आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीशक्तीचा व स्त्री संघटनेचा अविष्कार दिसू लागलाय. अतिशय भावनाप्रधान मन, संवेदनशील स्वभाव, समाजातील तळागाळामधील लोकांसाठी काम करण्याची प्रखर इच्छा, समाजसेवेसाठी लागणारी तळमळ, जिद्द आत्मविश्वास आणि कुठल्याही परिस्थितीत मनात जपलेल्या नीतीमुल्यांशी तडजोड न करण्याची महत्वाकांक्षा या सर्वच गोष्टींचा अनोखा संगम स्त्री समाजामध्ये झालाय. ग्रामीण स्त्रियांना बरोबर घेवून, स्वश्रमांच्या तेलाने त्यांच्यामधील स्वाभिमानाचा कंदील पेटवून पुरुषप्रधान संस्कृतीत, त्यांना स्वतःच अस्तित्व आणि वेगळेपण सिध्द करण्याची संधी पेणमधल्या काही धडाडीच्या महिलांनी उभारलेल्या अहिल्या महिला मंडळाने निर्माण करुन दिलीये. तळागाळातील महिलांना आर्थिक अस्तित्व आणि प्रसिध्दीचं वलय मिळवून देण्याच्या हेतूने सुरू झालेल मंडळ आज एखाद्या वटवृक्षासारख तरारलयं आणि आजुबाजुच्या अनेक लतावेलींना, फुलपाखरांना स्वावलंबनाचे धडे देवून त्यांना आपल्या हिरव्या कुशीत सामावून घेण्याच काम या मंडळाने अगदी चोख केलयं. आपापले संसार आणि जबाबदार्या सांभाळून, सामाजिक बांधिलकीला जागून या समविचारी स्त्रियांनी स्वतःच्या सगळया महत्वाकांक्षा व स्वप्नं बाजुला सारुन जे इतर स्त्रियांना नवचैतन्याचा प्रकाश देण्याच काम केलयं, त्याला तोड नाही. कित्येक वनवासी महिलांच्या अनित रात्री संपून या मंडळामुळे त्यांच्या जीवनात स्वयंसिध्दतेची नवी पहाट उगवली असून, त्यांची कुटूंब नियमित रोजगाराच्या दवबिंदुमध्ये आकंठ भिजत आहेत, तसेच त्यांच्या कला कौशल्यांचा व अनुभवांचा फायदा इतर नोकरी करणार्या स्त्रियांना सुध्दा मिळतो आहे. आज समाजसेवेतील जवळजवळ प्रत्येक क्षेत्राला या मंडळाने स्पर्श केलाय व स्त्रियांच्या पंखांना नवी भरारी मारण्यासाठी लागणार बळ व सामर्थ्य त्यांना स्वश्रमांच्या माध्यमातून पुरवलयं. ७ जानेवारी १९९७ रोजी सुरू करण्यात आलेल्या अहिल्या महिला मंडळाने आज निरंतर १४ वर्षे गरजू स्त्रिया, आदिवासी मुली, वृध्द, कौटुंबिक जोडपी यांच्या आयुष्यात सुखाची आणि स्वावलंबनाची थंडगार झुळूक आणण्याचा प्रयत्न केला असून प्राथमिक शाळा, वृध्दाश्रम, रक्तपेढी, महिला गृहउद्योग, संस्कृत पाठशाळा, पोळी भाजी केंद्र, वाचनालय, नृत्यालय असा मोठा पसारा अतिशय सफाईदारपणे व समर्थपणे सांभाळला आहे. या मंडळाने केलेल्या प्रत्येक कार्याला भारतीय प्राचीन संस्कृतीला गंध तर आहेच शिवाय पुर्वापार चालत आलेल्या परंपरांना आणि आधुनिकतेला जोडणारा नाजुकसा बंधसुध्दा