नवीन लेखन...

कोविड 19 नंतर – लेखमालिका विषय परिचय

पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, नाटक, सिनेमा, टी.व्ही मालिका, ग्रंथालये आणि राजकारण या क्षेत्रांवर लिहिणारे हे लेखक. लेखिका, आपल्याला विषयाचा अभ्यास करणारे आणि दिर्घकाळ अनुभव असलेले आहेत.

आणखी काही क्षेत्रे आहेत ज्यांच्या कोविड-19 नंतरच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, या लेखमालिकेतून वाचकांच्या विचारांना चालना मिळेल आणि आपला प्रतिसाद, अपेक्षा ते आम्हाला कळवतील अशी आशा वाटते.

या लेखमालिकेतील विषयांची ओळख करुन घेऊया….

लेखक – डॉ. महेश केळुसकर.


पत्रकारिता

लोकशाही आणि विकास, पत्रकारांची सुरक्षितता आणि पत्रकारांचे भविष्य याबाबत कार्यरत असलेली जगप्रसिध्द संस्था म्हणजे Thomson Reuters Foundation. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंतोनिओ झप्पुल्ला यांनी कोविड कालीन व कोविडोत्तर पत्रकारितेबाबत अलिकडेच एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणतात :

“ Increasingly,… it has become clear that the threat is not only in the form of deadly virus. The pandemic is also being used by malign forces as an opportunity o disrupt, sabotage and hamper free flow of trusted, independent information.”

कोविड काळात केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभराच्या पत्रकारिता व्यवसायाची विश्वासार्हता पणाला लागली. आपत्तीचं तटस्थपणे मूल्यांकन करून खरी आणि विश्वासार्ह माहिती जनतेला देण्यासाठी पत्रकार खरे तर बांधील होते. पण तसे झालेले दिसत नाही. कोविड काळात TRF ने पत्रकारांच्या 55 प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या. त्यात आफ्रिका, आशिया, पूर्वयुरोप आणि लॅटिन अमेरिका येथील संपादक, छाया पत्रकार, बहुमाध्यम पत्रकार, डाटा जर्नालिस्ट आणि मुक्त पत्रकार सहभागी झाले होते. ते विविध देशातील सरकारी माध्यमे आणि व्यावसायिक वृत्तपत्र कंपन्यांशी संबंधित होते.

या कार्यशाळांमध्ये आपले अनुभव आणि निरीक्षणे त्यांनी मांडली. त्याचा सारांश असा : 1) कोविड काळात माहितीचे स्त्रोत क्षीण झाले. 2) पत्रकारांवरील हल्ले वाढले. 3) सरकारी बंधनांमुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आली. 4) न्यूज अजेंडा ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न झाले. 5) समाज माध्यमांवरून लोक पत्रकारांना ट्रोल करू लागले. 6) वेतनकपात आणि नोकर कपात करून माध्यमांच्या मालकांनी पत्रकारांमधे दहशत निर्माण केली. 7) सुरक्षित अंतराचे निर्बंध, इंटरनेट उपलब्धता आदी कारणांमुळे ‘न्युज रूम्स’ची रचना बदलली 8) रेडिओ ऐकण्याचं प्रमाण वाढलं.

आता कोविड संपत आल्यावर आणि नंतरही पत्रकारितेपुढे अनेक आव्हाने निर्माण झालीत. प्रिन्ट, ऑडिओ-व्हिज्युअल आणि डिजिटल पत्रकारितेला आपली विश्वासार्हता नव्याने मिळवावी लागेल. नव्या (आणि जुन्याही) पत्रकारांना वेगवान, अचूक आणि खातरजमा केलेल्या बातम्या व माहिती देण्यासाठी नवी तंत्रे शिकावी लागतील. नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील. आणि आपल्या वाचकाला किंवा प्रेक्षकाला खेचून घेण्यासाठी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून कुठल्या माध्यमासाठी कोणती कथनशैली वापरावी, हे ठरवावं लागेल. माध्यम मालकांनाही ‘आपत्ती म्हणजे संधी आणि आपलं माध्यम म्हणजे अधिकाधिक फायदा मिळवून देणारे एक उत्पादन’ हा दृष्टीकोन बदलून ‘कोविड’ नंतरच्या या व्यवसायाची नवी दिशा ठरवावी लागेल. कारण रोज एक सोन्याचं अंड देणाऱया कोंबडीलाच मारून खाल्लं तर ‘गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही’,असा प्रत्यय येईल.

