कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.
समर्थ म्हणतात,
पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दुराभिमान
मत्सरे करी ।।
आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.
जसे काम तसे तसा आहार.
कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
” तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे”,
तर तो म्हणेल,
“काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा.” आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.
आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.
म्हणजे
काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
ऊन्हात काम आहे की एसी मधे.
ऊद्याची चिंता आहे की नाही.
शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
गरज म्हणून की हौस म्हणून.
जीभेसाठी की पोटासाठी.
जीवासाठी की जातीसाठी.
हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
विचार वेगळा करावा लागेल. लागतो.
इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.
मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
24.09.2016
Leave a Reply