आहे. मग ती इंदिरा संस्कृत पाठशाळा असो किंवा नटराज नृत्यालय असो, अशा उपक्रमांद्वारे या मंडळाने नेहमीच पुरातन संस्कृती व तत्वे आधुनिक भारतीय विचारसरणीत रूजवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. लोकमान्य टिळकांनी पुर्वी बघितलेल्या भविष्यामधील भारताच स्वप्न आज या कार्यामुळे हळुहळु साकार होत आहे. या महिला मंडळाच्या इतक्या वर्षांच्या बहारदार घोडदौडीमागे, समाजसेवेशी त्यांची असलेली निष्ठाए तळमळ व जिद्द तर आहेच शिवाय त्यांनी एकमेकींशी निर्माण केलेल गाढ मैत्रीच नातं, एकमेकींच्या कार्यपध्दतीबद्दल दाखवलेला विश्वास एकमेकीच्या भावना ओळखून घेतलेले निर्णय व एकमेकींच जपलेल ’सामुहिक मन‘ या गोष्टीसुध्दा आहेत.जेव्हा या मंडळाच्या समिती बैठका होतात, तेव्हा प्रत्येक महिलेला स्वतःची मते व विचार मांडण्याचा पुर्ण अधिकार असतो, मग ते कितीही धारधार किंवा विचित्र का असेनात, कारण कधीकधी अशाच विचित्र विचारांमधून सुंदर चित्र शिल्प जन्माला येतं या वाक्यावर इथल्या प्रत्येक सदस्याचा विश्वास आहे. प्रत्येक निर्णय घेताना कुणाचही मन, भावना किंवा जोपासलेली तत्वे दुखावली जाणार नाहीत याची पुर्ण काळजी घेतली जाते आणि सर्वांच्या सहमतीनेच हे निर्णय राबवलेसुध्दा जातात.
प्रवास
१) अहिल्या महिला मंडळाच्या प्रवासाची सुरूवात चकलीच्या भाजणीपासून झाली आणि मग आजुबाजुच्या निराधार महिलांना कच्चा माल पुरवून त्यांच्याकडून घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू, सुती कपडे, रजई इ. गोष्टींची निर्मिती करून, त्या ग्राहक पेठेत विकून, त्या महिलांनी केलेल्या कष्टाचा योग्य मोबदला त्यांना देण्याच काम सुरू झालं. १९९६ मध्ये ’माहेर‘ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली, ज्याअंतर्गत निरनिराळे सण व उत्सव यांना लागणारे अनेक खाद्यपदार्थ, तिळगुळ, पुरणपोळी, मोदक, दिवाळीचा फराळ, पापड, लोणची, विविध प्रकारचे रूचकर मसाले, मिरगुंडे, चिकवडया इ. पदार्थ सामान्य महिला घरच्या घरीच तयार करतात आणि त्यांनी उपसलेल्या कष्टाच्या बदल्यात त्यांना नियमित रोजगार दिला जातो. हे पदार्थ अतिशय ताजे व रूचकर असतात. त्यांची गुणवत्ता व चव टिकवण्यासाठी, उत्कृष्ठ प्रकारचा कच्चा माल या घरगुती महिलांना मंडळामार्फत पुरवला जातो, तसेच त्यांना वैयक्तीक आणि स्वयंपाक घरामधील स्वच्छतेबाबत अनेक धडे देण्यात येतात. हे पदार्थ आसपासच्या दुकानात व बाजारपेठेत विकण्याची जबाबदारी मंडळाची असते, यातुन निर्माण होणार उत्पन्न व नफा या महिलांना पुरवला जातो.