साहित्य

स्वार्थ, महत्त्वाकांक्षा आणि चंगळवादाने भरलेल्या जगात एखाद्या महामारीचा हल्ला किती भयावह असतो आणि या काळात मध्यमवर्गीय अभिलाषांचे बुरखे कसे फाटतात, याचं वास्तववादी चित्रण करणारी अल्बर्ट कामू यांची ‘प्लेग’ हा कादंबरी विश्वसाहित्यात प्रसिध्द आहे. कोलंबियाचे कादंबरीकार गॅब्रिएल गार्सीया मार्केस यांची ‘लव इन द टाईम ऑफ कॉलरा’ ही कादंबरी प्रेम आणि महामारीच्यायातना यांची संघर्ष कहाणी आहे. भारतीय साहित्यातील दिग्गज रवीन्द्रनाथ टागोर, निराला, राजेंद्र सिंह बेदी, फणीश्वरनाथ रेणु, (हिंदी) यू.आर.अनंतमूर्ती (कन्नड), शिवशिंकर पिल्लई (मल्याळम) आदी साहित्यिकांनीही आपल्या कविता, कथा, कादंबऱयांमधून अशा महाआपत्तींमधे सर्वसामान्यांच्या जगण्याची कशी फरफट होते आणि मानवी स्वभावातील सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती कशा उघड होतात याचं दर्शन दिलेलं आढळतं. अगदी अलिकडे म्हणजे 2020 साली भारतीय लेखिका श्वेता तनेजा यांच्या “The Daughter That Bleeds” या फ्रेंचमधे अनुवादित झालेल्या कथेला फ्रान्सचं मानाचं ग्रॅन्ड प्रिक्स अॅवार्ड मिळालं. कोविड-19 नंतर भारतात, गर्भधारणा करण्यास सक्षम असलेल्या स्त्रियांची लग्नाच्या बाजारात लिलावाने खरेदी-विक्री होते, अशी भीषण शक्यता या कथेत त्यांनी चित्रित केली आहे. मराठी साहित्याकडे दृष्टिक्षेप टाकला तर कोविड आल्यावर काही दर्जेदार आणि बऱयाचशा प्रासंगिक संधीतून मिळालेल्या स्फूर्तीतून निर्माण झालेल्या कविता वाचायला मिळाल्या. कथा, कादंबरी, नाटक यातून मात्र कोविडचे प्रतिबिंब अजुन तरी आढळलेले नाही अर्थात सर्जनशील लेखकांची सर्जनप्रक्रिया गुंतागुंतीची असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या आपत्तीमुळे भविष्यात मराठी साहित्य कोणत्या सर्जनरूपांना जन्म देईल, हे आत्तातरी सांगणे कठीण आहे.

कोविड-19 आल्यानंतर साहित्याशी संबंधित अन्य घटकांवरही लक्षणीय परिणाम झाला. 2020 च्या तिसऱया तिमाहीत अनेक ग्रंथविक्री कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केली. पण अॅमेझॉन, ई-वेब,    वॉलमार्ट, टारगेट या कंपन्यानी ऑनलाईन ग्रंथविक्रीचा रेकॉर्ड ब्रेक केला. ग्रंथालयांनी ग्रंथखरेदी थांबवली. पण जगभरात व्हिडिओ आणि ऑडिओ बुक्सची मागणी वाढलेली दिसली.

कोविड-19 नंतर आता ग्रंथमुद्रण आणि ग्रंथप्रकाशने पुन्हा सुरू झालीत. पुस्तकांच्या दुकानातही हळुहळू गर्दी वाढू लागलीय. मौज, दिपावली, हंस, अक्षरधारा, वाघूर, शब्दशिवार आदी दिवाळी अंकांची गतवर्षीही चांगली विक्री झाली आणि यंदाही त्यांनी केलेल्या जाहिरातींनी वाचकांचं लक्ष वेधून घेतलंय. पण अजुनही प्रकाशकांकडे अनेक लेखकांची पुस्तकं खोळंबून आहेत. वाचकांचे ट्रेन्डही बदलत आहेत. आरोग्य, गुंतवणूक, मनास्वास्थ्य अशा विषयांवरच्या पुस्तकांना अधिक मागणी आहे. आणि ऑनलाईन पुस्तकं खरेदी करण्याकडे वाचकांचा अधिक कल आहे. तेव्हा पारंपरिक प्रकाशनांबरोबरंच नव्या पध्दतीही प्रकाशकांना आणि ग्रंथविक्रेत्यांना यापुढे हाताळाव्या लागतील. ई-बुक, ऑडिओ बुक, व्हिडिओ बुक प्रकाशनांमधेही गुंतवणूक करावी लागेल.

