व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात दिनकर रायकर यांनी लिहिलेला लेख.
२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.
आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.
या घटनेला आज ४५ वर्षे होऊन गेली. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. या चार तपांच्या कालावधीत वृत्तपत्रांचा चेहरामोहरा बदलला. रंगरूप बदलले. नवीन कल्पना पुढे आल्या, फक्त बातम्या देण्यासाठी सुरू झालेली वृत्तपत्रे वाचकांच्या घरात डोकावू लागली. त्यांना सकाळी उठल्यानंतर योगासनापासून ते रात्री झोपेपर्यंत काय करावे आणि काय करू नये याची माहिती ती देऊ लागली. मात्र या सगळ्यांत एकाच गोष्टीत बदल झाला नाही ती गोष्ट म्हणजे ‘अग्रलेख’…! त्याचे कारण एकच, अग्रलेख हा वृत्तपत्राचा आत्मा असतो, तो त्या त्या वृत्तपत्राचा चेहरा असतो. म्हणून त्यात आजतागायत काहीही बदल झाला नाही. जर अग्रलेखच बाजूला ठेवला गेला असता तर वृत्तपत्राचा आत्माच हरवला असता. चेहरा लोप पावला असता. पण ते झाले नाही. एवढी ताकद त्या एका जागेमध्ये होती, आहे आणि कायम राहील…!
६ जानेवारी १८३२ या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ या नावाने सुरू केले. मराठी वृत्तपत्राचे जांभेकर हे जनक. त्यांनी अग्रलेखांना वाचकांपर्यंत नेण्याचे काम केले. त्याआधीही इंग्रजी वृत्तपत्रे निघतच होती. त्यातही अग्रलेख असायचे. मात्र मराठी अग्रलेखांची चर्चा सुरू झाली ती बाळ गंगाधर अर्थात लोकमान्य टिळकांपासून इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या वातावरणात देखील ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय…?’ असा जहाल सवाल टिळकांनी जवळपास १०० वर्षापूर्वी अग्रलेखाच्या मथळ्यातून केला होता. त्यावेळी असणारी परिस्थिती डोळ्यापुढे आणली तर असा मथळा देऊन अग्रलेख लिहिण्याचे धाडस किती अलौकिक होते हे लक्षात येते. त्याचाच पगडा मराठी वृत्तपत्रसृष्टीत कायम राहिला. आजही अनेक वृत्तपत्रांना या मथळ्याचा मोह टाळता येत नाही, एवढी त्या शब्दांमध्ये धमक होती, धार होती. (आज काही जिल्हा वृत्तपत्रे देखील अमेरिकेच्या सरकारचे डोळे ठिकाणावर आहे का? असे मथळे देऊन अग्रलेख लिहितात ही गोष्ट अलहिदा !)
जांभेकर, टिळक यांची हीच परंपरा तेवढ्याच धाडसीपणाने व जोमाने पुढे नेण्याचे काम केले ते गोपाळ गणेश आगरकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी. ह. रा. महाजनी, र. ना. लाटे यांनीही अग्रलेखांच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख तयार केली. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीच्या काळात लाटे यांनी ‘मतदार राजा जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे’ असे मथळे देत लिहिलेले अग्रलेख आजही स्मरणात आहेत. ह. रा. महाजनी हे रॉयवादी. त्यांनी एक विशिष्ठ भूमिका घेऊन आपले अग्रलेख लिहिले व त्यावेळच्या राजकारणाचे मोजमाप केले. त्याचकाळात या परंपरेला आणखी लौकिक मिळवून देण्याचे व अग्रलेखांना लोकप्रिय करण्याचे काम केले ते आचार्य प्रल्हाद केशव उर्फ प्र. के. अत्रे यांनी अत्यंत बोचऱ्या शैलीत त्यांनी अग्रलेखांतून अनेकांचे कपडे उतरविले. मात्र अग्रलेखांतून केवळ टीका न करता विधायक भूमिकाही घेण्याचे काम अत्रे यांनी सुरू केले. ज्याची परिणीती संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहायला मिळाली. या लढ्याच्या यशात त्यांच्या अग्रलेखांचा मोठा वाटा होता.
त्याच कालखंडात अग्रलेखांच्या जगात एक नवे पर्व सुरू केले प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रखर सुधारणावादी वृत्तीच्या प्रबोधनकारांनी आपल्या अग्रलेखांतून समाजातल्या थोतांडाविरुध्द परखड भाष्य करण्याचे काम केले. त्यानंतर काही वर्षांनी अग्रलेखाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी छाप पाडण्याचे काम केले गोविंद तळवळकर यांनी आपले वृत्तपत्र आपल्या अग्रलेखासाठी वाचले जाते अशी ताठर भूमिकाही त्यांनी अनेकदा घेतली. इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत त्यांची उठबस होती. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार हेही कायम गोविंदरावांच्या संपर्कात असायचे. त्यामुळे अनेकदा गोविंदराव जे काही लिहायचे ते यशवंतराव किंवा शरद पवार यांची भूमिका तर ते मांडत नसावेत ना, असेही गमतीने बोलले जायचे. पवारांच्या पुलोद शासन निर्मितीत त्यांच्या अग्रलेखांचा महत्त्वाचा वाटा होता.