२) स्वयंसिध्दा:-
परमेश्वराने महिलांना हृदयाची श्रीमंती तर दिली आहेच परंतु व्यावसायिक कामांसाठी लागणारी अनेक कौशल्ये, कलागुण व सुक्ष्म निरीक्षणक्षमता सुध्दा मुक्त हस्ते वाटली आहे. समाजाला व नोकरदार स्त्रियांना या सुप्त गुणांचा उपयोग व्हावा या हेतुमधून स्वयंसिध्दाचा जन्म झाला आणि अनेक गृहिणी महिलांना शिवणकाम, विणकाम, भरतकाम, पेंटिंग, मातीकाम या गृहपयोगी कलांमधून तसेच देवी, गणपती आदी देवादिकांच्या व कलाकृतींच्या निर्मीतीमधून नियीमत रोजगार आणि ओळखसुध्दा मिळाली. प्रत्यक्ष निर्मिती अगोदर या सर्व कलांबद्दल त्यांना शास्त्रीय माहिती प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. आतापर्यंत ३०० महिलांनी या प्रशिक्षणाचा आणि उपक्रमाचा आर्थिक लाभ घेतला आहे.
३) स्वादभारती :-
जेवण बनविण्यात आणि प्रेमाने सगळयांना वाढण्यात स्त्रियांचा पुर्वीपासून हातखंडा राहिला आहे. अतिशय प्रेमाने व सारे हृदय ओतून महिला जेवण बनवत असल्यामुळे स्वयंपाक ही त्यांच्यासाठी दैनंदिन जबाबदारी राहात नाही, तर त्यांच्या मनाला विलक्षण आनंद व विरंगुळा देणारी कला बनते. सार्या गोड आठवणी, सुंदर विचार व मधुर भावना या भोजन निर्माण प्रक्रियेमध्ये वापरल्या जातात व त्यामुळे या जेवणाला एका प्रकारची अवीट गोडी असते. बाहेरगावाहून येणार्या विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, व्यावसायिकांना व पर्यटकांना अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृतीची चव जिभेवर रेंगळवणारे साधे, घरगुती जेवण अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी स्वादभारती सुरू करण्यात आली आणि आज या जेवणाच्या किंमतए गुवणत्ताए व दर्जेदारपणाबद्ल ग्राहक बेहद खुश आणि समाधानी आहेत. आपल्या जेवण बनविण्याच्या कसबाचा बाहेरगावांतून येणार्या लोकांना कसा फायदा होतो, हे बघितल्यानंतर या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनासुध्दा तेवढाच आनंद व समाधान मिळतं.
४) संजीवनी वृध्दाश्रम ः- जून २००३ मध्ये या
महिला मंडळाने स्त्रियांबरोबर अनेक वृध्द मंडळींना आपल्या कवेत घेण्यासाठी, व त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा शिडकावा करण्यासाठी संजीवनी वृध्दाश्रम सुरू केला आणि त्यांच्या संगोपनाची, आरोग्याची, पोषक आहाराची आणि मनोरंजनाची पुर्ण जबाबदारी उचलली. या वृध्दांचे शेवटचे काही दिवस संस्मरणीय व यादगार ठरावेत व आयूष्याच्या वठलेल्या वडामधील काही शेवटच्या पारंब्यांचा त्यांनी अगदी मनमुराद आनंद लुटावा म्हणून ही संस्था कायम प्रयत्नशील असते. हिंडत्या फिरत्या वृध्दांपासून ते २ गतिमंद, २ मुकबधीर, ६ अपंग आणि काही भ्रमिष्ट अशा ऐकुण ६० आजी-आजोबांना इथे अतिशय कौटुंबिक व प्रेमळ वातावरणात