेगळ्या अंगांशी थेट संबंध असतो, म्हणजेच ह्या प्रेशर पॉइंट्सना योग्यप्रकारे दाबून आपण शरीरातील वेगवेगळ्या वेदना कमी करण्यासाठी ह्या थेरपीचा वापर करू शकतो. नुसत्या टाळ्या वाजवूनही ह्याचा फायदा घेऊ शकतो. टाळ्या वाजवल्याने ५ महत्वाच्या प्रेशर पॉइंटनं चालना मिळायला मदत होते. हे पॉईंट्स खालील आरोग्य फायद्यांशी निगडित आहेत:
१) टाळ्यांमुळे हृदयाच्या आणि फुप्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी तसेच त्याच्याशी संबंधित आजार कमी होण्यास मदत होते. उदा. अस्थमाचा त्रासही कमी होण्यास मदत होते.
२) टाळ्या वाजवल्याने पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
३) कमी रक्तदाब असणाऱ्या लोकांना टाळ्या वाजवणे उपयुक्त ठरते.
४) नियमित टाळ्या वाजवल्यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.
५) टाळ्या वाजवल्यामुळे गाऊट्च्या त्रासापासून मुक्तता मिळण्यास मदत होते.
६) टाळ्या नियमित वाजवल्याने लहान मुलांची आकलनक्षमता वाढण्यास मदत होते. मुलांची अभ्यासातील गती वाढण्यास मदत होते.
७) कार्यालयात किंवा घरी सतत एसीमध्ये बसून काम केल्यामुळे शरीराला घाम येत नाही. अशा वेळी टाळ्या वाजवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
८) टाळ्या वाजवल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.
९) टाळ्या नियमितपणे वाजवल्याने मधुमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश, केसगळती, डोळ्यांचे विकार यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी मदत होते.
Leave a Reply