आमच्या कडे स्वयंपाक करणाऱ्या छाया ताईंच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला परवा गेले होते. खूप वर्षांनी त्यांच्या घरात शुभ कार्य होणार होतं याचा एकूण आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
आपल्याकडे ज्या पद्धतीने लग्न समारंभ होतो त्याची सवय आपल्याला असते. पण छाया ताईंच्या घरच्या कार्याला जाण्याची माझी पहिलीच वेळ. पत्रिका पद्धत त्यांच्यात नसावी मात्र मुहूर्ताची वेळ सांगून मुहूर्ताला नक्की या असं छाया ताईंनी आवर्जून सांगितलं होतं . त्याप्रमाणे मी पोहोचले.
गर्दी बघून खरंतर छान वाटत होतं. एरवी गर्दी पासून लांब पळणारी मी पण आज गर्दीत जाऊन बसायला बरं वाटत होतं . हे दोन वर्षांचे निर्बंध संपुष्टात येऊन लोकं एकत्र येतायत, तेही मास्क शिवाय हे खरोखर विशेष आहे.
छाया ताईंची मुलगी श्रुती मला तिथे पोचताच प्रथम भेटली, ” अय्या, गौरी ताई तुम्ही आलात” ..हे म्हणतानाचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. कदाचित आमच्या पैकी कुणी येणार नाही असं त्यांना वाटलं असावं म्हणून का काय पण तिला झालेला आनंद माझ्यापर्यंत पोहोचला.
छाया ताई पलीकडच्या खोलीत आहेत असं कळल्यावर त्यांना शोधत तिकडे गेले. तिथेही त्या दिसल्या नाहीत. अजून कुणी ओळखीचं दिसेना. बसायला जागा दिसेना. तेवढ्यात माझं लक्ष गेलं , एक लहान मुलगी डबल खुर्चीवर बसलेली. तिच्या शेजारी तिच्याच घरचे असावे. मी त्यांना म्हणाले,” यातली एक खुर्ची घेऊ का बसायला”.. त्यावर त्यांचं निरागस उत्तर ऐकून मला हसू आलं ,” आमचे पावने येत्यात म्हनून खुर्च्या पकडून ठेवल्या हायेत”.. अगदी आहे तसं सरळ उत्तर ..आणि त्यांचं बरोबरच होतं ..पाहुणे लांबून येणार असतील तर आल्यावर जागा पाहिजे बसायला. मी अगदी नम्रपणे म्हटलं,” थोडा वेळ बसू का? तुमचे पाहुणे आले कि सांगा, लगेच उठते”…
त्या अटीवर का काय पण मला एक खुर्ची मिळाली..आणि अर्थातच, त्यांनी मला खुर्ची वरून उठवलं नाही..तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्यात नक्की होता.
लग्न लागल्यावर एकीकडे mic वर घोषणा झाली. साधरणतः acoustics चांगले नसले कि जसा आवाज घुमतो तसा त्या बोलणाऱ्या माणसाचा आवाज घुमत होता. पण मनुष्य प्राणी हा बहुदा जेवणासाठीच जगतो. जेवणाची भाषा त्याला नक्की समजते त्यामुळे ‘ जेवण तयार आहे’ ची घोषणा आहे हे बंधू भगिनींनी ओळखलं आणि त्या हॉल मधली ऐंशी टक्के गर्दी जेवायला गेली.
आपल्याकडे जरी अशी घोषणा झाली तरी आपण स्वतःला इतके posh आणि sophisticated समजत असतो कि ” असं लगेच कसं जायचं जेवायला, बरं दिसतं का’ असं म्हणून थोडा टाईमपास करून मग जेवायला जातो..
खरं तर किती सोपं , भुकेची वेळ आहे , जेवण तयार आहे कळलं, जेवावं …या लग्नाला आलेल्या बहुतेक मंडळींपैकी बहुतांश हातावर पोट असलेली लोकं असणार. कदाचित सकाळी लौकर घर सोडलं असावं ..अर्थातच जेवायच्या वेळेला जेवण मिळणं हि गरज असते त्यांची हे समजून घ्यायला हवं .
मी सुद्धा so called sophisticated जमातीतली असल्यामुळे लगेच जेवायला गेले नाही. छाया ताईंना भेटले, त्यांना म्हटलं नवरी मुलीसाठी आणलेली भेट तिला द्यायची आहे ,कधी भेटू शकते तिला” हे ऐकताच …छाया ताईने एखाद्या लढवय्या स्त्री प्रमाणे माझा हात घट्ट पकडला. ओढतच त्या मला stage पाशी घेऊन गेल्या. नवऱ्या मुलाच्या ऑफिस मधली लोकं त्यांना भेटत होती . मी छाया ताईंना थांबवत म्हटलं मला काहीही घाई नाही, असं मधून नको जायला. यावर,” अहो ताई, यांचं सुरूच राहील आणि तुम्ही मागे रहाल..या वरती..चालतं आमच्याकडे. “..मला कुठे बघू कुठे नको असं झालं . पण अखेर , फुल्ल आत्मविश्वासानिशी , आयुष्यात पहिल्यांदा स्टेज च्या पुढल्या बाजूने , नवरा नवरी च्या डोळ्या समोरून चढून येऊन त्यांना भेटले. मी वर येताच छाया ताईंनी जोरात आवाज दिला, या आमच्या गौरी ताई.. त्या नवरदेवाच्या ऑफिस ची मंडळी सुद्धा मागे सरकली. त्यांना वाटलं असावं ही कुणीतरी बडी व्यक्ती दिसत्ये.
