नवीन लेखन...

सुगंधी शेती !

Agriculture with a Fragrance

ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्व जगात हवामानाचे अंदाज चुकत आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा असे आपल्याला दरवर्षी अनुभवास येते. आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यावर मात करण्यासाठी पारंपारिक शेती सोडून काही नवीन मार्ग शेतकरी बंधू शोधू लागले आणि त्यात त्यांना यश येऊन त्यांनी सुगंधी तेल मिळणाऱ्या गवताची शेती करण्यास सुरवात केली आणि त्यात त्यांना चांगले यशही मिळत आहे. त्याबद्दल थोडेसे..!

पारंपरिक पिकांच्या लागवडीमुळे दिवसेंदिवस उत्पादनात घट होत आहे. जमिनीचा पोतदेखील खालावत असून पीक लागवड पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे, अन्यथा शेती म्हणजे घाट्याचा सौदा असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आर.आर.एल सीएन-५ या सुगंधित गवताच्या प्रजातीची लागवडप्रकल्प विदर्भात प्रथमच नागपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोंढाळी, कालडोंगरी, परसोडी येथील तीन शेतकऱ्यांनी सुगंधित गवताची लागवड केली. डोंगराळ, खडकाळ, पडीक जमिनीवरदेखील या गवताची लागवड करणे शक्‍य असून इतर पिकांच्या तुलनेत पाणीदेखील फार कमी प्रमाणात लागते. या गवताचा प्रतिएकर लागवड खर्च पाच ते सहा हजार रुपये असून, एकरी २० टन उत्पादन घेणे शक्‍य आहे. यातून ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. एकदा लागवड केलेल्या गवतांपासून वर्षभरात चारदा उत्पादन घेता येते. २० टन गवतापासून १२० किलो तेलाचे उत्पादन आणि त्यातून १ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या गवतापासून उत्पादित झालेल्या तेलाची जम्मू येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आल्यानंतर त्यात उपलब्ध रासायनिक घटकाप्रमाणे या तेलाला किमान एक हजार रुपये दर मिळेल, असे प्रकल्प प्रमुखांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांनी गट तयार करून २० ते २५ एकरावर या गवताची लागवड केल्यास कृषी विभाग किंवा सरकारी यंत्रणेकडून तेल काढण्याची मशीन बसवून देता येऊ शकते. तसेच शेतकऱ्यांकडून दोन हजार रुपये प्रतिटन प्रमाणे हे सुगंधी गवत विकत घेतले जाण्याची शक्यता आहे. इतर पिकांच्या तुलनेत लागवड खर्च कमी असून पाणीदेखील कमी लागते.

सुगंधी गवतात जावा सिट्रोनेला ही गवतवर्गीय बहुवर्षीय सुगंधी वनस्पती आहे. जावा सिट्रोनेला तेलामध्ये सिट्रोनेलॉल २५ ते ४५ टक्के, जिरेनिऑल १२ ते ३४ टक्के हे रासायनिक घटक आहेत. पानांमध्ये ०.९ ते १.२ टक्के तेलाचे प्रमाण असते. कापलेले गवत १२ ते १४ तास सावलीत ठेवावे, त्यानंतर पानांचे बारीक तुकडे करून आसवन यंत्राच्या टाकीत भरतात. बॉयलरमधील पाण्याची वाफ आसवन यंत्राच्या टाकीत जाते. या वाफेमुळे गवतातील पानांच्या तेलाची वाफ होऊन ती पाण्याच्या वाफेत मिसळते. त्या नंतर ही वाफ कंडेन्सरमध्ये थंड होऊन द्रवात रूपांतरित होते. विभागणी यंत्राद्वारे तेल व पाणी हे घटक सहज वेगळे होतात. हे यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या औषधी व सुगंधी वनस्पती योजनेमध्ये कार्यरत आहे.

रोपवाटिकेची जागा
– रोपवाटिकेसाठी वाऱ्यापासून आडोसा मिळेल, अशी सपाट, मध्यम खोलीची, कसदार, निचरा होणारी जमीन असावी. रोपवाटिकेच्या मातीत दगड-गोटे नसावेत.
– रोपवाटिकेला पाहिजे तेव्हा पाणी देण्याची सोय असावी; मात्र हे पाणी गोडे असावे, क्षारयुक्त नसावे.
– रोपवाटिका सार्वजनिक वाटेच्या वर्दळीपासून बाजूला असावी. जनावरांच्या गोठ्यापासून सुरक्षित अंतरावर असावी.
– जेवढ्या रोपांची गरज आहे तेवढी रोपे करण्यास पुरेल एवढी जमीन असावी.

