कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म ५ जानेवारी १८९२ रोजी इस्लामपूर म्हणजे आत्ताच्या सांगली जिल्ह्यात झाला. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ओंड हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांच्या घराची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये वारंवार अडथळे येत होते. परंतु त्यांचे शिक्षण मात्र निगडी, फलटण , नाशिक , कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांना अनेकजणांनी आधार आणि आश्रय दिला. ते १९११ मध्ये मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास होऊ शकले कारण त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांचे पुढील महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालय , कोल्हापूर आणि फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे झाले.
कृ . पा. कुलकर्णी यांना पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. पुढच्याच वर्षी त्यांना धुळे येथे जावे लागले कारण तेथे त्यांना सरकारी शाळेत नोकरी मिळाली. काही काळाने त्यांना सातारा येथे बढती मिळाली. साताऱ्यामध्ये असताना त्यांनी नोकरी करत असतानाच एम. ए . चा अभ्यास केला. त्यांना एम. ए . ची पदवी मिळाल्यानंतर ते मुंबईला गेले आणि शिक्षण खात्यासाठी आवश्यक असणारी बी. टी . ची पदवी मिळवली. १९२० च्या सुमारास त्यांना अहमदाबाद येथील गुजराथ महाविद्यालयामध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. १९२९ साली रियासतकार गो. स. सरदेसाई यांचे ते मदतनीस झाले आणि ते त्यानंतर इतिहास संशोधनाकडे वळले. हे संशोधन करण्यापूर्वीच साहित्यिक आणि भाषाशास्त्रज्ञ म्हणून ओळख झालेली होती. १९२५ साली त्यांचा ‘ भाषाशास्त्रज्ञ व मराठी भाषा ‘ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक आणि संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘ संस्कृत नाटक व नाटककार ‘ या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. १९३३ मध्ये पेशवे दफ्तराचे काम संपल्यानंतर पुन्हा ते अध्यापनाकडे वळले. मुंबई येथील एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये त्यांची खास नेमणूक झाली. १९३७ ते १९४९ अशी बारा वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते ५८ व्या वर्षी शासकीय सेवेमधून निवृत्त झाले. त्यानंतरही त्यांनी मुलुंड येथील टोपीवाला माहाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आणि त्यांनी १९५९ मध्ये पूर्ण निवृत्ती स्वीकारली. त्यांचे महाविद्यालयीन अध्यापन चालू असताना त्यांचे व्याकरण , समीक्षा , संशोधन , भाषाशास्त्र इत्यादी क्षेत्रामध्ये त्याचे मोठे; नाव तर झालेच होते परंतु मराठीमधील दीपस्तंभ ठरावा असे त्यांचे महत्वाचे काम म्हणजे ‘ व्युत्पतीकोश ‘ हे होय . ह्या कोशामुळे हजारो मराठी शब्दांची व्युत्पत्ती आणि अर्थ लोकांना कळला हे महत्वाचे. आजही त्यांचा ‘ मराठी व्युत्पतीकोश ‘ या क्षेत्रांमधील पायभूत ग्रंथ मानला जातो . या कामामुळे त्यांना ‘ मराठी भाषेमधील पाणिनी ‘ असे समजले जाते. कृ . पा . कुलकर्णी यांनी ऐतिहासिक पत्रव्यवहार , वाग्यज्ञ , कृष्णाकाठची माती , मुकुंदराजाचा विवेकसिंधू , महाराष्ट्र गाथा , जी.एफ. म्यूरच्या द बर्थ ॲन्ड ग्रोथ ऑफ रिलिजन ह्या ग्रंथाचे भाषांतर त्यांनी धर्म : उद्गम आणि विकास ह्या नावाने केले आहे संस्कृत ड्रामा ॲन्ड ड्रॅमॅटिस्ट्स ( इंग्रजी ) , पेशवे दप्तराचे ४५ खंड (सहसंपादक) हे त्यांचे ग्रंथ खूप गाजले. त्यांनी ‘ कृष्णाकाठची माती ‘ ह्या त्यांच्या आत्मचरित्रामध्येआपले विचार प्रांजळपणे ;कथन केले आहेत. मराठी साहित्याच्या समृद्धीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. १९५२ साली अंमळनेर येथे झालेल्या ३५ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी भाषिक प्रांत रचनेचा जोरदार पुरस्कार केला. त्यांनी आचार्य अत्रे यांनी समकालीन लेखकांवर टीका केली मात्र कृ . पा . कुलकर्णी यांचा ज्ञानाचा अधिकार आचार्य अत्रे यांनी मान्य केला होता.
मराठी विश्वकोशामध्ये फारच थोड्या व्यक्तीवर नोंद आहे त्यामध्ये कृ . पा. कुलकर्णी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या नावाची नोंद विश्वचरित्र कोषामध्येही आहे. कृ . पा. कुलकर्णी हे मराठी भाषेमधील व्यूत्पत्ती शास्त्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे मराठीमधील अग्रगण्य समीक्षक म्हणूनही ओळखले जातात.
मराठी भाषेमध्ये मोलाचे योगदान देणारे कृ . पा. कुलकर्णी यांचे १२ जून १९६४ रोजी निधन झाले.
सतीश चाफेकर.
कृष्णाकाठची माती पुस्तक पाहीजे
लेखक कृ.पा.कुलकर्णी
रा.ओंड तालुका कराड जि.सातारा
मला माझ्या गावातील वाचनालयात पुस्तक ठेवायचे आहे
कोठे मिळेल पत्ता द्यावा प्रकाशकाचा पत्ता द्या धन्यवाद