भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगू शकतात. मूळ अमेरिकन आणि ब्रिटीश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत कारण या समाजाने आपली कुटुंब व्यवस्था टिकवलेली नाही. या लोकांमध्ये घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. अमेरिकेमध्ये जसे घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे तसे भारतात सुद्धा वाढत चालले आहे.
मुंबईच्या कुटुंब न्यायालयामध्ये दररोज सरासरी १० घटस्फोटाचे अर्ज दाखल होतात. याचा अर्थ अमेरिकेतल्या भोगवादी संस्कृतीचे लोण भारतातही पसरत चालले आहे. भारतीयांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. ती न घेतल्यास भारतात सुद्धा कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल आणि त्यातून आज अमेरिकेसकट पाच्छिमात्य देशांना भेडसावत असलेले सामाजिक प्रश्न भारताला सुद्धा भेडसवायला लागतील. परिणामी आपल्यालासुद्धा कुटुंब व्यवस्था मोडली म्हणून संस्कृती लयाला गेली असे नाईलाजाने म्हणण्याची पाळी येईल.
छोट्या कुटुंबामुळे निश्चिंती आली स्वातंत्र्याची! आपल्या आकांक्षांना, मुलांच्या भवितव्याला आकार देणे सोपे झाले. एकत्र कुटुंब पद्धतीत ताणतणावांना तोंड देण्यात, समन्वय साधण्यात शक्ती अन् वेळ खर्ची पडत असते. छोट्या कुटुंबात हे प्रश्न नाहीत. परंतु काही अपवादात्मक केसेस अशा असतात की छोट्या कुटुंबात पती-पत्नीत वाद निर्माण होतात. कारण एकत्र कुटुंबात पती-पत्नीचे मतभेदाचे, वादाचे एक अन्य लक्ष्य असते. हे लक्ष्यच नाहीसे झाल्यावर पोकळी निर्माण होते. ती भरून येते आपापसातील उफाळलेल्या वादातून. छोट्या कुटुंबात जोडीदार गेल्यावर येणारा एकाकीपणा सोसणे महाकठीण. तात्पर्य, कोणती पद्धती आदर्श हे परिस्थितीवर व प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर आधारित असणे स्वाभाविक आहे.
एकत्र कुटुंबाच्या विघटनानंतर वृद्धांची समस्या जास्तच कठीण होत चालली आहे. वृद्धाश्रम हा पर्याय असला तरी तो आपल्या भारतीय समाजमानसिकतेच्या चौकटीत शोभून दिसत नाही. वृद्धांना तसेच कुटुंबीय तो एक अंतिम पर्याय म्हणूनच निवडताना दिसतात. पाश्चात्य विचारसरणीने पचवलेली वृद्धाश्रमाची संकल्पना अजून आपल्या समाजात उंबरठ्यावरच घुटमळताना दिसते आहे. वृद्धांची समस्या अलीकडच्या काळात जरा जास्तच बिकट आणि विकट झाल्याचे दिसते.
जगदीश पटवर्धन