ज्यावेळी गोविंदराव ‘महाराष्ट्र टाईम्स’मधून अग्रलेख लिहून राज्यात राजकीय वारे फिरवत असायचे त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात पुण्यातून ‘सकाळ’च्या अग्रलेखातून नानासाहेब परुळेकर यांनी लोकाभिमुख भूमिका मांडण्याचे काम केले. तर विदर्भात नागपूरमध्ये ‘लोकमत’च्या माध्यमातून पां. वा. गाडगीळ तर मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेतून ‘मराठवाडा’ दैनिकातून अनंत भालेराव आणि ‘लोकमत’मधून म.य. उर्फ बाबा दळवी यांनी त्या त्या भागातले प्रश्न अग्रलेखाच्या माध्यमातून ऐरणीवर घेतले होते. अनंतरावांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधी भूमिका घेतली होती तर त्याचवेळी बाबा दळवी यांनी मराठवाडा नामांतराच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती. या दोन्ही भूमिका त्या काळात राज्यभर गाजल्या. एकाच शहरातून निघणाऱ्या दोन वृत्तपत्राच्या दोन अग्रलेखांमधून अशा दोन भूमिका वाचकांना मिळत होत्या. अग्रलेखांचीही स्पर्धा होऊ शकते हे त्या काळाने दाखवून दिले होते.
ही सगळी पार्श्वभूमी असताना प्रबोधनकारांचा वारसा चालवत बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’ची स्थापना केली आणि अग्रलेखांचे एक नवे पर्व महाराष्ट्रात उदयाला आले. आपण जाहीर सभांमधून जसे बोलतो तसेच अग्रलेखातूनही व्यक्त होण्याचे काम बाळासाहेबांनी केले. अत्यंत शेलक्या शब्दात, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता त्यांनी आपल्या अग्रलेखातून अनेकांचे वस्त्रहरण केले. त्या काळात ‘सामना’चे अग्रलेख वाचणे ही पर्वणीही असायची आणि करमणूकही. अग्रलेखातून ठाकरे यांनी कायम प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली आणि त्याच्या सहाय्याने राज्यात पाच वर्षे भाजपा शिवसेना युतीचे सरकारही आणले.
बाळासाहेबांनी त्यावेळी अशोक पडबिद्री या समाजवादी व्यक्तिमत्वाला स्वतःच्या पंखाखाली घेतले. त्यांनी देखील काही काही काळ ‘सामना’चे अग्रलेख लिहिले. तर मुंबईत ‘नवाकाळ’च्या माध्यमातून नीळकंठ खाडीलकर यांनी ‘अग्रलेखांचे बादशहा’ अशी स्वतःच स्वत:ला उपाधी देत अग्रलेखांना संपादकीय पानावरून पहिल्या पानावर आणले. एरवी अन्य दैनिके एखादी विशेष घटना घडली तरच अग्रलेखाला पहिल्या पानावर आणायचे. मात्र निळूभाऊंनी स्वतःच्या वृत्तपत्रात अग्रलेखांना कायम पहिले पानच दिले.
त्याचसुमारास ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून माधव गडकरी व त्यांच्यानंतर अरुण टिकेकर यांनी अग्रलेखांद्वारे स्वतःची वेगळी ओळख महाराष्ट्रभर निर्माण केली. पुढे ती जागा ‘महाराष्ट्र टाईम्स’ मधून आलेल्या कुमार केतकरांनी घेतली. त्यांनी आधी ‘मटा’मध्ये आणीबाणीचे समर्थन करणारी भूमिका घेत अग्रलेख लिहिले होते. आज वयाच्या ७५ व्या वर्षी देखील ‘लोकमत’च्या माध्यमातून सुरेश द्वादशीवार यांनी अग्रलेखाच्या सहाय्याने आपल्या लेखणीची धार तळपत ठेवली आहे.
काळ बदलत गेला. अग्रलेखांच्या सहाय्याने सरकारे बदलली. राजकारण बदलले, माणसं बदलली, मात्र हळूहळू इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे आगमन झाले, सोशल मीडियाचा विळखा समाजमनाला पडला, तसे वाचनाची वृत्ती कमी होत गेली. अग्रलेख किती टक्के लोक वाचतात अशी ही चर्चा आता सुरू झाली.
आज अग्रलेखांचे महत्त्व किती, वाचक किती हे प्रश्न जरी सर्रासपणे चर्चिले जात असले तरी वृत्तपत्राच्या १८६ वर्षांच्या इतिहासात गेल्या काही काळात रविवारच्या वृत्तपत्रांमधून अग्रलेख हद्दपार झाले… काळाचा महिमा याहून दुसरा काय असू शकतो…?
व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात दिनकर रायकर यांनी लिहिलेला लेख.
— दिनकर रायकर
Leave a Reply