शालिवाहन शके १५७७ पौष महिन्यात शिवरायांनी जावळी काबीज केली. पाठोपाठ फतेहखानाचा पराभव केला त्यामुळे विजापूर दरबाराच्या पायाखालची वाळू सरकली. शहाजीराजांना पत्र लिहून शिवाजीचे बंदोबस्त करण्यास कळविले पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही.
शिवराजांचा विजयरथ चौखूर उधळतच होता. त्यामुळे आता शिवाजीला रोखलाच पाहिजे असे आवाहन केले की, कोण रोखेल या शिवाजीला..? पण कोणीच तयार होईना.. तेवढ्यात एक सरदार उठला आणि बोलला “मै….! मै लाऊंगा.. शिवाजीको.. ! जिंदा या मुर्दा …!” सारा दरबार सुन्न झाला.., त्याचे नाव “अफझलखान” खरेतर ‘अफझल’ ही पदवी आहे त्याचे खरे नाव होते ‘अब्दुल्लाखान भटारी’
मोठ्या मोहिमेवर जात आहोत म्हणून खान आपल्या गुरूच्या भेटीस गेला. त्यावेळेस त्याला सांगितले की या मोहिमेत तुझ्या जीवाला धोका आहे. गुरूवर पूर्ण विश्वास असल्याने अब्दुल्लाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण आता काय उपयोग भर दरबारात विडा उचलला आहे त्यामुळे माघार घेणे अशक्यच त्यात जोडीला फाजील आत्मविश्वास..!
आपल्या बायकांनी आपल्या मागे व्यभिचार करू नये म्हणून आपल्या सर्वच (त्रेसष्ठ) बिब्यांना सुरुंग बावडीत ढकलून मारल्या व त्यांचे दफन केले. (आजही आपणास विजापूर जवळील तोरवे सध्याचे अफझलपुर येथे आपणास चौसष्ठ कबरी पहावयास मिळतील ; यातील एक कबर त्याच्या बहिणीची आहे) आणि सज्ज आला सह्याद्रीच्या सिंहाच्या शिकारीला पण नियातीलाच माहिती शिकार कोण होणार ते..आणि सोबत कोण होते तर … प्रत्यक्ष शिवरायांचे चुलते मंबाजीराजे भोसले व अनेक मातब्बर मराठा सरदार..कोण हे महाराष्ट्राचे दुर्दैव.! कुर्हाडीचा दांडा गोतास काळ…
खानाने विजापूर सोडले, डोण नदीला डावे घालून पंढरपूर, माणकेश्वर, करकंभोस, राहमतपुर मार्गे वाईस निघाला.येताना तुळजापूर येथे उपद्रव केला.. तुळजा भवानी फोडली..! बस्स ..! अर्धा खान येथेच संपला…!! .
खान सोळा वर्षे वाईला सुभेदार होता त्यामुळे त्याची छावणी वाईलाच पडणार याची महाराजांना पूर्ण अटकळ होती. परंतु मोकळ्या मैदानावर खानास भिडने म्हणजे निव्वळ आत्मघात होता. कारण खान साधा सुद्धा आलेला नव्हता. दहा हजारांचे घोडदळ, तितकेच पायदळ, शंभर हत्ती, शेकडो उंट – बैल त्याखेरीज भला जंगी तोफखाना सोबत कुऱ्हाडे, बेलदार. शिवराय विजापुराहून फर्मान घेऊन आपल्याच स्वराज्यातून फुटून गेलेले कित्येक देशमुख, सरदार…आणि आपल्याजवळ काय आहे …? सारे पोरदळ .! पण अत्यंत विश्वासू, जीवाला जीव देणारे आणि सोबतीला सह्याद्री…
आता खानाच्या खबरा घ्यायला स्वराज्याचे हेर चौखूर उधळले. राजांच्या मनात एक – एक विचार घुमू लागले, कारण हाच तो खान ज्याने दाजीसाहेब महाराजांना (शहाजीराजे) जिंजीच्या छावणीत बेसावध निद्राधीन असताना पकडले आणि त्याच्या हातापायात बेड्या घालून विजपुरातून धिंड काढली. हाच तो उन्मत्त अफझल ज्यांने आमच्या दादामहाराज संभाजी राजांचा कनकगिरीच्या वेढ्यात वध करवीला. याच विचारांनी राजांनी राजगड सोडला आणि प्रतापगडाची दौड सुरु केली.
संकटे यायला लागली तर एकटी येत नसतात. पावसाच्या सरींबरोबर खानाच्या अत्याचाराच्या बातम्या येऊन थडकत होत्या. खान देवळे फोडीत येत होता, राजांचे खासे मेहुणे बजाजी निंबाळकर यांना कैद केली. त्यांच्या गळ्यात साखळदंड बांधला आणि त्यांना सक्तीने मुसलमान करण्याचा घाट बांधला आणि ते न मानल्यास हत्तीच्या पायी देण्याचा निश्चय केला होता. जेणेकरून शिवाजी डोंगरी किल्ल्यातून बाहेर पडेल आणि आपल्यावर चालून येईल. म्हणजे मोकळ्या मैदानावर चिमूटभर सैन्याचा चुराडा उडविणे सोपे होते.
काय अवस्था झाली असेल सह्याद्रीचा सिहांची, अगदी बेचैन ! थोरल्या राणीसाहेब सईबाई अंथरुणाला खिळलेल्या आणि आपल्यामूळे त्यांच्या भावावर संकट..! काय वाटले असेल सईबाईंचे मनाला ? पण त्याही तितक्याच खंबीर शेवटी भोसले कुळाची सून….. विस्तावाबरोबर संसार मांडायचा म्हणजे चटके तर लागणारच ! पण यातूनही शिवरायांनी मार्ग काढलाच. राजांचा विवेक शाबूत होता ! तो सतत खुणावत होता जरा थांब… !!
खलबत खान्यात नेताजी, बाजी, फुलाजी, तानाजी, येसाजी, बहिर्जी, मोरोपंत, कान्होजी जेधे वगैरे खासे मंडळी जमा झाली होती. सर्वांचा विचार सुरू होता खानाचा सामना करावा तर कैसा..?आणि एकमत झाले की सला (तह) करावा. आणि म्हणूनच मी म्हणतो जिथे आपली विचारधारा थांबते, तिथून शिवराय सुरु होतात. राजे म्हणाले “आपला कुल फौज लष्कर मुस्तेद करावे आणि खानाशी जावळीस गाठून युद्ध करावे”
कारण शिवबा खानाला पूर्ण ओळखून होते. मोजक्या व अचूक शब्दांत खान सांगून टाकला.. खानाने संभाजी राजांस मारिले, कस्तुरीरंगास मारले ! तैसे आम्हास मारिल म्हणोन सला करणे नाही !!युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू, याशिवाय स्वराज्य साधणे शक्य नाही……
— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग
क्रमशः ……
लवकरच पुढचा भाग ….
लेख साभार : नितीन बानगुडे सर यांच्या व्याख्यानावरून
स्फुर्तीस्थान – महाराष्ट्रभूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
॥ जय भवानी जय शिवाजी ॥
Leave a Reply