सांस्कृतिक

समाजस्वास्थ्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत राहणे गरजेचे असते. गाठी-भेटी, चर्चा, प्रत्यक्ष संवाद सामाजिक ताण कमी करतात. सामाजिक अस्वस्थतता कमी करण्यासाठी, सकारात्मकता वाढवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपयोग होतो. पण कोविड आल्यानंतरजगभरच्या सांस्कृतिक  देवाण-घेवाणीला खीळ बसली. म्युझियम्स, संगीत उत्सव, आर्ट गॅलरीज, लोककलाकारांचे कार्यक्रम बंद झाले. लोकांची खरेदीशक्ती कमी झाल्यामुळे कलात्मक वस्तू आणि सेवा क्षेत्रही संकटात सापडले. पण याही परिस्थितीत आपली कला आणि आपण तगून राहण्यासाठी अनेक कलाकारांनी पर्याय शोधून काढले आणि आपण या महामारीला शरण जाणार नाही, अशा जिद्दीनं काम केलं. उत्तर अमेरिकेत लाकोटा ही भाषा बोलणारी एक स्थानिक जमात आहे. तिथले जगप्रसिध्द चित्रकार जेम्स स्टार गेली 30 वर्षे अश्वचित्रमालिका करीत आलेले आहेत. चित्रकला प्रशिक्षक म्हणूनही त्यांचं काम चालू असतं. पण म्युझियम्स बंद झाल्याने ते सगळं थांबलं. मोठी चित्रंही कोणी विकत घेईना. आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. मग छोट्या आकाराच्या कलावस्तू निर्माण करायला जेम्स स्टारनी सुरूवात केली. त्यांची चांगली विक्री होऊ लागली. आपल्या  घोड्यांच्या मालिकेतील चित्रांचे निवडक फोटो काढून ते पोस्टकार्ड्सवर छापवून घेऊन आणखी एक पर्याय त्यांनी खुला केला. अलास्काच्या क्रिस्ती रूबी हे फॅशनच्या दुनियेतलं मोठंनाव. समुद्री प्राण्यांच्या अंगावरच्या लोकरीपासून क्रिस्तींनी बनवलेले कोट,  हॅट्स, दागिने यांना पर्यटकांकडून खूप मागणी असायची आणि स्वत:च्या कपड्यांची निर्मिती स्वत:  करून आपण आपलं कुटुंब जगवलं, असं त्या सांगतात. फॅशनेबल मास्क तयार करून तेही विकले आणि त्यातून बऱयापैकी कमाई त्यांना झाली.

कोविड काळात जगप्रसिध्द Woman Folk Dance Festival रद्द करण्यात आला. त्यामुळे 2000 कलाकारांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. जागतिक मंचावरुन होणारा भारतीय संस्कृती दर्शनाचा सिलसिला थांबला. पण महाराष्ट्र आणि गोवा शासनांनी लसीकरण जागृतीसाठी व कोविड सुरक्षा उपायांची तळागाळात माहिती पोहोचविण्यासाठी स्थानिक लोककला स्थानिक भाषेतून सादर करणाऱया खेड्यापाड्यातील लोककलाकारांचा चांगला उपयोग केला. अगदी अलिकडे म्हणजे मे 2021 मधे महाराष्ट्रातील 36 जिह्यांतील 11400 ठिकाणी स्थानिक भाषेतील पथनाट्ये करून महाराष्ट्र शासनाने या अभिनव विधायक उपक्रमाची WHO  ला नोंद घ्यायला लावली. ऑक्टोबर 2021 पासून सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची बरीचशी बंधनं केंद्र आणि राज्य सरकारांनी दूर केलीत. संग्रहालये आणि मनोरंजन पार्क्स खुल्या होत आहेत. राजस्थान आंतर्राष्ट्रीय लोककला उत्सवाच्या तारखा (29 ऑक्टो. ते 2 नोव्हें 2021) जाहीर झाल्यात. महाराष्ट्रात गणेशोत्सवात आणि नवरात्रीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. यंदाही ते होऊ शकले नाहीत. पण येणाऱया दिवाळीत होणाऱया संभाव्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिराती दिसू लागल्यात. चित्र, शिल्प, नृत्य, संगीत, लोककलांचं आदान-प्रदान हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्वास्थ्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि कोविड-19 नंतर या क्षेत्रात काही आशादायक संकेत मिळू लागलेत.

