उन्हाळ्याचे दिवस होते. भर दुपारी एका कामासाठी मंगेशला शहराबाहेर जावं लागलं होतं. तो उकाड्याने हैराण झाला होता व त्याला तहानही लागली होती. त्याने रस्त्यात एखादे झाड पाहून सावलीत थोडा वेळ थांबायचं ठरवले.
रस्त्याच्या कडेला एक डेरेदार झाड दिसल्यावर तो त्या झाडाच्या सावलीला जाऊन उभा राहिला. खिशातून रुमाल काढून तो घाम पुसताना सहजच त्याचं लक्ष समोरच्या बंगल्याकडे गेलं. त्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून एक वयस्कर माणूस मंगेशकडेच पहात होता.
त्या माणसानं मंगेशला खुणेनेच प्यायला पाणी हवंय का? असं विचारलं. मंगेशला तहान तर लागलेलीच होती, त्यानं खुणेनेच होकार दिला. त्यावर त्या माणसानं खुणेने बिल्डींगच्या खाली मंगेशला यायला सांगितलं.
मंगेशनं पहिला समज करुन घेतला की, हा माणूस किती दयाळू आहे, आपल्याला तहान लागल्याचं त्यानं ओळखलं व स्वतःहून पाणी आणून देतो आहे
मंगेश बिल्डींगच्या खाली गेला. दहा मिनिटे झाली. तरीही तो माणूस काही आला नाही. तहानेमुळे त्याचा घसा सुकून गेला होता.
मंगेशने दुसरा समज करुन घेतला की, हा माणूस आपली चेष्टा तर करीत नाही ना?
थोड्याच वेळात तो माणूस आला व मंगेशला ‘साॅरी’ म्हणाला. त्याने पाण्याऐवजी लिंबूपाणी आणल्याचं मंगेशला सांगितले.
मंगेश तिसरा समज करुन घेतो की, आपण उगाचच पाणी आणायला उशीर केल्याबद्दल याला मनातून रागावलो.
मंगेशनं त्या पाण्याचा एक घोट घेतला आणि तोंड आंबट केले.
मंगेशने चौथा समज करुन घेतला की, यानं पाणी आणण्याऐवजी लिंबू सरबत आणायचं ठरवलं. पण हा विसराळू साखर टाकायला विसरला.
तो माणूस मंगेशने केलेलं आंबट तोंड पाहून हसला व खिशातून साखरेची पुडी काढून म्हणाला, ‘तुम्हाला साखर चालते की नाही, हे माहीत नव्हतं म्हणून मी वेगळी पुडी करुन आणली आहे.’
मंगेशने त्या माणसाबाबत केलेले सर्व समज त्याच्या कृतीतून चुकीचे ठरते गेले. मंगेशने त्या माणसाचं मनोमन कौतुक केलं की, हा किती विचारपूर्वक कृती करतोय. आपली तहान भागवण्यासाठी त्याने फक्त पाणी न आणता लिंबू सरबत दिले. आपण उगाचच त्याच्याबद्दल गैरसमज करत राहिलो….
मग विचार करा, मंगेशच्या ठिकाणी तुम्ही आहात आणि अवघ्या पंधरा वीस मिनिटांच्या या प्रसंगांमध्ये क्षणाक्षणाला तुमची मतं, आडाखे बदलत जातात. अगदी सामान्य परिस्थितीतही तुमचे समोरच्या व्यक्तीबद्दलचे विचार, मतं क्षणात चुकीची ठरु शकतात. मग समोरच्या व्यक्तीबद्दल काही माहित नसताना, ती व्यक्ती पुढे कशी वागणार हे देखील माहित नसताना तिच्याबद्दल आपण ठाम समजूत करुन घेणे चुकीचे नाही का?
या संपूर्ण प्रसंगाचं सारं असं आहे की, समोरची व्यक्ती जोपर्यंत आपल्या अपेक्षेनुसार वागते आहे तोपर्यंतच ती चांगली, नाही तर वाईट.
आपल्या जीवनप्रवासात असंख्य माणसं भेटत असतात. त्यांच्याशी आपले स्नेहबंध जुळतात. काही काळानंतर किरकोळ कारणावरुन आपण त्यांना दूर करतो. समज गैरसमजातून दिवस, महिने, वर्षे उलटून जातात. वेळीच पुन्हा ती संपर्कात न आल्यास दुरावा वाढत जातो. पुन्हा एकत्र येण्यासाठी पुढाकार कुणी घ्यायचा, या सीमारेषेवरतीच दिवस निघून जातात व कायमची पोकळी राहून जाते.
‘जीवन क्षणभंगुर आहे’ हे जर पटलं तर जगात कुणीच असं वागणार नाही… खरं तर विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. पहा पटतंय का?
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
९-९-२०.
Leave a Reply