तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ?
त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल.
यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर तपासता येत नाही हेच खरे.
तेच प्रत्येक चवींच्या बाबतीत आहे. वापरून बघितली की, अभ्यास केला की, यांची अनुभूती घेता येते.
या सर्व चवींचे ज्ञान जीभ या ज्ञानेंद्रियानी होत असते. हे एकमेव इंद्रीय उभयात्मक आहे. म्हणजे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे.
रसना म्हणजे आत चवीची अनुभुति देणे म्हणून रसनेंद्रिय आणि निर्माण झालेला शब्द बाहेर फेकणे म्हणून वागेंद्रीय.
आत बाहेर दोन्ही कामे करते. म्हणून या जीभेवर संयम आणता आला की, सर्व साध्य झाले. ज्याने जिंकीली रसना, त्याने जिंकिली वासना.
सर्व इच्छांवर संयम आणण्यासाठीदेखील ही तुरट चव मदत करेल.
संयमात ठेवणे हा गुण झाला, पण काहीवेळा तो दोषही होतो. जिथून विष बाहेर काढायचे आहे तिथून ही तुरट चव बाहेर पडायलाच देत नाही. स्रोतसांचे आकुंचित झाल्यामुळे बाहेर पडणारे स्राव कमी होतात. न पचलेले अन्न देखील आत मधे पडून राहाते. आम जागचा हलत नाही, तो तुरट चवीच्या याच स्तंभ गुणामुळे ! त्याचा परिणाम म्हणून पोटदुखी, मलावष्टंभ.
रक्तवाहिनीचा गरजेपेक्षा जास्त संकोच झाला तर रस रक्त विक्षेपणात अडथळे येणे, ह्रदयात वेदना होणे, ह्रदयाची ताकद कमी होणे, ही लक्षणे दिसतात.त्याचा परिणाम अन्य अवयवांवर होऊन यकृत, किडनी इ. मधे पण अवरोध जमा होऊ लागतो. म्हणून थकवा येणे, ग्लानी येणे, उत्साह जाणे, रक्तदाब वाढणे, तोंड सुकणे, आवाज बसणे यासारखी लक्षणे निर्माण होतात. चेहेरा वाकडा होणे, एक बाजू लुळी पडणे, हे वाताचे आजार देखील याच तुरट चवीच्या अतिसेवनाने होतात. हे विसरता नये.
पोषण करणाऱ्या नलिकांचा संकोच झाल्यामुळे कमालीचा अशक्तपणा येतो. वजन खूप कमी होते, प्रतिकार करण्याची शारीरिक आणि मानसिक ताकदच संपून जाते. याला देखील हीच तुरट चव जबाबदार आहे.
आपणाला कायम एकच बाजू दिसत असते. दुसऱ्याची चुक आणि आपली बरोबर.
दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय ठेवली तर भूमिकेला योग्य न्याय देता येतो. आपले काय चूक नि काय बरोबर. आणि ते का. हे शोधले की सापडते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.11.2016
Leave a Reply