तेवढ्यात छाया ताई पुन्हा मोठ्यांदा फोटोग्राफर ला म्हणाल्या ,” ओ दादा , आमच्या गौरी ताईंसोबत घ्या कि फोटो,” असं करत आमचे फोटो काढले गेले आणि अखेर मी तिथून खाली आले.
आपल्या कडे जरा line मोडून कुणी पुढे गेलं , कि आपण डोळे वटारतो पण मी अशी मधेच स्टेज वर चढून , line मोडून वरती गेल्याचं तिथे कुणाला काहीही वाटलं नाही.
तेवढ्यात चंदा ताई आल्या,..चंदा ताई सुद्धा आमच्याकडे गेली काही वर्ष काम करतायत. छाया ताईंनी हुकूम काढला, ” चंदा, गौरी ताई व्यवस्थित जेवतायत का नाही याकडे लक्ष देणं तुझी जबाबदारी बरं का!” असं करत आम्ही जेवायला म्हणून गेलो. तिथे साधारण ३०० मीटर इतकी मोठी रांग होती. आम्ही रांगेत उभे राहिलो. तेवढ्यातल्या तेवढ्यातही छाया ताईंच्या बहिणी आपणहून बोलायला आल्या, सावकाश जेवा सांगून गेल्या. माझी अशी त्यांच्याशी फार ओळख नाही ,पण केवळ छाया काम करते त्या गौरी ताई आल्या आहेत एवढं एक कारण त्यांच्यासाठी आनंद व्हायला पुरे होतं .
रिकाम्या खुर्च्या दिसल्या तिथे आम्ही जेवायला बसलो. आजूबाजूला सहज नजर गेली. सगळ्या माणसांना पुरतील एवढ्या खुर्च्या तिथे नव्हत्या .जेवण buffet पद्धतीने दिलं जात होतं . बसायला जागा नाही म्हणून आपण काय करू? एखादा कोपरा पकडून तिथेच उभ्या उभ्या जेवू. इथे मात्र, व्यवस्थित जरी काठच्या साड्या नेसलेल्या बायका, चांगले चुंगले कपडे घातलेले पुरुष, लहान मुलं सगळी जागा दिसेल तिथे चक्क मांडी घालून खाली बसून आरामात जेवत होते.
मी खुर्चीवर बसलेले तरी मला कुठेतरी माझं हसू आलं . हे आपल्याला का नाही बुवा जमत? हे कसलं आपलं फोल पुढारलेपण?ती सगळी मांडी घालून जेवणारी लोकं मला कितीतरी जास्त सुसंस्कृत आणि पुढारलेली वाटली. मला इतकी खात्री आहे कि खुर्ची मिळली नाही म्हणून मी जरी मांडी ठोकून खाली बसले असते जेवायला तरी त्यांना काहीही वाटलं नसतं . अशा ठिकाणी गेलं ना कि आपला एक कृत्रिम माज गळून पडतो आपोआप. आपल्याला वाटतं आपण खूप शिकलो म्हणजे आपण forward.
पण एक काय, दहा पावलं forward मला हि सगळी मंडळी वाटली. आमची जेवणं झाल्यावर छाया ताईंनी पुन्हा “मी व्यवस्थित जेवले का याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांचे आई वडील , गावाकडची बहीण ,तिचा नवरा, काका- काकू अशा सगळ्यांशी भेट घालून दिली. खरं तर या कुणाशीही माझ्याशी ओळख करून देण्याची गरज होती का? तर नाही.. पण ज्या सगळ्यांबद्दल गौरी ताईंशी आपण बोलत असतो ते सगळे आज हजर आहेत. तेव्हा आपण गाठ घालून दिली पाहिजे हि निरागस भावना त्यात होती.
छाया ताईचा मोठा मुलगा अशोक हा special child आहे, वेगळ्या भाषेत सांगायचं तर मतिमंद, पण व्यवस्थित स्वत: च स्वतः सगळं करू शकणार अतिशय प्रेमळ व हुशार मुलगा आहे. छाया ताईंकडे घरी अनेकदा जाणं झाल्यामुळे अशोक मला व्यवस्थित ओळखतो. “अशोक, बघ कोण आलंय”, असा आवाज दिल्याबरोबर ,तो आनंदाने धावत येऊन मिठी मारून मला भेटला..त्याची वाचा स्पष्ट नाही ,पण आपण बोललेलं त्याला सगळं समजतं . अशोक ने इतकी मनापासून माझी भेट घेतली कि क्षणभर माझे डोळे आनंदाने पाणावले. या दरम्यान ज्यांना ज्यांना म्हणून भेटले त्या सगळ्यांकडून अगत्य काय असतं हे शिकता आलं.
याही लग्नात फोटो व्हिडीओ सगळं होत होतं ..म्हणून अगत्य कमी झालेलं नव्हतं ..आमच्या कार्याला तुम्ही वेळ काढून आलात याचा निस्सीम आनंद सर्वांना झालेला, आणि महत्वाचं म्हणजे माझ्यापर्यंत तो पोहोचवायला ते विसरले नाहीत.
हे खरं अगत्य!
गौरी सचिन पावगी
Image source: google
Leave a Reply