वाढवलं जातं. इथे सर्व आजी-आजोबांना त्यांच्या आवडी जपण्याचं, तरुणपणी, अपुर्ण राहिलेले छंद पुन्हा नव्याने जोपासण्याचं पुर्ण स्वातंत्र्य असतं. हिंडत्या फिरत्या वृध्दांच्या इथून कधी सहली निघतात, तर कधी त्यांचा विरंगुळा व्हावा म्हणून चित्रपट किंवा नाटक दाखवण्याची सोय केली जाते. आजी आजोबांसाठी इथे खास वाचनालयाची सोय सुध्दा केली गेली आहे. मुक्ताई विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी या आजी-आजोबांना आमंत्रित केलं जातं आणि त्यांना दुसर बालपण जगण्याची संधी मिळते. त्यांच मन शांत आणि स्वस्थ राहाव यासाठी दर आठवडयाला भजनांचा व सामुदायिक पोथीवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
५) स्वानंद संस्कार वर्ग ः-
मुलं ही जन्मतः खेळकर व खोडकर असतात. निसर्गात मुक्त बागडण्याची किंवा इतर समवयीन सवंगडयांमध्ये मिसळण्याची संधी त्यांना दिली तरच त्यांच्यामधील बालपणाची कळी फुलते, खुलते, बहरते. पण बरेचदा पालकांच्या कडक शिस्तीमुळे म्हणा किंवा आजकालच्या बैठया जीवनशैलीमुळे, या मुलांना त्यांचा खेळकरपणा व्यक्त करण्याचं प्रभावी साधनच मिळत नाही. मुलांना मुक्त विहारण्यासाठी, आणि चार भिंती नसलेल्या निसर्गशाळेत त्यांना विविध गोष्टी, गाणी, खेळ, कविता शिकवून त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी स्वानंद संस्कार वर्ग सुरू करण्यात आलेण् मग विविध प्रकारचे खेळ मैदानी, बौध्दिक, व काही नुसतेच मजेचे, गायन, कथाकथन, कवितावाचन, झाडांवर चढणे, पतंग उडवणे या समाजातून कालबाहय होत चाललेल्या गोष्टींना पुन्हा बालमनांमध्ये हक्काचे स्थान व नवसंजीवनी मिळाली.
महिला मेळावे ः- ३१
डिसेंबर २००३ पासून दरवर्षी संस्थेतर्फे महिलांच्या एकत्रीकरणासाठी तीन वयोगटांमध्ये महिला मेळावे घेतले जातात.
१) ६० वर्षांवरील महिला
२) ४० ते ६० वर्षांमधील महिला
३) २०-४० वर्षांमधील महिला
या मेळाव्यांद्वारे अनेक खेळ, मनोरंजनाचे प्रकार घेवून आलेल्या महिलांना वेगवेगळया विषयांवर माहिती दिली जाते, त्यांच विचारमंथन केलं जातं. तरुण मुलींना विविध क्षेत्रांमधील करीअरच्या संधी, विवाहीत महिलांना बाळांच्या संगोपनाविषयी माहिती तसेच सर्व महिलांना चालू घडामोडी आणि वेगवेगळया सामाजिक व राजकीय भान देणार्या विषयांवर उपयुक्त माहिती दिली जाते. तसेच अनेक संवेदनशील विषय, देशापुढील आव्हानं , स्त्रियांच्या समस्या, तसेच वयात येणार्या मुलींच्या समस्या असे नाजुक विषय सुध्दा या चर्चांमध्ये हाताळले जातात. त्यांच्यावर विविध उपाय सुचवले जातात. या सर्व चर्चांमध्ये जमलेल्या महिलांना बोलतं करुन त्यांचं समाजप्रबोधन घडवण्याचा हा प्रयत्न असतो. मेळाव्याच्या शेवटी प्रत्येक महिलेला मंडळातर्फे चहा, नाष्टा व भेटवस्तू दिली जाते.