शिक्षण

कोविड-19 मुळे शैक्षणिक संस्थेचे आकृतीबंध, विद्यार्थ्यांची हजेरी, मूल्यमापन आणि धोरण कार्याच्या विचलित निर्णयांमुळे संपूर्ण शैक्षणिक जग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. वर्ल्ड बँकेने आपली यासंदर्भातील निरीक्षणे Beaten or Broken: Informolity and Covid या रिपोर्टमध्ये नोंदवतांना म्हटले आहे की ‘शाळा बंद झाल्याचा परिणाम या पिढीवर आयुष्यभरासाठी होईल आणि मुलांच्या निर्मिती क्षमतेवर झालेले परिणाम दिर्घ काळ राहतील.’

पण याही काळात काही शिक्षकांनी पुढाकार घेऊन आपली विद्यार्थ्यांशी असलेली नाळ जोडून ठेवली. महाराष्ट्रात शहरी विभागात 2 लाख 49 हजार शाळा आणि ग्रामीण क्षेत्रात 12 लाख 50 हजार शाळा आहेत. या शाळांमधून सु. 96 लाख शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 26 कोटींहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकतात. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर हे सगळे घरात अडकले. शहरांमधून ऑनलाईनवर्ग व्यवस्थित सुरू झाले. पण ग्रामीण भागात नेटवर्कच्या अडचणी होत्या. बुलढाणा जिल्ह्dयात हिवरखेड नावाचं एक खेडेगाव आहे. तिथले लोक शेती आणि मोलमजुरीवर गुजराण करतात. तिथल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक किशोर मोतीराम भागवत यांनी घरोघरी जाऊन मुलांना शिकवलं. मग त्यांचे 11 तंत्रस्नेही शिक्षकमित्र एकत्र आले आणि त्यांच्या अथक परिश्रमांमुळे राज्यातील 1500 शिक्षकांनी शैक्षणिक व्हिडिओज एकमेकांना शेअर करून मग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. तरजम्मू-काश्मिर मधल्या डोंगराळ रियापप्सी जिल्ह्यात पोस्टिंग मिळालेल्या संजीवकुमार शर्मा यांनी खुली मैदाने आणि जंगलांमधे वर्ग भरवून आपली पटसंख्या 13 वरून 70 वर नेली.

मात्र आता शाळा उघडलेल्या असल्या आणि महाविद्यालये सुरू होत असली तरी शिक्षण क्षेत्रात चैतन्य येण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. वाढती जागतिक असुरक्षितता, कोविडमुळे झालेली क्षीण प्रकृती याला तोंड देणाऱया शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी ‘युनेस्को’ पुढाकार घेणार आहे. लंडनच्या ‘पिअर्सन’ ने म्हटलं आहे की शिक्षण क्षेत्र यापुढे ताजंतवानं ठेवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना तंत्रज्ञानात कायमस्वरूपी गुंतवणूक करावी लागेल. तसंच शिक्षण प्रशिक्षणाला डिजिटल कौशल्यांचा अंतर्भाव करावा लागेल. उच्च शिक्षण क्षेत्रात पारंपरिक्षा परीक्षा पध्दत बदलून ऑनलाईन परीक्षा व मूल्यामापन पध्दती रूढ होतील, असाही ‘पिअर्सन’चा अंदाज आहे. भारताच्या राष्ट्रीय तंत्र विकास शिक्षण कार्यक्रमांतर्गत IIT आणि IIS यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन व विज्ञान शिक्षण देण्यासाठी वेबसाईट्स आणि व्हिडिओजचा वापर करण्याचं ठरवण्यात आलं आहे. शिक्षणतज्ञांच्या मते आता कोविड-19 नंतर मार्कशीट्सवरुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवणे कालबाह्य होत जाईल. विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना कोणत्या गुणवत्तेचं शिक्षण तुम्ही देता आणि शैक्षणिक आशयमूल्य काय? हे प्रश्न यापुढे तुम्हाला विचारले जातील. या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देणार आहे.