रोहिस या नावाचे एक सुगंधी गवत आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तिला विविध भाषांमध्ये पुढील नावे आहेत जिरानियम ग्रास, रोशा ग्रास, Palma rosa.

आता आपण सुगंधी तेल देणाऱ्या रोहीस गवताची माहिती करून घेऊ :-

रोहिस गवत हे एक उंच वाढणारे, बहुवर्षायू व गोड वासाचे गवत आहे. झाड दीड ते अडीच मीटर उंच होते. खोड पिवळसर, पर्णयुक्त असते. पाने सपाट, नेहमी रुंद. तळाशी हृदयाकृती किंवा गोलाकार. आतील पाने आच्छादित. फुलोऱ्याखालील पाने २३ सेंमी लांब आणि १ सेंमी रुंद, बाकीची अडीच सेंमी रुंद. पानांच्या कडा खरखरीत. फुले कणिश द्विविभाजित, १२ ते १८ मिमी लांब, तिरपी किंवा द्विचल. फुलांचा मोसम हा साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर असतो.

हे गवत साधारण उघडी कुरणे, प्रामुख्याने भारताचा दख्खन भागात सापडतात. गुजरात, सौराष्ट्र, कोंकण, पश्चिम घाट, उर्वरित महाराष्ट्रातील अनेक भाग, तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथेही पाहायला मिळतात. तसेच परदेशात अफगाणिस्तान आणि उत्तर आफ्रिका येथेही आढळतात.

या गवताचा उपयोग अनेक रोगांवरची औषधे तयार करण्यासाठी केला जातो जसे कफज्वर, श्वास नलिकेचा दाह व दुखणे, त्वचारोग, हृदयरोग, घशाचा त्रास, आवाज बसणे, लहान मुलांमधील अपस्मार, आकडी यांत उपयोगी येतो..

रोहिस गवताचे दोन प्रमुख प्रकार आहेत. मोतिया आणि सोफिया. मोतिया प्रकारच्या गवतापासून काढलेले तेल उच्च गुणवत्तेचे असते; त्याला पामरोझा तेल किंवा ईस्ट इंडियन जिरेनियम तेल म्हणतात. सोफिया प्रकारापासून काढलेले तेल कमी प्रतीचे असून त्या तेलाला जिंजर-ग्रास तेल म्हणतात. सुगंधी तेलांमध्ये चंदनाचे तेल आणि लेमन-ग्रास तेलाच्या पाठोपाठ पामरोझा तेल हे तिसरे महत्त्वाचे आवश्यक तेल आहे. पामरोझा तेल वापरून उत्कृष्ट प्रकारचे जिरॅनिऑल बनते, त्याला गुलाबाचा सुगंध येतो. हे तेल प्रामुख्याने अंगाचे साबण आणि इतर सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. सुगंधी तंबाखूत व तपकिरीतही हेच असते. जिरेनिऑल अनेक सुगंधी द्रव्यांसाठी, तर रोशा तेल कंबरदुखीच्या औषधांमध्ये आणि डास पिटाळणाऱ्या मलमांमध्ये वापरतात.

पानांपासून ऊर्ध्वपातन करून काढलेले सुगंधी रोशा तेल उत्तेजक, वायुनाशी, स्वेदकारी, आणि आतड्यातील मुरडा यांवर उपयोगी पडते. हे तेल संधिवात, केशनाश यांवरही वापरतात. रोशा तेलाचे प्रमुख उत्पादन मध्य प्रदेशातील बैतूल आणि मिमार येथे आणि महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात होते.

शेतकऱ्यांना पारंपारिक शेती व्यवसायाव्यतिरिक्त गवताचे एक वेगळे उत्पादन आपल्या शेतात घेता येऊ शकते.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

6 Comments on सुगंधी शेती !

  1. कॉन्टॅक्ट नंबर द्या
    नंतर काय शेती करायची का नाही त्याच्यावर विचार करता येईल संपर्क साधा ९८७०४५८०३५ या नंबर वर संपर्क साधा

  2. सर मला जिरेनिअम शेती विषयी सखोल माहिती पाहिजे आहे मला त्याची लागवड करायची आहे

  3. आरोमॅंटिक शेती विषयी मला अजून माहिती हवी होतो

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..