६) आरोग्य शिबीरे ः-
या संस्थेतर्फे खास महिलांसाठी आरोग्यशिबीरेसुध्दा आयोजित केली जातात. अनेक गरीब महिलांना व मुलींना घरच्या गरीब परिस्थितीमुळे स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देता येत नाही, त्यामुळे या शिबीरांमध्ये सहभागी होवून त्यांचा आपल्या शारिरीक आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. या शिबीरांमध्ये कधी रक्तदानाचा कार्यक्रम करण्यात येतो, तर कधी वेगवेगळया रोगांवरची औषधे महिलांना विनामुल्य वाटण्यात येतात, कधी या महिलांच्या हिमोग्लोबीनची तपासणी केली जाते, तर कधी त्यांना वेगवेगळया आरोग्य विषयक गोष्टींवरचे संस्कार देण्यात येतात. जसे-उघडयावर शौचास का बसू नये, वारंवार नखांची व केसांची स्वच्छता का करावी इ.कधी कधी या शिबीरांमार्फत महिलांना विविध आदिवासी पाडयांवर जावून तिथे तिळगुळ वाटप समारंभ करण्याची, त्यांची सुख दुःखे जाणून घ्यायची, व त्यांच्या स्थानिक संस्कृतीत समरस व्हायची संधी मिळते. या महिला तेथील वनवासी महिलांना वेगवेगळया सणसमारंभांबद्दल जसे डोहाळ जेवण का व कसे बरावे हे योग्य मार्गदर्शन करतात.
आनंदी वस्तीगृह ः- पेण मधील अहिल्या मंडळाच्या वास्तूतच १८ जून २००८ रोजी आनंदी वस्तीगृहाचे उद्घाटन झाले व २० वनवसी होतकरू मुलींच्या राहण्याची व खाण्याची उत्तम व्यवस्था या वस्तीगृहामध्ये करण्यात आली. त्यामुळे हे मंडळ कातकरी मुलींना केवळ शिकण्यास प्रोत्साहन देत नाहीये तर त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च वाचवण्यात किंवा कमी करण्यात समान भागीदारी करतयं, याचेच हे द्योतक आहे.
७) रक्तासाठी केंद्र ः-
माणसाला कुठल्याही अपघातातून किंवा अग्नीदिव्यातून वाचवण्यासाठी वेळ सर्वात मौल्यवान असतो आणि अशा दुर्घटनांची वेळ सांगून येत नसल्यामुळे, व पेणमध्ये किंवा जवळपास कुठलेच रक्तसाठी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे, सर्व सरकारी आदेशांचे पालन करून मंडळातर्फे १७ जानेवारी २००८ मध्ये रक्तसाठा केंद्र स्थापन करण्यात आले आणि कितीतरी दुर्घटनाग्रस्तांना या केंद्रामुळे कमालीचा दिलासा व जीवनदान मिळाले आहे. पेणमध्ये ऐकुण ११ रुग्णालये आहेत, व या रुग्णालयांना या केंद्रामधून नियीमत व तत्पर रक्तपुरवठा केला जातो व कितीतरी रुग्णांना नव्याने जीवन जगण्याची संधी मिळते.आतापर्यंत या केंद्राच्या जलद तत्पर व निरपेक्ष सेवेमुळे ३२० जणांचे प्राण वाचविण्यात संस्थेला यश आले आहे.
८) इंदिरा संस्कृत पाठशाळा ः-
कित्येकदा आई ही घराची शिल्कार असूनसुध्दा तिची पुरेशी दखल घेतली जात नाही, किंवा तिच्या निरपेक्ष त्यागामुळे व विशाल मनामुळे, तिला प्रत्येक गोष्टीत आपण गृहित धरतो. त्याचप्रमाणे संस्कृत ही सर्व आधुनिक भाषांची जननी असून व सर्व प्राचीन विपुल वाड्.मय संपदा संस्कृतमध्ये लिहीली गेली असूनसुध्दा या भाषेला तितकसं महत्व दिलं जात नाही. संस्कृत हा सर्व प्राचीन ज्ञानाचा व भारतीय सांस्कृतिक परंपरेचा अभिमानबिंदु तसेच मुलस्त्रोत असुनसुध्दा भारतापेक्षा परदेशातच संस्कृत भाषेचा अभ्यास केला जातो, तिच्यावर संशोधन केलं जातं, व तिच्या रसाळ जातकुळीला आपलसं केलं जातं. संस्कृत भाषा आपल्या मातीत पुन्हा रूजावी व तिची अवीट गोडी आजच्या लहान मुलांच्या जीभेवर खेळावी यासाठी मंडळाने इंदिरा संस्कृत पाठशाळेची स्थापना केली ज्यात मुलांना संस्कृत पद्य, गद्य, नाटय काव्य व व्याकरण या विषयी सखोल ज्ञान तर पुरवलं जातच, शिवाय येथे संस्कृत भाषेचा शालेय अभ्यासक्रम, स्तोत्रे, वेदविद्या व पौरोहित्याचं खास प्रशिक्षणसुध्दा दिलं जातं.