नाटक

कोविड सुरू झाल्यावर 12 मार्च 2020 पासून न्यूयॉर्क आणि लंडन येथील सार्वजनिक नाट्यगृहे बंद करण्यात आली, पाठोपाठ जगभराची नाट्यगृहेही ओस पडली. न्यूयॉर्क येथील प्रसिध्द नाट्यदिग्दर्शक ऑस्कर युप्सिस कोविड पॉझिटिव आल्यानंतर 10 मार्चला अॅडमिट झाले आणि 5 दिवसांनी बाहेर आले तेव्हा शटडाऊन सुरू झालेला पाहून म्हणाले  “I came out into a world that had no theatre and it’s a different world.” खरोखरच नाटक हेच ज्यांच्यासाठी जग असतं त्याच्यासाठी या वेगळ्याचं नाटक नसलेल्या जगात जगणं मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या कठीण झालं. सगळ्यात हाल होऊ लागले बॅकस्टेज आर्टिस्टचे, बुकिंग क्लर्क, लाईटमन, रंगभूषाकार, वेषभूषाकार, प्रेक्षागृहातील वाटाडे उघड्यावर पडले.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गरजू नाट्यकर्मींना 1 कोटी 20 लाख रू.ची मदत केली. मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने आपल्या 28 सदस्यांना प्रत्येकी 50. हजार रूपयांचं सानुग्रह अनुदान वितरीत केलं. लेखक-दिग्दर्शक रूपन सरन आणि सुनील शानभाग यांनी ‘थिएटर दोस्त’ नावाचा ग्रुप स्थापन करून मोठ्या जिकीरीनं मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय आणि अन्य स्थानिक रंगमंच कामगारांना हुडकून काढून त्यांना वस्तु रुपात आणि रोख रक्कम देऊन माणुसकी निभावली. मराठी रंगमच कामगार संघाने मुख्यमंत्र्यांना पत्रांवर पत्रे पाठवून 10 कोटी रू.ची आपत्कालीन मदत द्यावी, अशी विनंती केली, पण आजतागायत याबाबत काहीही प्रतिसाद नसल्याची खंत रंगमंच कामगार संघाचे प्रवक्ते रत्नाकर जगताप यांनी व्यक्त केली आहे.

आता विविध देशातील नाट्यगृहे हळुहळू उघडली जात आहेत. महाराष्ट्र शासनाने 50 टक्के आसन क्षमतेसह कोविडचे इतर नियम पाळून 5 नोवहेंबर 2021 पासून नाट्यगृहे उघडायला परवानगी दिली आहे. पण थिएटर्स उघडली तरी प्रेक्षक येतील का? आणि 50 टक्के प्रेक्षकांसह नाट्यव्यवसाय टिकेल का? हा निर्मात्यांसमोर प्रश्न आहे.

जगभराचे नाटकवाले ‘Show Must Go On’ चा मंत्र जपत नाटक चालू ठेवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहोत. सेंट पीटसबर्गच्या बोल्शोई ड्रामा थिएटरने मध्यंतरी अंतोन चेकॉवचं ‘चेरी आर्चर्ड’ हे नाटक 90 प्रेक्षकांसमोर केलं आणि बाकीच्यासांठी ते यूट्युबवर उपलब्ध करून दिलं. टोकियोच्या गोर्क ब्रदर्सनी ट्रकच्या मागच्या फळकुटांवर नाटक उभं केलं आणि तो ट्रक जपानभर फिरवला, त्याला प्रेक्षकांनी (तिकीटं घेऊन) तुफान प्रतिसाद दिला. भारतातही Online नाटकं पैसे देऊन बघण्याचं प्रमाण वाढत आहे. चेन्नईच्या ‘थिएटर क्रांती’चे संस्थापक सुनील विष्णू यांनी पारंपारिक थिएटर्सना यापुढेही धक्के बसत राहणार, हे ओळखून क्रीनवर दाखवायच्या नाटकाचं दिग्दर्शन तंत्र शिकून घेतलं आणि अशी नाटकं ध्हत्ग्हा द्यायला सुरूवात केली. मराठीत कोविडपूर्व काळात वर्षाला सुमारे 40 व्यावायिक नाटकं सादर व्हायची. सुमारे 100 कोटी रू.ची वार्षिक उलाढाल व्हायची. आता बदलत्या परिस्थितीत हे शक्य होईल असं वाटत नाही. त्यामुळे ह्रषीकेश जोशी, संकेत सीमा विश्वासराव यासारख्या लेखक-दिग्दर्शकांनी ‘नेटक’ (म्हणजे ऑनलाईन समूल्य नाटकं) करत जगभरचे मराठी नाट्यप्रेक्षक खेचून घ्यायला सुरूवात केली आहे.

सिनेमा आणि टी.व्ही. मालिका

वॉर्नर ब्रदर्स ने 2021 च्या सगळ्या फिल्म्स 430 Max वर रीलीज केल्या आहेत. तर केन लीच या सोशलिस्ट फिल्म मेकरनी आपले उत्तम चित्रपट यू ट्यूबवर माफक किंमतीत उपलब्ध करून प्रेक्षक खेचून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. बॉलिवूडचे बिग बजेटवाले महत्त्वाकांक्षी चित्रपट मात्र सिनेमा थिएटर्स नॉर्मल होण्याची वाट पहात बसले आहेत. मार्च 2020 मधे महाराष्ट्रातील सुमारे 1000 सिंगल क्रीन थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स बंद झाले. आणि सिनेमावाले अडचणीत आले. इंडस्ट्रीतले रोजमजूर, केटरर्स, वाहतूक पुरवठादार, सिनेमांशी निगडित खेळणी-पुस्तके-दागिने बनवून विकणारे जोडधंदेवाले- सगळ्यांनाच आर्थिक फटके बसू लागले. जोडीला बॉलिवूडची ड्रग्ज प्रकरणे उजेडात येऊन मोठमोठ्या कलाकारांचे प्रतिमाभंजन होऊ लागले. मध्यंतरी काही काळासाठी डिसेंबर 2020 मध्ये सिनेमाहॉल उघडण्यात आले होते. पण कोविडची दुसरी लाट आल्यावर पुन्हा निर्बंध लादले जाऊन ते बंद कण्यात आले. आता ऑक्टोबर 2021 पासून निम्म्या आसनक्षमते एवढे प्रेक्षक मास्क लावून आणि दरवाज्यावर त्यांचे तापमान मोजून सिनेमाहॉलमधे सोडण्याची परवानगी शासनाने दिली आहे. खोखरच कोविड नंतर बदललेल्या जगात दुनियेतले समस्त सिनेमा मेकर्स सिनेमा टिकवून ठेवण्यासाठी कोणते पर्याय वापरणार आहेत, हा मोठा औत्सुक्याचा विषय आहे.

USC School of Cinematic Arts चे प्रोफेसर हेन्री जेनकिन्स यांच्या मते अन्य देशांतील प्रादेशिक आशयाचे सिनेमे आता अमेरिकन कंपन्यांशी स्पर्धा वाढवतील, त्यामुळे अमेरिकन चित्रपट निर्मात्यांना आपल्या रिलिजेस स्ट्रटेजीस बदलाव्या लागतील. न्यूयॉर्क युनिवर्सिटीतील एंटरटेनमेंट डायरेक्टर पॉल हार्डर्ट यांनी म्हटलं आहे की “कोविडोत्तर काळात सिनेमा थिएटर्समधे जाणारे प्रेक्षक उत्तरोत्तर कमी होतजातील कारण कोविड काळात घरी बसून उत्तम साऊंड क्वालिटी सह मोठ्या क्रीनवर, आपापल्या होम थिएटर्समधे बसून सिनेमा बघण्याची सवय आता प्रेक्षकांना लागली आहे.” एसएजी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मार्कंड अधिकारी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे प्रदर्शित करण्याची लाट आली आहे. असं निरीक्षण नोंदवून त्यामुळे नवं टॅलेन्ट, नवे प्रयोग प्रोत्साहित होतील असा आशावादी सूर लावला आहे. तर पुण्याच्या फ्लेम युनिवर्सिटीत चित्रपट अध्यापन करणारे प्रा. कुणाल राय यांनी ओटीटीमुळे सेन्सॉरचे अडथळे दूर होऊन सिनेमावाल्यांचा त्रास वाचेल, असं म्हटलं आहे.

टीव्ही मालिका मात्र आजही संकटातच आहेत. वारंवार लागू होत असलेल्या कोविड निर्बंधांमुळे प्लॉटची मोडतोड, खंडित शूटिंग्ज शिवाय आजारी कलाकार, जाहिरातदारांचा आखडता हात अशा परिस्थितीत2021 च्या अखेरपर्यंत टीव्ही इंडस्ट्री पूर्वपदावर येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत इंडियन फिल्म अॅन्ड टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिलचे चेअरमन जे.डी.माजेठिया यांनी मालिकांचं वास्तव अधोरेखित केलं आहे. मराठी सिनेमा आणि टीव्ही मालिका निर्माण करणाऱया कंपन्या आणि निर्माते मात्र आपल्या जुन्याच दिवास्वप्नांमध्ये दंग असल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांची वर्तनपध्दती बदलली आहे आणि त्यांना सकस आशयाचं जगभराचं मनोरंजन कमी किंमतीत उपलब्ध आहे, हे वास्तव मराठी सिनेव्यवसाय कधी गंभीरपणे घेणार कोण जाणे?