९) नटराज नृत्यालय व कौटुंबिक सल्ला केंद्र ः-
पती-पत्नीचा संसार दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांच्या मनाच्या तारा जुळलेल्या असाव्या लागतात. परंतु काही वेळेस विचारांमधील वैमनस्यामुळे म्हणा किंवा रोजच्या धाकधुकीमुळे म्हणा, अंधुक होत चाललेल्या नीती-तत्वांमुळे म्हणा किंवा आपापसातील गैरसमजुतींमुळे म्हणा या तारांचा समतोल बिघडतो व मग अगदी घटस्फोटापर्यंत परिस्थिती येवून ठेपते. कित्येकदा सामोपचाराने ही भांडणे मिटवता येतात, तर कधी कधी अगदी समस्येच्या मुळाशी जावून उपचार करावे लागतात. या जोडप्यांना, त्यांचा स्वाभिमान काही क्षणांसाठी बाजूला ठेवायला लावणार्या, संसार तुटल्यामुळे होणार्या दीर्घकालीन परिणमांची धास्ती त्यांच्या मनात भरवणार्या व त्यांच्या मनाशी थेट संवाद साधून त्यांचं मतं परिर्वतन करणार्या मित्राची गरज असते. जी जबाबदारी मंडळाच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने उचलली असून अगदी पोलिससुध्दा अनेक जोडप्यांना त्यांच्या संसाराचे घडे टिकवण्यासाठी या मंडळाच्या सल्ला केंद्राकडे पाठवतात.
नटराज नृत्यालय पेणमध्ये एकही कथक नृत्याचे शास्त्रीय धडे व प्रशिक्षण देणारे नृत्यालय नसल्याने नटराज नृत्यालयाची स्थापना करण्यात आली व आज पेणच्या कानाकोपर्यांतून या लोकप्रिय भारतीय नृत्यप्रकाराबद्दल आत्मीयता व आस्था असणार्या मुली या नृत्यालयाला आवर्जुन भेट देतात व येथील प्रशिक्षणाचा लाभ उठवतात.
इतर कार्ये ः-
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत या मंडळातून १११ पालिका शाळांमध्ये उत्यंत उत्तम दर्जाची खिचडी पाठवण्यात येते.
१०) डॉ.घाटे आरोग्य केंद्र ः-
कै. डॉ. गजानन विनायक घाटे यांची संपुर्ण वास्तु वापरायला मिळाली व दि. ४ मार्च २००४ पासून केंद्र सुरू झाले. पॅथोलॉजिकल जॅब ६ जून २००३ रोजी चालू झाली, आणि आरोग्य केंद्राची योजना आकारास आली. आज येथे कातकरी बांधवासाठी अनेक रोगांवर जसे कावीळ, कॉलरा, मलेरिया, हागवण इ. अत्यंत अल्प दरात औषधे व गोळया वाटण्यात येतात.
११) वाचनालय ः-
या मंडळाचे स्वतःचे असे अतिशय परिपुर्ण व अद्ययावत असे वाचनालय आहे ज्यात बालसाहित्य, चरित्रे, प्रवासवर्णन, धार्मिक, राजकीय, सामाजिक, तात्विक अशा अनेक विषयासंबंधीच्या पुस्तकांचा अक्षरशः खच पडला असतो ज्याचा लाभ संस्कारवर्गातील मुले, वृध्द व इतरमंडळीसुध्दा घेवू शकतात.
— अनिकेत जोशी
Leave a Reply