ग्रंथालये

सार्वजनिक ग्रंथालये अमेरिकेने मार्च 2020 मधे बंद केल्यावर शाळा-महाविद्यालयांमधले विद्यार्थी आणि सर्व थरांतील अन्य वाचकांमधे नकारात्मकता पसरली. अभ्यास करण्यासाठी, इंटरनेट विनामूल्य सेवेचा उपयोग करण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी ते सगळेजण या ग्रंथालयांवर अवलंबून होते. मात्र ग्रंथलयकर्मचाऱयांनी त्यांना घरात बसून वापरण्यासाठी डाटाबेस उपलब्ध करून दिले. वाचकांना आपापसात चर्चा करण्यासाठी तंत्रसुविधा उपलब्ध करून दिल्या. ऑडिओ बुक्सची वाढती मागणी लक्षात घेऊन तशी खरेदी वाढवली. तथापि अमेरिकेसारख्या प्रगत देशात एक त़ृतीयांश ग्रामीण जनतेकडे आजही इंटरनेट कनेक्शन् आणि नेटवर्क नसल्याचं वास्तव समोर आलं. ज्यांचे उत्पन्न 30 हजार डॉलर्सपेक्षा कमी आहे, त्यातील 10 पैकी 4 लोकांकडे संगणक नाही आणि 10 पैकी 3 जणांकडे स्मार्ट फोन नसल्याचं ‘The Hunt Institute’ या आंतर्राष्ट्रीय संशोधन ग्रंथालयानं जाहीर केलं. ही असमानता सार्वजनिक ग्रंथालये संपूर्णपणे डिजिटल ग्रंथालयांमध्ये परिवर्तन होण्यापासून रोखणारी आहे, असंही आपल्या अहवालात ऊप्घ् ने म्हटलेलं आहे.

भारतातही कोविड आल्यावर अशीच परिस्थिती उद्भवली- शालेय, महाविद्यालयीन विद्यापीठांच्या आणि सार्वजनिक ग्रंथायांना हादरे बसले. सगळ्यात हाल झाले ते अल्प वेतनावर काम करणाऱया ग्रंथालय कर्मचाऱयांचे. पण आता कोविड-19 संपत आल्यावर भारतात ग्रंथालयांच्या दृष्टीने अनेक दिलासा देणाऱया गोष्टी घडत आहेत. कोविडच्या दुसऱया लाटेमुळे 10 मे 2021 रोजी पुन्हा बंद झालेली ग्रंथालये कोईम्बतूर परिक्षेत्रात जुलै 2021 पासून उघडण्यात आली आहे. आर.एस.पुरम जिल्हा मध्यवर्ती ग्रंथालयासह, जिह्यातील 245 शासकीय ग्रंथालयांमध्ये एका वेळी फक्त 100 लोकांना विभागवर प्रवेश देण्यात येत असला तरी वाचकांचा उत्तम प्रतिसाद या ग्रंथलयांना मिळू लागला आहे. मुझफ्फर नगर पोलिस डिपार्टमेंटने पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरूवातीला 1000 पुस्तके उपलब्ध करून देत सप्टेंबर 2021 पासून नवं ग्रंथालय सुरू केलंय. ही पुस्तकं, महत्त्वाची नियतकालिकं आणि वर्तमानपत्रं, पोलीसांना व त्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्रात 12 हजार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये असून तिथं 21 हजार कर्मचारी काम करतात. हे सगळे वर्षभर अनेक आर्थिक अडचणींनी मेटाकुटीला आले होते. पण 22 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने या ग्रंथलयांचं 2020-21चं मागील अनुदान रू. 37 कोटी 75 लाख 37 हजार 500 मंजूर केल्याचं जाहीर केलं आणि या ग्रंथालय कर्मचाऱयांनी आणि चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यातली अर्धी रक्कम, वेतनबाकी भागवण्यात खर्च होणार आहे, असं सांगून राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रामेश्वर पवार यांनी ग्रंथखरेदी, ग्रंथालय सुरक्षा इ.साठी आणखी अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे. शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. पण शालेय ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी पूर्वीसारखेच येतील का? त्यांना डिजिटल ग्रंथालये उपलब्ध करून द्यायचं संस्थाचालकांनी ठरवलं तर ती कशी वापरावी, याचं आधुनिक तंत्रप्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे का? टेक्स्ट बुक ऑडिओ बुक्समधे करून देण्याची काही योजना आहे का? आदी प्रश्न आहेतच.

राजकारण

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 रोजी 21 दिवसांसाठी पहिला लॉकडाऊन संपूर्ण देशभर लागू करत असल्याचं जाहीर केलं आणि कोविड-19 चं राजकारण सुरू झालं. सुमारे 100 दशलक्ष स्थलांतरीत मजुरांची, कामगारांची या लॉकडाऊनमुळे जी भीषण परवड झाली, त्याबद्दल केंद्र सरकारवर प्रखर टीका झाली. बीबीसीचे शो पत्रकार जुगल पुरोहित आणि अर्जुन परमार यांनी 240 माहितीच्या अधिकार अर्जाद्वारे मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यावर हे दाखवून दिलं की  लॉकडाऊन जाहीर करण्याआधी मा. मोदी यांनी आपल्या महत्त्वाच्या मंत्रीगटाशीही सल्लामसलत केली नव्हती. परिणामी आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आणि जगभरच्या प्रसिध्दी माध्यमांनी भारत सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. तत्कालिन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेली अतार्किक विधानं, खुद्द पंतप्रधानांनी कोविड योध्द्यांना सलामी देण्यासाठी थाळ्या वादन, घंटानाद आणि मेणबत्या पेटवण्याचं केलेलं आवाहन यावर समाजमाध्यमांतून सडकून टीका करण्यात आली. ज्या राज्यांमध्ये भाजपाची सरकारे नाहीत अशा सर्वांनी या गोंधळाचा आपापल्या पक्षांतर्फे पुरेपूर राजकीय फायदा घेतला.

जनतेसाठी दो गज दूरी, आत्मनिर्भरता, माझे कुटुंब- माझी जबाबदारी असा उपदेश करणाऱया सर्व राजकीय पक्षांनी जिथे जिथे निवडणुका लागल्या, तिथे तिथे मोठमोठ्या प्रचार मिरवणुका काढल्या, गर्दी जमवली, मास्क न लावता जाहीर सभांमधून भाषणं ठोकण्याची शेखी मिरवली आणि आपल्या या उक्ती व कृती यातील विसंगतीमुळे ते जनतेच्या रोषास पात्र ठरले. महाराष्ट्रातही रूग्णांच्या  आकड्यांची दडवा-दडवी, पालघर इस्पितळ आग प्रकरण, नाशिकच्या रुग्णालयांत प्राणवायू गळती होऊन झालेले मृत्यू, लसीकरण, रेमदेसिवर पुरवठा इत्यादी गोष्टींवरून राजकारण करण्यात आले. आपल्या जीडीपी उत्पन्नाच्या फक्त 0.5 टक्केएवढीच अत्यल्प रक्कम महाराष्ट्र सरकारने आरोग्य यंत्रणेवर राखून ठेवली होती, हे कटु सत्य उघड झाले. नवी मुंबई विमानतळाला कुणाचं नाव गाव, हे प्रकरण तापवण्यात आलं आणि हजारो लोकांची रॅली काढण्यात आली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सज्जड दम भरला आणि कोविड-19 प्रोटोकॉल्सची अंमलबजावणी करण्यात यापुढे कुचराई झाली तर गंभीर परिणामांना तयार रहा, अशा शब्दांत समज दिली.

तथापि एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण करत, कोविड-19 हाताळतांना देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जी अंतर्गत समजदारी दाखवली, त्याबद्दल तटस्थ विश्लेषकांनी त्यांचं कौतुक केलं. कोविड-19 नतरचं देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कोणती वळणे होईल, याबाबत आताच काही सांगणे  योग्य ठरणार नाही. तथापि यापुढच्या लोकसभा, विधानसभा, नगरपरिषदा, जिलहा परिषदा आणि अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधे कोविड-19 व्यवस्थापनात झालेल्या एकमेकांच्या चुकांवरून प्रचारात हाणामाऱया होणार, यात शंका नाही. यापुढे राजकारण करतांना कुठल्याही पक्षाला जनआरोग्य या मुद्द्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. तसे न करता, राजकीय पक्ष पुन्हा ये रे माझ्या मागल्या करत राहिले तर जी आरोग्य यादवी होईल, ती महामारी एकढीच भीषण असेल.

— डॉ. महेश केळुसकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..